Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj | द्रष्टे शासक : राजर्षी शाहू महाराज

Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj |
Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj | द्रष्टे शासक : राजर्षी शाहू महाराज
Published on
Updated on

विशाखा जितकर

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे, पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्त...

रयतेचे कल्याण हेच आपल्या कारभाराचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे ही शिवछत्रपतींची भावना मनोमनी जागृत ठेवून आपल्याला मिळालेला राज्याधिकार हा राजवैभव व राजविलास यांचा उपभोग घेण्यासाठी नसून तो आपल्या गरीब व अज्ञानी जनतेच्या उद्धारासाठी आहे ही लोककल्याणकारी, प्रजावत्सल राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची अंतरीची तळमळ होती.

राज्यारोहणानंतर एक ते दीड वर्षातच शाहू महाराजांना दोन भयंकर संकटांना सामोरे जावे लागले. पहिले म्हणजे दुष्काळ आणि दुसरे प्लेगची साथ. तिथे त्यांच्या प्रशासन कौशल्याची कसोटी लागली. भास्करराव जाधवांसारख्या एकनिष्ठ व कर्तबगार अधिकाऱ्याच्या सहकार्याने, अथक परिश्रमाने १८९६-९७ व १८९९-१९०० दोन्ही दुष्काळांत निराधार आश्रम आणि पाळणाघरांची उभारणी करून ५० हजार निराधार लोकांना जीवनदान देण्याचे मानवतावादी समाजकार्य शाहू राजांनी केले. खामगाव येथील अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या अकराव्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना शाहू महाराज म्हणाले, ‘शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्‍नती झाली नाही. अज्ञानाने बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी वीर कधीही निपजणार नाहीत म्हणून सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानाला अत्यंत आवश्यकता आहे.’

२५ जुलै १९१७ रोजी शाहू राजांनी मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आदेश जारी केला. ग्रामीण भागातील मुलांना प्राथमिक शिक्षणानंतर, माध्यमिक व उच्च शिक्षणाची सोय होण्यासाठी त्यांनी निरनिराळ्या जातींची वसतिगृहे काढली. जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना एक रुपया दंड ठोठावला. धार्मिक कार्याच्या शिक्षणासाठी सत्यशोधक व वैदिक पाठशाळेपासून कार्यालयीन कामकाजाच्या पद्धतीचे शिक्षण देणार्‍या पाठशाळांपर्यंत आणि लष्करी शाळेपासून तांत्रिक शिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूटपर्यंतच्या शैक्षणिक क्रांतीच्या विकास वाटा जनसामान्यांसाठी खुल्या करण्याचे अमूल्य कार्य शाहू महाराजांनी केले. कोल्हापूरला ‘मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस,’ असे संबोधले जाते. या वसतिगृह चळवळीतून हजारो मुले गेल्या १०० वर्षांत शिकून पुढे आली. शाहू महाराजांनी संस्थानाबाहेर नाशिक, नागपूर येथील अस्पृश्यांच्या अनेक वसतिगृहांनाही अर्थसाहाय्य केले.

शाहू महाराजांनी जातिभेद निर्मूलनाकरिता ठोस भूमिका घेतली. एक संस्थानिक मागासवर्गीयांच्या उन्‍नतीकरिता राजगादीचा नि:संकोचपणे त्याग करण्याची तयारी ठेवतो, तो संस्थानिक रुढार्थाने राजा नसतो. तो असतो ‘माणसातील राजा व राजातील माणूस.’ जातीच्या नावाखाली भरणाऱ्या जात परिषदेतून जाती भक्कम होण्याचा धोका या दूरदृष्टीच्या राजाने वेळीच ओळखला होता म्हणून जातीच्या पुढार्‍यांना ‘आपली दृष्टी दूरवर ठेवा, पायापुरते पाहू नका,’ असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. महाराजांनी भारताची राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी ४८ वर्षे आणि आजपासून १२३ वर्षांपूर्वी २६ जुलै १९०२ रोजी आपल्या संस्थानात ५० टक्के राखीव जागा ठेवल्या होत्या. भारतातील राखीव जागा ठेवणारा हा बहुदा पहिलाच कायदा असावा. विसाव्या शतकातील एक संस्थानिक भारतीय समाजातील मानवनिर्मित विषमता दूर करण्यासाठी आपला देह झिजवतो, हे अपवादात्मक उदाहरण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे ‘राष्ट्रीय नेतृत्व’ उभे करण्यात शाहू महाराजांनी केलेली सुरुवातीची पायाभरणी निश्चितच मोलाची आहे. कोणताही सामाजिक बदल केवळ प्रबोधन करून पूर्णत्वास जात नाही, तर त्याला कायद्याची जोड लागते. याकरिता अस्पृश्यता निर्मूलनासाठी सर्व पातळीवर हुकूम, आदेश, कायदे, जाहीरनामे काढत व त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवली. ‘समतेचे शहर’ ही कोल्हापूरची ओळख फक्त शाहू महाराजांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यातून निर्माण झाली. शाहू महाराजांनी आपल्या हयातभर, जातिभेद व अस्पृश्यता या दोन्ही सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अस्पृश्यता हे जातिभेदाचेच विकृत स्वरूप असल्याचे त्यांनी अनेकदा जाहीर केले होते. अस्पृश्यांच्या मुलांचे उपनयन करून त्यांना ‘वेदाची संथा’ देणारा आणि त्यांना ब्राह्मणांच्या तथाकथित श्रेष्ठ दर्जावर आणून ठेवणारे शाहू राजे हे हिंदुस्थानच्या इतिहासातले पहिले राजे होय. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या हजेरी आणि वेठवरळा या अमानुष सामाजिक गुलामगिरीच्या शृंखलेतून पददलितांना मुक्त करण्याचे कार्य राजांनी केले.

महाराजांच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याविषयी धनंजय कीर म्हणतात, ‘शाहूंच्या या अलौकिक प्रेमामुळे व निष्ठेमुळे त्यांना मागासवर्गीय व पददलित देवासमान मानत होते. गौतम बुद्ध, महात्मा फुले व आंबेडकर यांना ते जसे पूजनीय मानीत तसेच शाहू राजांना ते आपला उद्धारकर्ता म्हणून पूजनीय मानीत!’

‘वेदोक्त’ प्रकरण जेव्हा कोल्हापूर संस्थानात धुमसत होते, त्यावेळी अहंकारी पुरोहितशाहीच्या विळख्यातून आपल्या जातीस सोडवण्याचे विचार महाराजांच्या मनात उत्पन्‍न होत होते. दैवज्ञ सोनार, शेणवी, लिंगायत जैन या जातीच्या लोकांनी ब्राह्मणी पुरोहितशाहीचे जोखड फेकून देऊन स्वतःचे धर्मगुरू निर्माण केले. तसे मराठ्यांनीही का करू नये, असा विचार त्यांनी एका पत्रात व्यक्त केला आहे. वर्णवर्चस्वाविरुद्ध महाराजांचा जो सतत संघर्ष चालू होता, त्यामध्ये छात्रजगद्‌गुरुपदाची निर्मिती हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. त्यांची ही कृती म्हणजे महाराष्ट्रातील पुरोहितशाहीला दिलेला जबरदस्त धक्का होता. सत्यशोधक पुढारी व शाहू चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे, थोर साहित्यिक वि. द. घाटे व प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा. न. र. फाटक यांनी शाहू महाराजांच्या या कार्याची, युरोपातील प्रोटेस्टंट बंडखोर सुधारकांच्या कार्याशी तुलना करून त्यांच्या या धाडसी कार्याचा गौरव केला आहे.

१९०२ मध्‍ये महाराजांनी आपल्या संस्थानासाठी अपूर्व असे ‘सार्वत्रिक पाटबंधारे धोरण’ जाहीर केले. त्यासाठी लवकरच स्वतंत्र पाटबंधारे खाते निर्माण करून त्यावर इरिगेशन ऑफिसरची नेमणूक करण्यात आली. वारंवार पडणाऱ्या दुष्काळासारख्या संकटावर कायमची मात करण्याची पायाभूत योजना त्यांनी तयार केली. भोगावती नदीचा जलप्रवाह अडविणाऱ्या धरणाची महत्त्वाकांक्षी योजना; जी पुढे कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी ठरली आणि या योजनेतूनच कोल्हापूर संस्थानात हरितक्रांतीचा प्रारंभ झाला. १९१२ मध्‍ये कोल्हापुरात ‘किंग एडवर्ड ॲग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट’ ही स्वतंत्र शेती संस्था स्थापन केली. सुधारित अवजारांचे एक म्युझियम उघडलेे. महाराजांच्या कारकिर्दीत शेती व जनावरांची प्रदर्शने भरत. आदर्श शेतीचे प्रयोग करून दाखवले जात.

स्वातंत्र्यानंतर उपयुक्त ठरलेल्या सर्व प्रयोगांची बीजे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत आढळतात. सहकार तत्त्‍वाचा पुरस्कार करत अनेक उद्योगधंद्यांना चालना दिली. आज सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या विविध उद्योग-व्यवसायांमुळे कोल्हापूर जिल्हा शेती, दूध क्षेत्रात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. उद्योगांसाठी प्रशिक्षित कामगार तयार व्हावेत म्हणून राजाराम इंडस्ट्रियल स्कूल स्थापन करण्यात आले. लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना व उद्योजकांना काही प्रसंगी अल्पमुदतीची कर्जे सरकारकडून देण्याची व्यवस्था त्यावेळी केली तसेच संस्थानाबाहेरच्या उद्योजकांनाही महाराजांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सहकार्य केल्याची उदाहरणे सापडतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news