

‘पुणे तिथे काय उणे’पासून गाजत आलेले तुमचे शहर आता वाहतुकीतील सर्वात मंद (वाहतूक कोंडी) शहरांमधील यादीमध्ये वरच्या स्थानावर आले आहे. बुद्धिमत्ता, संशोधन, उद्योजकतासोबत कासवगतीने चालणारी रहदारी याचा तुम्हाला अभिमान वाटणार आहे. तुम्हाला वाटणार्या अभिमानावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मंद वाहतुकीत पुणे शहर जगात चौथ्या क्रमांकावर आणि देशात तिसर्या क्रमांकावर आले आहे याचा जरूर आनंद साजरा करा. गोडधोड करून खा, जमल्यास घरांवर रोषणाई करा आणि शक्य झाले तर घराबाहेर पडून रस्त्यावर थोडे फिरून पाहा. आमचा मुद्दा तुमच्या लक्षात येईल.
नुकत्याच एका संस्थेने केलेल्या सर्व्हेप्रमाणे कोलंबिया या देशातील बरानकीला हे शहर जगातील सर्वात मंद वाहतुकीचे शहर ठरले आहे. येथे 10 किलोमीटर अंतरासाठी 36 मिनिटे लागतात. त्या पाठोपाठ कोलकाता 34 मिनिटे, बंगळूर 34 मिनिटे काही सेकंद आणि पुणे अचूक सांगायचे तर 33 मिनिटे 22 सेकंद लागतात. सद्य परिस्थितीत पुणे शहरातील वाहतूक परिस्थिती पाहता टॉपच्या बरानकीला शहराला गाठण्यास अवघे सहा महिने पुरेसे होतील. वाहतूक कोंडी आणि पुणेकर यांचे नाते घट्ट झालेले असले तरी त्याचा उल्लेख जगाच्या नकाशावर झाला हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वाहतूक कोंडीची कारणे नेहमीच आहेत आणि गेले किती तरी वर्षे सत्ताधारी पक्ष आणि पुण्याची कारभारी मंडळी यावर शाश्वत उपाययोजना काढण्याचे आश्वासन देत आहेत. वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण, नियोजनाचा अभाव अशी असंख्य कारणे वाहतूक कोंडीसाठी सांगितली जातात. स्थलांतरामुळे हजारो लोक आपली वाहने गावाकडून घेऊन पुण्यात येत असतात. त्याचसोबत दरवर्षी वाहनांच्या संख्येत चार टक्के वाढ होत असते हेही महत्त्वाचे आहे.
आम्ही स्वतः बरेचदा पुणे शहरामध्ये दुचाकी आणि चारचाकी चालवत असतो. नेमक्या गर्दीच्या वेळेला ज्येष्ठ नागरिक आपापल्या परीने या वाहतूक कोंडीत भर घालत असतात, असे आमचे निरीक्षण आहे. ज्येष्ठ म्हणजे सेवानिवृत्त होऊन पुण्यामध्ये स्थायिक झालेली ही मंडळी टी शर्ट, जीन्स पँट घालून आपले दुचाकी वाहन घेऊन आजूबाजूच्या परिसरातून दूध, भाजी, किराणा आणणे किंवा नातवंडांना नेऊन सोडणे यामध्ये बिझी असतात. ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर येण्याचे टाळले तर बर्यापैकी वाहतूक कोंडी कमी होऊ शकते, असे आमचे व्यक्तिगत मत आहे. ही ज्येष्ठ मंडळी म्हणजे तारुण्य ओसरलेली, परंतु अद्याप वृद्धत्व न स्वीकारलेली मंडळी असतात.
आपण आजही किती अॅक्टिव्ह आहोत, याचा प्रत्यय ते स्वतःलाच रोज देत असतात. वाहतूक पोलिस जागोजागी नेमले तर वाहतूक कोंडी दूर होईल, असे जर कोणाला वाटत असेल तर तो शुद्ध भ्रम आहे हे समजून घ्या. पोलिस यंत्रणा ही नेहमी वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा शिकार शोधण्यामध्ये व्यस्त असते. बहिरी ससाण्यासारखे त्यांचे डोळे वाहतुकीवर भिरभिरत असतात आणि चूक केलेला कोणी सापडतो का याचा शोध घेत असतात. असे असंख्य लोक त्यांना दररोज सापडतात. संबंधित दुचाकी चालवणार्याला ते आधी गाडी बाजूला घेण्याचा आदेश देतात आणि त्यानंतर किमान 15-20 मिनिटे त्यांची वैचारिक चर्चा होते आणि प्रश्न मिटतो. तोपर्यंत वाहतूक आहे त्या गतीने वाहत असते.