

शफीक देसाई
रमजान महिन्यातील कठोर साधना, आत्मपरीक्षण आणि आचरणातून इस्लामचे तत्त्वज्ञान अधिक सखोलपणे समजून घेण्याची संधी मिळते. आज रमजान ईद. त्यानिमित्त...
इस्लामचे तत्त्व व व्यवहार याचा काटेकोर अभ्यास, आचरण व सराव रमजान महिन्यात करण्यात त्याचे अनुयायी खडतर प्रयत्न करत असतात. अर्थातच इस्लामचे तत्त्वज्ञान समजून घेण्याचा, अभ्यास व चिकित्सा करण्याची बाब यामध्ये आलीच. इस्लामचा अनुयायी रमजानच्या या कठोर परीक्षेमध्ये उतरतो. सोने ज्याप्रमाणे भट्टीमध्ये तावून सुलाखून निघाल्यानंतर जसे उजळून निघते तसेच इस्लामचा अनुयायी या खडतर सरावातून सोन्याप्रमाणे उजळून निघतो. ज्याप्रमाणे मुहम्मद पैगंबर यांनी आपले उदात्त चारित्र्य घडवले त्याप्रमाणे इस्लामचा अनुयायी आचार, विचार व नीतिमत्तेच्या वरच्या पातळीवर पोहोचतो, आपले व्यक्तिमत्त्व घडवतो आणि मानवी जीवनाचे सर्व सोपस्कार व व्यवहार यथायोग्य पार पाडण्यास सक्षम ठरतो.
इस्लामला निसर्ग नियमांशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हणूनच त्याला ‘दीन ए फितरत’ असे म्हटले जाते. निसर्गतः माणूस मुक्त, स्वतंत्र, आपल्या मर्जीनुसार व कौशल्याने जीवन जगत असतो. समाजात त्याच्यावर वेगवेगळी बंधने लादली जातात. स्वातंत्र्याबरोबरच नैसर्गिकपणे न्यायाच्या व नीतीच्या गोष्टी इस्लामने आपल्या अनुयायांना बहाल केल्या आहेत. त्यामुळे एक प्राकृतिक धर्म म्हणून इस्लाम आचरणास अतिशय साधा, सरळ व सोपा मार्ग दाखवतो. माणसावर कोणतेही असह्य, अमानवी बंधन लादत नाही. बुद्धी, मन, विचार आणि शरीराची शुद्धता व पावित्र्य राखत श्रेष्ठतम सत्कर्म, सदाचार आणि सदव्यवहार याचा अंगीकार करून इस्लामच्या सत्य, न्याय आणि नीतीच्या उच्च व उदात्त ध्येयाप्रत जाणे हा रमजान महिन्याचा उद्देश आहे.
आपणा सर्वास माहीत आहे की, इस्लामचे सर्वात महत्त्वाचे पायाभूत तत्त्व म्हणजे ‘एकेश्वरवाद’ होय. जगातल्या सर्वात मोठ्या मोठ्या विद्वान, तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञांनीसुद्धा विश्वाच्या निर्मितीमधील परमतत्त्व व शक्ती म्हणून एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला आहे. विज्ञानालासुद्धा अद्याप विश्वनिर्मितीचे गूढ सापडलेले नाही. इस्लामच्या पूर्व काळात अनेक देवदेवता, मूर्तिपूजा, वस्तू व स्थळ पूजा, पशुपक्षी व निसर्ग पूजा, स्वयंघोषित देव व बुवाबाजी यांचा सुळसुळाट माजला होता. यातून दैववाद, अंधश्रद्धा, चमत्कार, कर्मकांड पशुबळी व मानवबळी, स्त्रीदास्य, गुलामगिरी अशा अनेक वाईट रुढी, प्रथा व परंपरांनी थैमान घातले होते. समाज दुभंगून गेला होता व द्वैत निर्माण झाले होते. इस्लाम आणि पैगंबरांनी अशा वाईट गोष्टींना अक्षरशः तडाखा देत दुरुस्त व सरळ केल्या. संपूर्ण समाज एकेश्वरवादाच्या कृपाछायेखाली आणला. याबाबत कोणत्याही किंतु-परंतु व शंका-कुशंकांना वाव ठेवला नाही. एकच एक परमईश्वराचा जयघोष केला. यामुळे समाजातील सर्वप्रकारचा भेदभाव, उच्चनीचता, श्रेष्ठ -कनिष्ठता, आपलेपणा-परकेपणा आणि सर्व प्रकारचा द्वैतवाद संपुष्टात येऊन सर्व समाज एक झाला. समाजात ऐक्य निर्माण झाले.
इस्लाम आपल्या अनुयायांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाची शिकवण देतो. यामध्ये स्त्री-पुरुष असाही भेदभाव न करता समानता व बरोबरीने राहिले पाहिजे अशी इस्लामची सक्त ताकीद आहे. इस्लामच्या पूर्वी इतिहासात स्त्रियांना एक माणूस म्हणून कोणतेही स्थान व दर्जा नसताना इस्लामने स्त्रियांचा सन्मान केला. त्यांना बरोबरीचे हक्क व अधिकार प्राप्त करून दिले. त्याला नैतिक व धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले. इस्लामचा संपूर्ण आचार, विचार व व्यवहार हा सत्य, न्याय व नीतीला आधार मानून केला जातो. किंबहुना सत्य, न्याय व नीती हेच परमेश्वराचे आणि इस्लामचे अधिष्ठान आहे. निव्वळ परमेश्वराची भक्ती व अध्यात्मातून तुमचे जीवन सफल होणार नाही. तुमच्या स्वतःच्या उन्नतीबरोबरच समाजाची उन्नती व कल्याणाचा विचार तुम्हाला अनिवार्यपणे करायला पाहिजे. केवळ दिन दुबळ्यांची सेवाच नाही, तर अन्याय, अत्याचारितांसाठी लढायला उभे राहिले पाहिजे. तन, मन व धन अर्पूण मानवसेवा आणि समाजकल्याण या माध्यमातून तुम्हाला चांगले जग निर्माण करावे लागेल. तुमच्या व्यक्तिगत जीवनाचे अंतिम मूल्यमापनसुद्धा सामाजिकतेच्या मोजमापाने होईल, ज्यामुळे शांती, सौहार्द, सद्भावना, सामाजिक ऐक्य व परस्पर सहजीवनाची बीजे समाजामध्ये रुजतील.