

युवराज इंगवले
सोशल मीडियाच्या जमान्यात जगभरात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार यांचा बोलबोला आहे. त्यांचा विशिष्ट असा एक चाहता वर्ग आहे. हे स्टार बहुतांशवेळा वादातच अडकत असतात. काहीवेळा त्यांच्या वर्तनाने तर बहुतांशवेळा त्यांनी तयार केलेल्या वादग्रस्त रील्समुळे त्यांना नेहमीच वादाला सामोरे जावे लागते. अशातील एक म्हणजे कुवेतची प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रवान बिन हुसैन होय. सध्या ती दुबईच्या तुरुंगात असून तिने आता उपोषण सुरू केले आहे. इन्स्टाग्रामवर 75 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या रवानचा तुरुंगातील एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती कमजोर आणि थकलेली दिसत आहे. एकेकाळी ‘वोग’ मासिकाने ‘कुवेतची ब्रुक शील्ड्स’ म्हणून गौरवलेली रवान आता कायदेशीर अडचणींच्या गर्तेत सापडलीय.
रवानला गेल्या वर्षी मार्च महिन्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, पोलिस अधिकार्याला मारहाण करणे आणि गोंधळ घालण्याच्या आरोपांखाली अटक केली होती. याप्रकरणी न्यायालयाने तिला 6 महिन्यांचा तुरुंगवास, 20,000 कुवेती दिनार (सुमारे 4.5 लाख रुपये) दंड आणि देश सोडण्याचा आदेश दिला होता. मात्र तुरुंगात असताना तिने एका महिला गार्डवर हल्ला केला. या नव्या गुन्ह्यामुळे तिची शिक्षा आणखी एक वर्षाने वाढवली. या शिक्षेच्या निषेधार्थ तिने उपोषण सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. रवान वादांमध्ये अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या पाच वर्षांपासून ती सातत्याने कायदेशीर अडचणींना सामोरे जात आहे.
2020 मध्ये पती युसेफ मिगारियापासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने त्याला त्रास देणे, पाठलाग करणे आणि मारहाण केल्याचा आरोप होता. याप्रकरणी ब्रिटनच्या न्यायालयात गैरहजर राहिल्याने तिच्यावर कारवाई झाली होती. न्यायालयाने तिला 6,500 पौंड दंड ठोठावला होता आणि पती व त्याच्या कुटुंबापासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. जुलै 2023 मध्ये बगदाद विमानतळावर कर्मचार्यांशी झालेल्या वादानंतर तिला इराक येथून हद्दपार केले होते.
ऑक्टोबर 2023 मध्ये सौदी अरेबियामध्ये इराणच्या ध्वजासमोर नृत्य केल्याने ती वादात सापडली होती. रवानच्या व्हायरल झालेल्या फोटोमुळे तिचे चाहते चिंतेत आहेत; तर दुसरीकडे कायदा सर्वांसाठी समान असतो, मग ती व्यक्ती कितीही प्रसिद्ध असली तरी, अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत. सोशल मीडियावरील ग्लॅमरस आयुष्य आणि तुरुंगातील कठोर वास्तव यातील तफावत तिच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. बर्याचवेळा लोकप्रियता आणि स्वतः जवळ असलेल्या प्रचंड पैशांमुळे रवान सारखे स्टार बेफिकीर वागत असतात. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणे, चाहत्यांशी उमर्टपणे वागल्याचे रवानसारख्या स्टारचे अनेक किस्से ऐकायला मिळत असतात. खरे तर अशा लोकप्रिय सेलिब्रिटींनी सभ्यपणे अपेक्षा असते. पण तसे बघायला मिळत नाही.