

उमेश काळे
मराठवाड्याकडे पावसाने डोळे वटारल्याचे दिसते. पावसाची पहिली चारही नक्षत्रे फारशी दिलासादायक नव्हती. जायकवाडी वगळता अन्य प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा नाही. आगामी काळात पाऊस पडलाच नाही, तर गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
रो हिण्या कोरड्या गेल्या, मृगामध्ये पावसाचे आगमन झाले नाही, आर्द्रा, पुनर्वसू नक्षत्रात काही भागांत थोडाफार पाऊस झाला. एकंदर विचार केला, तर पावसाच्या नऊपैकी चार नक्षत्रांनी तसा मराठवाड्याला दगा दिला असेच चित्र आहे. आता उरलेल्या पाच नक्षत्रांत पावसाने साथ दिली, तर मराठवाड्याची दुष्काळसदृश परिस्थितीकडे चालू असणारी वाटचाल थांबेल. गतवर्षी नको-नको म्हणावी एवढी पर्जन्यवृष्टी झाली होती. आता अर्धा जुलै संपला, तरी सर्वदूर पाऊस झाला नाही. मुंबई, कोकण, पुण्यात या महिन्यात पावसाचे जोरदार आगमन झाले असताना या विभागात मात्र काही मोजकी गावे वगळता कुठेही पावसाचा थेंबही नव्हता. परिणामी, अजून अनेक शेतकर्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत. सरकारी आकडे ६४ टक्के पेरण्या दर्शवित असले, तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. ज्या शेतकर्यांनी पेरण्या केल्या, त्यांना आता दुबार पेरण्या कराव्या लागतात की काय, असे दिसत आहे.
२०२४, २०२५ या दोन वर्षांत चांगला पाऊस पडलेला असताना यंदा मात्र पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होण्याची भीती आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा झालेला विसर्ग जायकवाडी धरणाला लाभदायक ठरला. जायकवाडीत आजमितीला ३१ टक्के पाणीसाठा असल्याने संभाजीनगर व अन्य काही शहरांना टंचाईला फारसे तोंड द्यावे लागणार नाही; पण शेतीला बंधार्यातून होणार्या पाणीपुरवठ्याचे काय? लातूर, बीडला पाणीपुरवठा करणार्या माजलगाव, मांजरा या धरणात १५ ते १६ टक्के पाणी आहे. नांदेडमधील विष्णुपुरी, निम्न मनार या प्रकल्पात ३५ ते ४० टक्के पाणीसाठा आहे. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण कोरडे असून, येलदरीत पन्नास टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. मोठ्या प्रकल्पांचा विचार केला, तर गतवर्षी या कालावधीत ५६ टक्के साठा असताना यंदा हे प्रमाण ३२ टक्क्यांवर आहे. मध्यम प्रकल्पात मागील वर्षी २९, लघू प्रकल्पांमध्ये २२ टक्के पाणीसाठा प्रमाण असताना यंदा हे प्रमाण १८ आणि १५ टक्के आहे. साहजिकच धरणावर विसंबून असणारे शेती, पिण्याच्या पाण्याबाबत धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड या पाच जिल्ह्यांतील १०३ गावे, ८४ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. संभाजीनगरसारख्या शहरात पाण्याचा खंड हा आठ ते दहा दिवसांचा झाला असून, अन्य शहरांतील लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पावसाने आपला रुसवा कायम ठेवल्यास ग्रामीण भागात भयावह स्थिती निर्माण होईल आणि रोजगारासाठी लोक शहराकडे धाव घेतील. बीड जिल्ह्यातील अशोक माने या युवा शेतकर्याने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना थेट मोबाईल करून पावसाअभावी शेती संकटात असून, लग्न जमत नसल्याची व्यथा मांडली आहे. कर्जमाफीतील जाचक अटी कमी कराव्यात, सरसकट माफी करावी अशी मागणी त्याने केली आहे. यावरूनच या विभागातील दुष्काळी प्रश्नांची तीव्रता लक्षात येते. आता शासकीय आकडेवारी पाहता मराठवाड्यात पावसाची तूट काळजी करावी अशीच आहे. सर्वाधिक तूट हिंगोली जिल्ह्यात ५४ टक्के असून बीडमध्ये ४६, जालना ३९, नांदेड आणि परभणी ३७, लातूर ३३ अशी तूट आहे. संभाजीनगर जिल्ह्यात फक्त १८ टक्के जास्त पाऊस आहे. कमी पावसाचे भाकित यावर्षी सरकारी पातळीवरही बोलले जात होते.
अल निनोचा इशारा मे महिन्यातच मुख्यमंत्र्यांनी देऊन ठेवला होता. वृक्षतोड, पर्यावरण संरक्षणाकडे दुर्लक्ष, उसाची बेसुमार लागवड आदी अनेक कारणे या स्थितीला सांगितली जात असली, तरी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तसा मराठवाड्याला दुष्काळ नवा नाही; पण कधी शेतकरी समाधानाने भरून पावेल असा पाऊस होतो, तर कधी निराशेने ग्रस्त होईल अशी स्थिती समोर उभी राहते. अशा दुष्टचक्रात मराठवाडा सापडला आहे. त्यामुळे दुष्काळावरून आता राजकारणही चांगलेच रंगेल. शेतकरी कर्जमाफीसाठी जून महिन्यात खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संभाजीनगरात रास्ता रोको केला होता. दुष्काळी स्थिती राहिली, तर शेतकर्यांना मदत व अन्य मागण्यांसाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी विरोधकांनीही सरकारचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. अजून पावसाचे तसे अडीच महिने बाकी आहेत. आषाढीसाठी पंढरीला मोठ्या प्रमाणात गेलेल्या वारकर्यांमध्ये याक्षणी तरी विठुराया, पाऊस पडू दे..! दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, अशीच भावना आहे.