

आज समृद्धतेच्या वाटेवर असतानाच आर्थिक विषमताही वाढत आहे. थॉमस पिकेटी या अर्थतज्ज्ञाने ‘कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ या ग्रंथात आकडेवारीसह याबद्दलचे संशोधन प्रसिद्ध केले आहे. उदारीकरणपूर्व काळात उद्योगपतींची श्रीमंती ही शोषणातूनच आली आहे, असे मानले जात असे. अन्यायाविरुद्ध लढणार्या कामगार संघटनाही प्रबळ असत आणि भारतासारख्या देशात ‘भांडवलदारांचा निषेध असो’ अशा घोषणा कारखान्यांच्या आसमंतात दुमदुमत असत; मात्र टाटांनी कधी कामगारांचे शोषण केले नाही. उलट या देशाच्या आधुनिक पायाभरणीसाठी ज्यांची विधायक कर्तृत्वशक्ती उपयोगी पडत आली, अशा व्यक्तींमध्ये जेआरडी टाटा हे एक प्रमुख होते. जेआरडींच्या पुढे जमशेदजी टाटा यांचा आदर्श होता. भारतातून कच्चा माल विदेशात जातो आणि पक्का माल आपण विकत घेतल्यामुळे संपत्तीचा ओघ येथून तिकडे जातो, हे दादाभाई नौरोजी यांनी दाखवून दिले. यापासून प्रेरणा घेऊन भारतीय कारखानदारीची वाढ करण्यासाठी जे पुढे आले, त्यात जमशेदजी टाटा एक आघाडीचे उद्योजक. 1991 मध्ये जेआरडींकडून ज्या रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाची सूत्रे स्वीकारली, त्यांनीही समूहाची सामाजिक दायित्व मानणारी औद्योगिक परंपरा केवळ जपलीच नाही, तर जगाच्या पाठीवर तिची कीर्ती पोहोचवली. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगजगताला अत्याधुनिक युगात नेण्यासाठी झटणार्या द्रष्ट्या औद्योगिक नेतृत्वाचा अंत झाला आहे.
रतन टाटा यांचे पिता नवल टाटा यांना समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. रतन टाटा यांनी 1962 मध्ये टाटा समूहात प्रवेश केला. 1981 मध्ये ते टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष झाले, तर 1991 मध्ये संपूर्ण समूहाची सूत्रे त्यांनी जेआरडींकडून स्वीकारली. भारतातील उदारीकरणाचा अध्याय सुरू झाला होता आणि नवे वातावरण लक्षात घेऊन, समूहात आमूलाग्र परिवर्तन करण्याचे काम रतन टाटा यांनी सुरू केले. जेआरडी पर्वात रुसी मोदी हे टाटा स्टील, दरबारी सेठ हे टाटा केमिकल्स व टाटा टी आणि अजित केरकर हे इंडियन हॉटेल्सचे प्रमुख म्हणून वर्षानुवर्षे पदभार सांभाळत होते. रतन टाटा यांनी सूत्रे हाती घेतल्यावर समूहातील कंपन्यांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी नेतृत्वातही बदल करण्याचा निर्णय घेतला गेला. ज्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचे वय पंच्याहत्तरीपलीकडे गेले आहे, त्यांनी निवृत्त व्हावे, असा निर्णय घेऊन रतन टाटा यांनी रुसी यांना निवृत्त केले. दरबारी सेठ हे जेआरडींच्या जवळचे; पण त्यांनाही घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या सहस्रकाच्या सुरुवातीला टाटा टीने ‘टेटली’ ही ब्रिटनमध्ये स्थापन झालेली चहाची कंपनी ताब्यात घेतली. मग, सुमारे तीन डझन छोट्या-मोठ्या कंपन्या टाटा समूहाने पंखाखाली घेतल्या. पोलाद उत्पादन करणारी ‘कोरस’ ही जगद्विख्यात अँग्लो-डच कंपनी छत्राखाली आणण्याचे कसबही रतन टाटा यांनी दाखवले.
ब्रिटनमधील ‘जग्वार’ आणि फोर्ड मोटर्सची ‘लँड रोव्हर’ या ख्यातनाम कंपन्या वर्चस्वाखाली आणण्याचा त्यांचा निर्णय धाडसी होता. जग्वार आणि लँड रोव्हर या कंपन्यांचे ‘टाटा मोटर्स’मधील विलीनीकरण मात्र यशस्वीपणे पार पडले आणि मग त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. व्यापारी वाहनांचे उत्पादन करणार्या टाटा मोटर्सने रतन टाटा यांच्या कारकिर्दीतच प्रवासी वाहनांचे उत्पादन सुरू केले. सामान्य मध्यमवर्गीयाला परवडेल अशी ‘नॅनो’ कार तयार करण्याचा त्यांचा निर्णयही दूरदर्शीपणाचा होता. भारतीय बनावटीची इंडिका ही कार आणण्याची कल्पकता रतन यांनी दाखवली. ‘टीसीएस’सारखी कंपनी 2004 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाली ती रतन टाटा यांच्या काळातच. त्यानंतर शेअर बाजारातील दुसर्या क्रमांकाची सर्वाधिक ‘व्हॅल्युएबल कंपनी’ म्हणून तिचा लौकिक निर्माण झाला. वयाची पंच्याहत्तरी गाठल्यानंतर खुर्चीला चिकटून न बसता निवृत्त होण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. सायरस मिस्त्री यांची वारसदार म्हणून निवड त्यांनी केली; पण टाटा समूहाचा विस्तार आणि नवीन क्षेत्रात पदार्पणावरून उभयतात मतभेद झाले. त्यामुळे मिस्त्री यांना दूर करून हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा रतन टाटा यांना हाती घ्यावी लागली आणि एन. चंद्रशेखरन यांची ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष म्हणून निवड केली गेली. रतन यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले आणि तरुण उद्योजकांच्या कंपन्यांमध्ये व्हेंचर कॅपिटलही ओतले. महिलांना काम करण्यास उत्तेजन देण्याच्या द़ृष्टीने, मध्यमवयातील स्त्रियांना नोकरीत सामावून घेण्याचा उपक्रम टाटा समूहात त्यांनी राबवला.
रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात देशभर वायफाय सेवा असावी, यासाठी केंद्र सरकारने विनंती करताच त्यासाठी सर्व ती आर्थिक मदत रतन टाटा यांनी केली. या गोष्टीचा असंख्य गोरगरीब तरुणांनाही अभ्यासासाठी फायदा झाला आहे. कंपनीतील आजारी कर्मचार्याला भेटण्यासाठी थेट पुण्याला त्याच्या घरी जाणारा हा माणूस, अनेक सामाजिक संस्थांना मदतीचा हात देणारी ही व्यक्ती कमालीची दानशूर होती. त्यांच्या घरात नोकरांचा थाट किंवा बडेजाव नव्हता. ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा त्या परिसरातील गोरगरीब फेरीवाले व अन्य लोक त्यात जखमी झाले वा बळी पडले, त्यांना रतन टाटा यांनी मदत केली. कोरोनात सरकारला दीड हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य तर त्यांनी दिलेच शिवाय लोकांवर उपचार करणार्या डॉक्टर्सना राहण्यासाठी त्यांनी आलिशान हॉटेलचे दार उघडे ठेवले. पैशाने श्रीमंत असणारी व अविर्भाव दाखवणारी माणसे अनेक; पण खर्या अर्थाने मनाने श्रीमंत असलेले उद्योगपती अपवादात्मकच. कृतिशील सामाजिक भान आयुष्यभर जपणारे आणि देशहिताचा विचार करणारे रतन टाटा साधे, निगर्वी होते. सामान्य माणसासाठी आणि व्यापक समाजहितासाठीच्या दातृत्वाने त्यांनी सर्वांनाच दीपवले. हे अनमोल ‘रतन’ हरपले. ते आपल्यातून निघून गेल्याने देशाचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. भारतमातेच्या या अनमोल रत्नास भावपूर्ण श्रद्धांजली!