Quit India Movement | तेजाळलेला क्रांतिदिन

1942 मध्ये चलेजाव चळवळ झाली. स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनाचा हा शेवटचा टप्पा होता. इतर सर्व आंदोलनांपेक्षा ही चळवळ खूपच वेगळी होती.
Quit India Movement
तेजाळलेला क्रांतिदिन(Pudhari File Photo)
Published on
Updated on
Summary

विलास कदम

1942 मध्ये चलेजाव चळवळ झाली. स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनाचा हा शेवटचा टप्पा होता. इतर सर्व आंदोलनांपेक्षा ही चळवळ खूपच वेगळी होती. महात्मा गांधींसह इतर महत्त्वाचे नेते तुरुंगात असल्याने या चळवळीला एक असा नेता नव्हता. भूमिगत नेते आणि कार्यकर्ते ही चळवळ चालवत होते. अंतिम टप्प्पात आलेले स्वातंत्र्य आंदोलन या शेवटच्या लढाईत तेजाळून निघाले. योगायोगाची गोष्ट म्हणजे, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दोन महत्त्वाचे दिवस येतात. नऊ ऑगस्ट हा बेचाळीसच्या लढ्यानिमित्त साजरा होणारा क्रांतिदिन आणि 15 तारखेला स्वातंत्र्यदिन.

मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी म्हणजे ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकारला ‘छोडो भारत-चले जाव’चा इशारा दिला आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एका अखेरच्या पण महत्त्वाच्या आंदोलनाला प्रारंभ झाला. या दिवशी महात्मा गांधी यांच्यासह पंडित नेहरू, मौलाना आझाद यांच्यासारखे नेते उपस्थित होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्याचा निर्णय घेऊन त्यांना ‘चले जाव’चा इशारा दिला. त्यावेळी पंडित नेहरूंनी केलेले भाषणही प्रेरणादायी होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, ‘या लढ्यात आता माघार नाही. यामध्ये आम्ही विजय मिळवून आझाद हिंदुस्थानच्या भूमीवर उभे राहू. अन्यथा खवळलेल्या महासागरात स्वत:ला झोकून देऊन नाहीसे होऊ.’ ‘करेंगे या मरेंगे’ ही निर्वाणीची घोषणा करून त्यांनी जनमानसाच्या अंत:करणात क्रांतीची प्रखर ज्योत पेटवली.

8 ऑगस्टच्या मध्यरात्री महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाली. ही बातमी वार्‍यासारखी पसरली आणि 9 ऑगस्टला मुंबईसह अनेक ठिकाणी जनक्षोभ उसळला. महात्मा गांधी यांनी दिलेला मंत्र सार्‍या देशभर पसरला होता. त्यामुळे या दिवशी जणू क्रांतीची ज्योतच पेटली होती. देशभरात ब्रिटिश सत्ता हाकलून लावण्यासाठी प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. त्यामुळे ब्रिटिश सत्तेच्या पाचावर धारण बसून ती हादरून गेली होती. ही सारी परिस्थिती कशी रोखायची, असा प्रश्न ब्रिटिशांसमोर निर्माण झाला. महात्मा गांधी यांना अटक झाली त्यावेळी त्यांनी आता प्रत्येकजण पुढारी होईल, असा संदेश जनतेला दिला.

Quit India Movement
Editorial : जी-20 आणि भारतीय शेती

मुंबईतील गोवालिया टँक अर्थात ऑगस्ट क्रांती मैदान या सार्‍या ऐतिहासिक लढ्याची साक्ष बनले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा शेवटचा टप्पा या मैदानावर सुरू झाला. दि. 9 ऑगस्ट 1942 रोजी सकाळी पोलिसांचे कडे मोडून एक तरुणी धावत या मैदानात आली. तिने तेथे स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकावला. त्या ठिकाणी तिने ‘जय हिंद’चा नारा दिला आणि विजेसारखीच ती पुन्हा गर्दीतून दिसेनाशी झाली. पुढचे चार महिने ती पोलिसांना चकवा देत राहिली. या तरुणीचे नाव होते अरुणा असफअली. हे नाव सार्‍या देशभर प्रसिद्ध झाले आणि स्वातंत्र्यप्रेमी चळवळ्या तरुणांच्या अस्मितेचे ते प्रतीक बनले. त्यावेळी या मैदानाचे नाव गवालिया टँक मैदान असे होते; पण पुढे 9 ऑगस्टच्या क्रांतीची आठवण म्हणून या मैदानाचे नामकरण ऑगस्ट क्रांती मैदान असे करण्यात आले. काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अटक झाल्यानंतर त्यांना पुण्यात हलवले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून तेथे त्यांच्यासह कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन यांना खाली उतरवून त्यांना गुप्त ठिकाणी हलवले आणि इतरांना पुढे नेले. सरकारने कितीही गुप्तता पाळली, तरी याविषयीची बातमी फुटलीच. महात्मा गांधी यांना पुण्याच्या कस्तुरबा पॅलेसमध्ये, तर पंडित नेहरू, सरदार पटेल आणि आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवल्याचे सर्वांना समजले. अशा मोठ्या नेत्यांना अटक झाल्याने लोकांच्या मनातील ब्रिटिशांविषयी असलेला संताप आणखी भडकला.

Quit India Movement
Pudhari Editorial : वर्चस्वाचा खेळ!

नेते तुरुंगात असल्याने हे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर हरताळ, मोर्चे, मिरवणुका यांचे मोठ्या प्रमाणावर सत्र सुरू झाले. ब्रिटिश सरकारने ही स्थिती आटोक्यात आणण्यासाठी लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली; पण त्यांचे आदेश मानायला देशातील लोक तयार नव्हते. पोलिसांकडून लाठीमार, गोळीबार होत होता; पण लोक त्याला जुमानायला तयार नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन, तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.

ब्रिटिशांच्या सत्तेला वैतागलेल्या लोकांनी जणू ब्रिटिशांविरुद्ध युद्धच पुकारले होते. त्यातून संपूर्ण देश पेटून उठला होता. जाळपोळ, दंगल, गोळीबार, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्याची लूट असे प्रकार देशभर सुरू झाले. या सार्‍यामुळे ब्रिटिशांनाही परिस्थिती आवरणे कठीण झाले. त्यातून त्यांची दडपशाही सुरू झाली. पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करण्यास त्यांनी सुरुवात केली. या सार्‍या पार्श्वभूमीवर सारा देश गोंधळलेल्या, अस्थिर वातावरणात सापडला होता. या सार्‍या प्रकाराला महात्मा गांधी जबाबदार आहेत, असा आरोप ब्रिटिश सरकारने केला. त्याचा इन्कार करून गांधींनी या गोष्टीच्या निषेधार्थ 21 दिवसांचे उपोषण केले.

ऑगस्ट क्रांतीच्या चळवळीत तरुणांप्रमाणेच अनेक बालवीरही सहभागी झाले होते. त्यामध्ये शिरीषकुमार यांचे नाव घ्यावे लागेल. नंदूरबारमध्ये शिरीषकुमारांचा जन्म झाला होता. महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांती मैदानावरून ‘चलेजाव’चा आदेश दिल्यानंतर गावोगावी प्रभात फेर्‍या काढून ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. ऑगस्ट क्रांती दिनानंतर बरोबर महिनाभराने 9 सप्टेंबर 1942 रोजी निघालेल्या प्रभात फेरीत आठव्या इयत्तेत शिकणारे शिरीषकुमार सहभागी झाले होते. ते गुजराती असल्याने त्यांनी त्यांच्याच मातृभाषेत घोषणा देण्यास सुरुवात केली. भारतमातेचा जयघोष करत ही प्रभात फेरी गावातून फिरत होती. पोलिसांनी मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी अडवली. शिरीषकुमार यांच्या हातात झेंडा होता. ही मिरवणूक विसर्जित करावी, असे पोलिसांनी आवाहन केले. या बालकाने ते आवाहन झुगारून देशाचा जयघोष सुरूच ठेवला. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार सुरू केला.

एका पोलिसाने मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुलीच्या दिशेने बंदूक रोखली. त्यावेळी गोळी मारायची असेल, तर मला मार, असे त्या मिरवणुकीतील एका चुणचुणीत मुलाने सुनावले. शिरीषकुमार मेहता असे त्या मुलाचे नाव होते. पोलिसाच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या शिरीषकुमार यांच्या छातीत घुसल्या आणि ते जागीच कोसळले. त्यांच्यासोबत अन्य चौघेही शहीद झाले. या बालशहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जेथे ही घटना घडली त्याच ठिकाणी हुतात्मा स्मारक उभारले आहे. आज भारत समृद्ध झाला असला, प्रगतीची अनेक पावले टाकून महासत्ता होण्याच्या दिशेने प्रवास करत असला, तरी ऑगस्ट क्रांतिदिनाच्या स्मृती मनात जपायलाच हव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news