

खान्देशातील उपेक्षित चित्रकार आणि शिल्पकारांचा शोध घेऊन हे अदृश्य चेहरे समाजासमोर ठळकपणे मांडणारे चित्रकार, कवी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. हा मराठी लेखकाचा जसा सन्मान तसाच भाषेचाही. अभिजातपणाचा मुकुट मिरवत असताना ती टिकवून ठेवण्याची धडपड करणाऱ्या लेखकाला त्यामुळे बळ मिळाले. माणसाच्या जगण्याचे संदर्भ बदलले, ते अधिक गतिमान झाले.
गावकुसाबाहेर राहणाऱ्या माणसाच्या वेदनेचा पोत बदलला, तरी स्वर तोच. त्याचे दु:ख, दुखणे आणि त्यातून उगवणाऱ्या संघर्षाचा शोध घेणारा, त्याची उलगडून मांडणी करणारा हा संवेदनशील चित्रकार. कलेलाही चार भिंतीत बांधण्याचे, चौकटबद्ध करण्याचे आणि तिला विखारी हेतूंचे साखळदंड बांधण्याचे अखंड प्रयत्न सुरू असताना बाविस्कर यांचा साहित्य अकादमीने गौरव होत आहे. हा उपेक्षित आणि जगण्याच्या लढाईत हार न पत्करता सतत नव्या हिमतीने, जिद्दीने उभे राहणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसासाठी आनंदाचाच क्षण.
राजू बाविस्कर जळगाव जिल्ह्यातील लासूरचे. बँडवाला, टोपल्या विणण्याचे काम करणारा हा माणूस वंचितांचा प्रतिनिधी. जळगावच्या पी. एम. मुंदडा शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झालेला हा कवी, चित्रकार तसा वर्तमानाबद्दल अस्वस्थ. त्यांच्या चार वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘काळ्या निळ्या रेषा’ आत्मकथनाला हा पुरस्कार मिळाला. हे पुस्तक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एमए मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. अस्वस्थ जगण्याच्या कॅनव्हासवर त्यांनी या ‘काळ्या- निळ्या रेषा’ चितारल्या. वाचकांच्या नजरेआड असलेले हे आत्मकथन या पुरस्काराने उजेडात आले. अर्थात, त्यावरची चर्चा, समीक्षा होत राहील; मात्र या निमित्ताने या साहित्यकृतीची, वेशीबाहेरच्या लेखकाची घेतली गेलेली नोंद महत्त्वाची ठरते.
आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणारा हा लेखक या काळ्या-निळ्या रेषांतून कशाचा शोध घेत असावा? त्यातील कृष्ण छटा या दुःख आणि शोषणाचे प्रतीक, तर निळा रंग मुक्तीचा मार्ग दाखवणारा. समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा आयुष्यभर आग््राह धरणाऱ्या त्यांच्या लिखाणावर अस्सल खान्देशी मातीचा आणि अहिराणी बोलीचा प्रभाव. आपल्या कवितांतून दलित, शोषितांच्या जगण्यातील दाहकता ठळकपणे मांडणाऱ्या या कवीचे हे आत्मकथन. कष्टकरी कुटुंबात जन्मलेले आणि सततच्या संघर्षातून उपेक्षेतून उभे राहिलेल्या आणि वास्तवाचे चटके सोसलेल्या ‘नाही रे’ घटकांचा हा नायक. त्याच्या अस्सल समृद्ध आणि सूक्ष्म जाणिवांचा आलेख या आत्मकथनातून वाचायला मिळेल.
कलेबद्दल नितळ आणि स्पष्ट दृष्टिकोन, थेट काळजाला भिडणारी संवादी भाषा, वेदनेला दिलेले कलात्मक आणि सौंदर्यशास्त्रीय परिमाण ही त्यांची खास शैली. कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा न करता संयत आणि विवेकी मांडणी हे त्यांचे लेखनाचे वैशिष्ट्य. तशा अर्थाने गावकुसाबाहेरील या लेखकाचा साहित्य अकादमी पुरस्काराने मोठा गौरव झाला आहेच. एक कसदार आत्मकथन वाचकांसमोर आले. हा कवडसा नवलेखकांना प्रेरणा देत राहील.