Pulse 2026 | ‘पल्स-2026’ देणार वैद्यकीय क्षेत्राला दिशा

Pulse 2026 |
Pulse 2026 | ‘पल्स-2026’ देणार वैद्यकीय क्षेत्राला दिशाFile Photo
Published on
Updated on

माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री

‘पल्स-2026’ ही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला जागतिक स्तरावर अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत वैद्यकीय सेवेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आधुनिक वैद्यकीय शिक्षण, अत्याधुनिक रुग्णालये, संशोधन संस्था आणि कुशल डॉक्टर यांच्या बळावर राज्य देशाच्या वैद्यकीय व्यवस्थेत अग्रस्थानी आहे. या क्षमतेला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी 27 व 28 मार्च 2026 रोजी ‘पल्स-2026’ प्लॅटफॉर्म फॉर युनिफाईड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अँड एज्युकेशन (PULSE) ही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केली आहे.

राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुलभ आणि आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. राज्याची वैद्यकीय व्यवस्था अधिक आधुनिक, तंत्रज्ञानसज्ज, संशोधनप्रधान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. परिषदेत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, अधिष्ठाता, विशेषतज्ज्ञ, खासगी शैक्षणिक संस्था तसेच आधुनिक वैद्यकीय उपकरणे उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहेत. राज्याच्या मेडिकल टुरिझम आणि ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारणे यासाठी या परिषदेची भूमिका महत्त्वाची ठरेल. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या पुढाकारातून आयोजित होणारी ही परिषद वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा व्यवस्थापन आणि वैद्यकीय पर्यटन यांना एकत्र आणणारा व्यापक मंच आहे. या परिषदेत देश-विदेशातील नामवंत डॉक्टर, संशोधक, वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील धोरणनिर्माते तसेच उद्योजक सहभागी होणार आहेत. आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेतील आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर सखोल चर्चेसाठी हे एक व्यासपीठ ठरेल.

महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राचा जागतिक लौकिक मेडिकल टुरिझमचा वेगाने विस्तार होत आहे. कमी खर्चात दर्जेदार उपचार मिळण्याच्या द़ृष्टीने भारत आणि विशेषतः महाराष्ट्राकडे अनेक देशांचे लक्ष आहे. ‘पल्स-2026’ परिषद ही संधी अधिक प्रभावीपणे मांडण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण संस्था, सुपरस्पेशालिटी रुग्णालये आणि संशोधन केंद्रांची मोठी संख्या आहे. या क्षमतेचा उपयोग करून राज्याला जागतिक वैद्यकीय सेवेत एक प्रभावी केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. परिषदेकरिता जगभरातून 2900 पेक्षा जास्त तज्ज्ञ, जवळपास 130 नामांकित डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण देणार्‍या संस्थांमधील अभ्यासक संशोधक येणार आहेत. परिषदेत वगेवेगळी 20 सत्रे आयोजित केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य वैद्यकीय क्षेत्रात अग्रगण्य असून देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, उद्योगपती आणि धोरणकर्ते यांच्या सहभागामुळे नवीन तंत्रज्ञान, आधुनिक उपचारपद्धती आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात येण्यास मदत होईल. याचा थेट फायदा रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यात, डॉक्टरांना नवीन संधी उपलब्ध होण्यात आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व संशोधनाचा अनुभव मिळण्यात होणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळणे, आयुष क्षेत्रात आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांच्यात समन्वय साधून एकात्मिक वैद्यकीय व्यवस्था निर्माण करणे, फार्मसी क्षेत्रातील नवीन संशोधन, डॉक्टरांचे संशोधन पेपर आणि नवकल्पना यांचे सादरीकरणही परिषदेत होणार आहे.

वैद्यकीय वेलनेस पर्यटनासाठी ‘महाराष्ट्र ब्रँड’

‘पल्स-2026’ परिषदेमार्फत महाराष्ट्राला वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र ब्रँड’ म्हणून वैद्यकीय पर्यटनाची ओळख निर्माण करण्यासाठी रुग्णालये, वेलनेस केंद्रे, संशोधन संस्था आणि पर्यटन क्षेत्र यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे राज्यात वैद्यकीय सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणार आहे. वैद्यकीय उपकरणे, जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि संशोधन यांसारख्या क्षेत्रांना नवी चालना मिळणार आहे. याचा थेट परिणाम रोजगारनिर्मितीवर होईल. परिषदेत वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा आणि संशोधनाला प्रोत्साहन मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल हेल्थ, रोबोटिक सर्जरी, टेलिमेडिसीन यांसारख्या नव्या संकल्पना वैद्यकीय शिक्षणात कशा समाविष्ट करता येतील, यावर चर्चा होणार आहे. वैद्यकीय क्षेत्र अत्यंत वेगाने बदलत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे निदान आणि उपचार पद्धती अधिक अचूक आणि परिणामकारक होत आहेत. ही परिषद त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. ‘डीजी होम’ आणि ‘टेक टॉक’ या विशेष संकल्पनासुद्धा परिषदेत असतील. 360 डिग्री डोममध्ये रोबोटिक सर्जरी, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये मेडिकल प्रशिक्षण, डिजिटल हॉस्पिटल व्यवस्थापन यासारख्या तंत्रज्ञानाचे लाईव्ह आणि इमर्सिव्ह प्रेझेंटेशन सादर केले जाणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील विकास हा केवळ शहरांपुरता मर्यादित राहून चालणार नाही. ग्रामीण आणि दुर्गम भागात दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचविणे ही मोठी गरज आहे. या परिषदेमुळे ग्रामीण वैद्यकीय सेवेसाठी नव्या संकल्पना आणि उपाययोजना समोर येतील. टेलिमेडिसीन, मोबाईल हेल्थ युनिट, डिजिटल हेल्थ रेकॉर्ड आणि आधुनिक निदान तंत्रज्ञान यांच्या मदतीने ग्रामीण भागात दर्जेदार वैद्यकीय सेवा कशी उपलब्ध करता येईल, यावर परिषदेत चर्चा केली जाणार आहे. परिषदेत स्टार्टअप्स, संशोधन संस्था, औषधनिर्मिती उद्योग, वैद्यकीय उपकरण उत्पादक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील नव्या कल्पना, संशोधनाला प्रत्यक्ष उद्योगाशी जोडण्याची संधी मिळेल. वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवकल्पना समाजापर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी अशा मंचांची आवश्यकता असते.

नवीन रोगांचे उद्भव, वाढते वैद्यकीय खर्च, तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विकास आणि लोकसंख्येच्या वैद्यकीय गरजा, या सर्वांचा विचार करून भविष्यातील वैद्यकीय व्यवस्थेचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. या परिषदेत विविध देशांतील अनुभव, संशोधन आणि तंत्रज्ञान यांचे आदानप्रदान होऊन वैद्यकीय व्यवस्थेत अधिक प्रभावी धोरणे तयार करण्यास मदत होईल. ही परिषद महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी केवळ एक कार्यक्रम नसून भविष्यातील वैद्यकीय व्यवस्थेची दिशा ठरविणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वैद्यकीय व्यवस्थेत महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेणे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनात जागतिक दर्जाचे केंद्र निर्माण करणे, ग्रामीण आणि आदिवासी भागात मजबूत प्राथमिक वैद्यकीय सुविधा उभारणे आहे. ‘पल्स 2026’ ही परिषद महाराष्ट्राला जागतिक वैद्यकीय नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करेल, यात शंका नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news