सीमा सुरक्षेला ‘रायफल ड्रोन’चे कवच

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हा ड्रोन गस्तदरम्यान शत्रूची ओळख पटवून लक्ष्यावर अचूक गोळीबार करू शकणार
rifle-drone-for-border-security-india-defense-tech
सीमा सुरक्षेला ‘रायफल ड्रोन’चे कवचPudhari File Photo
Published on
Updated on
विनायक सरदेसाई

देशाच्या सीमांवर गस्त घालण्यासाठी एके-47 रायफलने सुसज्ज अशा ड्रोनच्या निर्मितीची तयारी सध्या सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हा ड्रोन गस्तदरम्यान शत्रूची ओळख पटवून लक्ष्यावर अचूक गोळीबार करू शकणार आहे. याची एक खासियत अशी असेल की, कोणत्याही लक्ष्यावर प्रहार करण्यासाठी हा ड्रोन 180 अंशांपर्यंत सहजपणे फिरू शकेल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडील संघर्षादरम्यान सीमापार करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांना निष्फळ ठरविल्यानंतर भविष्यात अशा कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी एके-47 सुसज्ज ड्रोन विकसित केला जाणे हा केवळ ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक तांत्रिक नवोपक्रम नसून ती एक मोठी उपलब्धी ठरणार आहे. जगभरातील विविध देशांदरम्यान अलीकडील युद्धांमध्ये ड्रोनच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर भारतातील ड्रोन उत्पादकसुद्धा अशा सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवकल्पनांना प्रोत्साहन देत आहेत, ही बाब स्वागतार्ह आहे. सध्या भारतात रेकी किंवा गस्तीसाठी, लक्ष्यावर प्रहार करण्यासाठी आणि ‘फर्स्ट पर्सन व्ह्यू’साठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे.

एके-47 रायफलसह सुसज्ज करण्यात येणार्‍या ड्रोनची वैशिष्ट्ये पाहिली असता त्याची उपयुक्तता किती बहुआयामी आहे, हे लक्षात येते. हा ड्रोन कोणत्याही लक्ष्यावर प्रहार करण्यासाठी 180 अंशांपर्यंत सहजपणे फिरू शकेल. कॅमेर्‍याच्या साहाय्याने शत्रूच्या ठिकाणाची किंवा लक्ष्याची ओळख पटवून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हा ड्रोन शत्रूंवर सातत्याने गोळीबार करण्यास सक्षम असेल. याच्या निर्मितीत सहभागी असलेल्या कंपन्या याला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीशी एकत्रित करून जमिनीवरून लक्ष्यावर अचूक प्रहार करण्यास पूर्णतः सुसज्ज बनवतील.

ड्रोन तंत्रज्ञानात सुरक्षेच्या द़ृष्टीने नानविध उपाय केले जातात. यामध्ये शत्रू त्याचा मागोवा घेऊ शकणार नाही, यासाठी खास प्रणाली विकसित केली जाते. इतकेच नव्हे, तर हॅकिंगचा धोका टाळण्यासाठीही स्वतंत्र आणि अत्यंत सुरक्षित संप्रेषण प्रणाली वापरली जाते. भारतात लक्ष्यावर अचूक प्रहार करणार्‍या ड्रोनचे उत्पादन केले जात आहे. यापैकी काही ड्रोन ‘वन टाईम यूज’ म्हणजे एकदाच वापरण्यात येतात, तर काही अनेक वेळा हल्ल्यासाठी वापरले जाऊ शकतात. यामध्ये विशेष प्रकारच्या सुरक्षाव्यवस्था समाविष्ट केलेल्या असतात.

रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये ड्रोनच्या संचालनासाठी ऑप्टिकल फायबर केबलचा वापर केला जात आहे. ही इतर प्रणालींपेक्षा अधिक सुरक्षित असली, तरी या तंत्रज्ञानाची श्रेणी मर्यादित असल्यामुळे त्याचा वापर विशेषतः देखरेखीसाठी केला जातो. केबलच्या साहाय्याने ड्रोनला उडण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवली जाते. छोटा आकार असलेल्या अशा ड्रोनना पतंगाच्या दोरीसारख्या केबलद्वारे ऊर्जा मिळत राहते. त्यामुळे ना बॅटरीची गरज असते, ना इंधनाची. स्वतंत्र संप्रेषण माध्यम वापरल्यामुळे अशा ड्रोनना ओळखणे किंवा बाधित करणे जवळपास अशक्य असते. जगभरात सध्या रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास यासारखी युद्धे सुरू आहेत. त्यामुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. मध्य-पूर्वेतील संघर्ष जगाच्या शांततेला घातक ठरत आहे. अशातच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची हत्या करून त्यामध्ये भर घातली. अर्थात, त्याला भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तानची बोलती बंद केली आहे. अशावेळी संरक्षण साहित्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी भारत सरकारने ठोस पावले टाकली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news