Raigad Development Plan | रायगडाच्या पुनरुत्थानाचे पर्व

Raigad Development Plan |
Raigad Development Plan | रायगडाच्या पुनरुत्थानाचे पर्व
Published on
Updated on

शशिकांत सावंत

रायगडावर उत्खननात सापडलेल्या अवशेषांच्या आधारे ६२० कोटी रुपयांच्या प्रकल्पातून रायगडाचे वैभव पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

गेली तीन वर्षे सुरू असलेले किल्ले रायगडावरील उत्खनन, त्यात सापडलेल्या ऐतिहासिक वस्तू आणि आता सुरू होत असलेले किल्ले संवर्धन, यामुळे या किल्ल्याला नवी झळाळी येणार आहे. रायगडावर उत्खननात सापडलेले ३८० ऐतिहासिक दगड, जुनी भांडी आणि जुन्या वापरातल्या वस्तू हे गतवैभव पुन्हा नव्याने याच किल्ल्यावर पाहायला मिळणार आहे. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी ६२० कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामधून उत्खनन आणि नवीन बांधकाम, अशी दोन्ही कामे केली जात असल्याने या मराठी राज्याच्या राजधानीच्या किल्ल्याचे गतवैभव पुन्हा उभे राहण्याची आशा निर्माण झाली आहे.

‘युनेस्को’ने या किल्ल्याला मानांकित केल्यानंतर जागतिक निकषाप्रमाणे हे संवर्धन होणार आहे. जुन्या वास्तू जतन-संवर्धनाच्या नियमांना अधीन राहून किल्ल्याचे संवर्धन केले जात असल्याचे कॉन्झर्व्हेशन आर्किटेक वरुण भामरे यांनी सांगितले आहे. संवर्धन टीमेच ते प्रमुख आहेत. या किल्ल्याच्या दरवाजांची झालेली पडझड नव्याने दुरुस्त होणार आहे. याच दरवाजाचे ३५० दगड उत्खननात सापडले. दरवाजाचे बांधकाम करताना त्या काळात वापरलेले दगड पुनर्प्रस्थापित करण्यात येणार आहेत. या बांधकामासाठी उडीद डाळ, जवस, गूळ आणि चुना तसाच वापरून या दरवाजाची भिंत उभी केली जाणार आहे. सिमेंट काँक्रीटीकरण त्या बांधकामात असणार नाही. त्यामुळे हे बांधकाम जुन्या आठवणी जागे करणारे ठरेल.

किल्ल्याच्या उत्खननापूर्वी एरियल मॅपिंग केले होते. यात किल्ल्यावर त्यावेळी ३०० वाडे आणि ८४ तलाव असल्याचे आढळून आले. यावरून रायगडावरील त्यावेळची समृद्धता लक्षात येते. आतापर्यंत ६ वाड्यांचे उत्खनन पूर्ण झाले असून त्यात ऐतिहासिक शेकडो अवशेष सापडले आहेत. यात ८०० विविध वस्तूंचा समावेश आहे. कौले, भांडी, दागिने अशा वस्तू सापडल्या. किल्ल्यावरील अतिक्रमणामुळे काही वस्तू गायब झाल्या असल्या, तरी मिळणाऱ्या वस्तू पुन्हा पुनर्स्थापित करण्याचा या किल्ले संवर्धनाचा उद्देश आहे. रायगडावर ६ तलावे आज दिसतात. उर्वरित तलावांचेही संवर्धन होणार आहे. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’चा खरा मूलमंत्र त्याकाळात जोपासला गेला, त्यामुळे सिंचन प्रकल्पांसाठी रायगडावरील पाणीस्रोताचे संवर्धन मार्गदर्शक ठरणारे आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास तेवढ्या समक्षमतेने पुढे यावा, यासाठी हे संवर्धन केले जाणार आहे, असे प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान, गंगासागर तलाव, स्वयंपाकघर, भवानी वाडा, देवघर, त्या काळातील गॅलरी, मुख्य दरवाजा, राणी महल, राजबाग, बाहेरचे मनोरे, टेहळणी बुरूज, टांकसाळ, धान्य कोठारे, खलबतखाना, हमामखाना, राजसभा अशा त्या काळच्या वास्तू उभ्या करून दाखवण्याचा या प्रकल्पात प्रयत्न असणार आहे. याबरोबरच त्यावेळचे शस्त्रागार, कोषागाराची जागा, सचिवालय, त्यावेळचा राजवाडा, उत्तरद्वार, दक्षिणद्वार आणि इतर दरवाजे अशा विविध गोष्टी येथे उभ्या करता आल्या, तर किल्ले संवर्धनाला एक नवा आयाम मिळेल. यासाठी वाढीव निधीची मागणी प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी वेग वाढवला पाहिजे आणि कालबद्ध वेळेत ते संवर्धन पूर्ण व्हावे, अशी भूमिका प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी घेतली आहे. रायगडाचा इतिहास पुन्हा जागा करण्यासाठी आता नव्याने सुरू असलेले उत्खनन आणि संवर्धन पूर्ण झाले, तर यातून मोठी स्फूर्ती मिळण्यास मदत होईल, अशी भूमिका इतिहासप्रेमींची आहे.

रायगड परिसरात अतिवृष्टीमुळे मागील काही वर्षांत दरडी कोसळल्या. पायरी मार्ग बंद झाला. तो आता पुन्हा नव्याने सुरू केला आहे. आताची संवर्धन मोहीम ही अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली पाहिजेत. यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन होणार आहे. याची सध्या तरी प्रतीक्षाच आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी कृती आराखडा तयार केला जाईल, यासाठी उच्चस्तरीय बैठक मुख्यमंत्र्यांसमवेत होईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले आहे. रायगड सीसीटीव्हीच्या नजरेत ठेवण्यात आला आहे. हे संवर्धन अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नेत्यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news