

खारफुटी वन हा एक समुद्राजवळ वाढणारा अनेक जातींचा वनस्पतींचा समूह. मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती असेही म्हणतात, तर इंग्रजीत मँग्रोव्ह म्हटले जाते. या वनस्पतीमुळे तयार झालेल्या वनराईला कांदळवन असेही म्हणतात. जगातील सर्वाधिक खारफुटीचे जंगल भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबन येथे आहे. पर्यावरण संतुलन आणि मानवी जीवन यात मोलाचे योगदान देणारे खारफुटीचे वन निसर्गाची एक अनमोल भेट आहे.
समुद्र आणि मूळ जमिनीदरम्यान असणारा सेतू म्हणून खारफुटी वनाकडे पाहिले जाते. सध्याच्या हवामान बदलाच्या युगात एकीकडे तापमानवाढ, हवेतील प्रदूषण आणि किनारपट्टीवरील वाळूचे उत्खनन यासारखे आव्हाने असताना खारफुटी वनाचे महत्त्व आणखी अधोरेखित होते, तरीही ‘द स्टेट ऑफ द वर्ल्डस् मॅन्ग्रोव्हज- 2024’ या अहवालात ग्लोबल मॅन्ग्रोव्ह अलायन्सने भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवरील नैसर्गिक खारफुटी क्षेत्र गंभीर धोक्याच्या स्थितीत असल्याचा इशारा दिला आहे. विशेषतः तामिळनाडू किनार्यावरील आणि लक्षद्वीप द्वीपसमूहातील खारफुटी क्षेत्र जागतिक तापमानवाढीमुळे वाढणार्या समुद्रसपाटीचा सर्वाधिक फटका सहन करत आहेत. पश्चिम किनारपट्टीवरील गुजरातपासून केरळपर्यंत पसरलेल्या खारफुटी परिसंस्था, मानवजन्य अतिक्रमणांमुळे विशेषतः कोळंबी पालन उद्योग, शहरी विकास आणि उष्णकटिबंधीय वादळांमुळे संपूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर असल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.
खारफुटीचे वन केवळ घनदाट वनराईचे प्रतीकच नाही, तर वातावरणाच्या प्रणालीचे संरक्षकही असल्याने ते निसर्ग आणि मानव विकास यात सेतूची भूमिका बजावते. खारफुटी वनाच्या संरक्षणासाठी पर्यावरणवादी नेहमीच आग्रही असतात आणि भारत सरकारनेदेखील पर्यावरणाचे गांभीर्य ओळखून दीर्घकालीन उपायांच्या द़ृष्टिकोनातून ठोस पावले उचलली आहेत. प्रत्यक्षात खारफुटी वनाचे पर्यावरणातील योगदान अमुल्य आहे. त्याची मुळे सागरी लाटांपासून किनारपट्टीचे संरक्षण करण्याचे काम करतात आणि माती खचण्यापासून जमिनीला सुरक्षित ठेवतात. साहजिकच किनारपट्टी सुरक्षित राहते. खारफुटीच्या रूपातून असणारे नैसर्गिक कवच हे किनारपट्टीवरील गावांचे आणि मानवी वस्तीचे संरक्षण करतात. शिवाय खारफुटी कार्बन उत्सर्जन शोषून घेण्याची असामान्य क्षमता बाळगतात. या गोष्टी हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी एक प्रभावी शस्त्र म्हणून वापरता येणे शक्य आहे. अन्य जंगलांच्या तुलनेत खारफुटी वने हे कार्बन उत्सर्जनाला अधिक प्रमाणात शोषून घेण्याचे आणि दीर्घकाळापर्यंत रोखून धरण्याचे काम करतात. त्यामुळे हवेत प्रदूषण कमी राहते. नदी आणि सागरी संगमावर वसलेले खारफुटी वन हे पाण्याला नैसर्गिक रूपातून फिल्टर करण्याचे काम करतात आणि प्रदूषणात घट करतात. जलचर जीवांसाठी आरोग्यदायी वातावरणाची हमी देतात.
जैवविविधतेच्या संवर्धनात खारफुटीची भूमिका अनन्यसाधारण आहे. खारफुटी वने मासे, पक्षी, किटक, कासव यासह अन्य जलचर प्राण्यांसाठी आदर्श अधिवास मानला जातो. यानुसार ते वातावरणाला संतुलित ठेवतात. यापासून निर्माण होणारे जैविक खाद्य सागरी जीवांसाठी आहारांचा प्रमुख स्रोत आहे. यामुळे सागरी स्थिती स्थिर राहते. हवामान बदलातील चढउतार, महापूर, दुष्काळ आणि हवामान बदल यासारख्या घटनांना संतुलित करण्यासाठी खारफुटी वन मदत करतात. स्थानिक समुदायासाठी मँग्रोव्ह फिश, लाकूड आणि अन्य स्रोतांचीदेखील निर्मिती करतात. यावरच ग्रामीण जीवनशैली अवलंबून आहे. प्रामुख्याने हे वन पर्यावरण आणि मानव यांच्यातील एक सजीव सेतू म्हणून काम करतात. भारतात खारफुटी वन नऊ राज्यांत आणि चार केंद्रशासित प्रदेशांतील किनारपट्टीच्या भागात आहे.