अन्नधान्य महागाईचा दिलासा

गेल्या वर्षीच्या जुलैनंतरचा सर्वांत कमी दर
relief in food grain inflation
अन्नधान्य महागाईचा दिलासा.Pudhari File Photo
Published on
Updated on
विलास कदम

दीर्घकाळ उच्च स्तरावर राहिल्यानंतर देशातील अन्नधान्य महागाई मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे आणि याचे श्रेय सुधारलेल्या कृषी उत्पादनाला जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई (किंवा किरकोळ महागाई दर) फेब्रुवारीत 3.61 टक्क्यांवर घसरली आहे. गेल्या वर्षीच्या जुलैनंतरचा हा सर्वांत कमी दर आहे. अन्नधान्य महागाई दरही कमी होऊन 3.75 टक्क्यांवर आला असून, मे 2023 नंतरचा हा सर्वांत कमी स्तर आहे.

अन्नधान्य महागाई म्हणजे अन्नधान्याच्या किमतीत झालेली सातत्यपूर्ण वाढ, जी विविध कारणांमुळे घडते. ही वाढ अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकते आणि ती मुख्यतः मागणी व पुरवठ्याच्या तफावतीवर अवलंबून असते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात अन्नधान्य महागाईचा थेट परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर होतो. कारण, अन्न हा प्रत्येक कुटुंबाच्या रोजच्या खर्चाचा मोठा भाग असतो. नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होतो. अनियमित पाऊस, दुष्काळ, गारपीट, पूर आणि उष्णतेच्या लाटांमुळे शेती उत्पादन घटते. कमी उत्पादन झाल्यास पुरवठा मर्यादित राहतो आणि किमती वाढतात. खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या किमती वाढल्यास उत्पादन खर्च वाढतो आणि शेतीमाल महाग होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्यास उत्पादन क्षमता वाढत नाही. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा राहतो आणि महागाई वाढते. साठवणूक आणि गोदामांची मर्यादाही अन्नधान्य महागाईचे एक महत्त्वाचे कारण आहे. योग्य साठवणुकीअभावी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य सडते किंवा नष्ट होते. परिणामी, पुरवठा कमी होतो आणि किमती वाढतात. वाहतूक आणि वितरणातील समस्या, खराब रस्ते, इंधन दर वाढ, मध्यस्थांची नफेखोरी यामुळेही अन्नधान्य महाग होते. निर्यातीतील वाढ तसेच आयात मर्यादित असल्यास स्थानिक बाजारपेठांमध्ये किमती अधिक चढ्या राहतात.

ऑक्टोबर 2023 पासून अन्नधान्य महागाई सतत घसरत आहे. त्या महिन्यात हा दर 10.87 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यामुळे एकूण महागाई दरही काही काळ उच्च राहिला आणि रिझर्व्ह बँकेच्या धोरणांसाठी पेचप्रसंग निर्माण झाला. अन्नधान्य महागाई दर आणखी काही काळ कमी राहण्याची शक्यता आहे. 2024-25 मध्ये प्रमुख पिकांचे उत्पादन वाढण्याचे संकेत दुसर्‍या आगाऊ अंदाजातून मिळतात. खरीप हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.9 टक्के अधिक अन्नधान्य उत्पादन अपेक्षित आहे, तर रब्बी हंगामात 6 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. गहू, तांदूळ आणि मका या पिकांचे उत्पादन विक्रमी पातळीवर जाऊ शकते. मोठे धान्य, तूर आणि चणाही वाढत्या उत्पादनात आहेत. तृणधान्यांसोबत तेलबिया उत्पादनातही वाढ होण्याचा अंदाज आहे. खरीप हंगामात 21 टक्के आणि रब्बी हंगामात 2 टक्के वाढ अपेक्षित आहे. फळे आणि भाज्या उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. 2024-25 मध्ये बागायती पिकांचे उत्पादन 36.21 कोटी टन होण्याचा अंदाज आहे, जो 2023-24 च्या तुलनेत 2.07 टक्के अधिक असेल. मागील वर्षी चांगला पाऊस आणि हिवाळा अनुकूल राहिल्यामुळे यंदा उत्पादन विक्रमी राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या अंदाजानुसार, 2024-25 मध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रांची वाढ 4.6 टक्के राहू शकते, तर मागील वर्षी ही वाढ 2.7 टक्के होती. कृषी उत्पादन वाढल्यास अन्नधान्याच्या किमती स्वाभाविकच खाली येतील. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार, 2025-26 मध्ये किरकोळ महागाई दर सरासरी 4.2 टक्के राहील, जो चालू आर्थिक वर्षात 4.8 टक्के आहे. 2024 मध्ये अन्नधान्य महागाईचा सरासरी दर 8.4 टक्के होता, तर किरकोळ महागाई 5.3 टक्के राहिली. उच्च अन्नधान्य महागाईमुळे एकूण महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाच्या वर राहिला आणि त्यामुळे कुटुंबांना त्यांच्या मनाप्रमाणे खर्च करणे कठीण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news