

कलंदर
पुणे पोलिसांनी वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी बराच विचार करून रडारचे तंत्रज्ञान वापरण्याचे ठरवले आहे, अशी बातमी समोर आली आहे. पुणे शहर वाहतुकीच्या बाबतीत पूर्णतः कोसळलेले शहर असून या शहरातील एकही रस्ता, महामार्ग, वळण रस्ता, सर्व्हिस रोड असा राहिलेला नाही की जिथे गर्दी नाही. एखाद्या रस्त्यावर वाहतूक खोळंबते आणि त्यानंतर कित्येक तास तेथील वाहतूक सुरळीत होत नाही. एखादा ट्रक अडकतो, एखादी मोटार बंद पडते, बरेचसे वाहन चालक चुकीच्या मार्गाने येऊन पूर्ण रस्त्याची आणि वाहतुकीची वाट लावतात. समजा आपण या वाहतुकीमध्ये म्हणजेच ट्रॅफिक जाममध्ये अडकलो तर आपण विचार करतो की थोड्या वेळात पोलिस येतील आणि सगळे काही सुरळीत होईल. एक तास जातो, दोन तास जातात, गणवेशधारी असा कुणीही व्यक्ती तिथे येत नाही. गर्दीमध्ये नेतृत्वगुण असलेले काही भक्कम शरीरयष्टी असलेले तरुण लोक पुढे येतात आणि थोड्या वेळात वाहतूक सुरळीत करून जातात. पोलिसांनी खरेतर अशा स्वयंसेवी कार्यकर्त्यांचे आभारी असले पाहिजे.
ट्रॅफिक जाम झाला असेल तर आणि समजा रडार यंत्रणेद्वारे पोलिस ठाण्याला कळाले की अमुक जागी ट्रॅफिक जाम आहे तर पोलिस तिथे तरी कसे पोहोचणार? हा सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण त्यांनाही किंवा त्यांच्या गाडीलापण त्या ट्रॅफिक जाममधून मार्ग काढतच त्या जागेवर जावे लागेल आणि सारं काही सुरळीत करावे लागेल. रडार तंत्रज्ञानाचा वापर नेमका कोणाला आणि कसा होणार आहे हे मात्र पुणे पोलिसांनी अद्याप जाहीर केलेले नाही. विशिष्ट पोलिस स्टेशनच्या विशिष्ट भागामध्ये वाहतूक कोंडी होत असेल तर ती कोंडी झालेली कळण्यासाठी रडार वापरण्याची तशी काही गरज नाही कारण लोकही पोलिस स्टेशनला फोन करून सांगत असतात. प्रश्न पोलिस किती तत्परतेने तिथे जाऊन वाहतूक सुरळीत करतात हा आहे.
आम्हास नेहमी या गोष्टीचे आश्चर्य वाटते की एखाद्या पोलिस ठाण्याअंतर्गत रोज एकाच विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेला वाहतूक कोंडी होत असेल तर तिथे पोलिस आधीच का नेमले जात नाहीत? पोलिस नुसते उभे जरी राहिले तरी वाहतूक सुरळीत चालते. कोणीही सिग्नल तोडत नाही, कुणीही चुकीच्या मार्गाने येत नाही कारण पोलिसांच्या हातामध्ये आता एक नवीन हत्यार आलेले आहे. नवीन हत्यार म्हणजे एक तंत्रज्ञान आहे. याद्वारे वाहनाचा फोटो काढल्याबरोबर त्याच्यावर दंड ठोठावण्याची सोय आहे. वाहन चालकाला हा दंड कधी ना कधीतरी भरावा लागतोच.
गणवेशधारी पोलिस समोर उभा असला की वाहतूक सुरळीत चालते हे माहीत असूनही विशिष्ट जागांवर पोलिस का तैनात केले जात नाहीत हा खरंतर मोठा प्रश्न आहे. तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा नियमित वाहतूक कोंडी होत असलेल्या जागेवर पोलिसांना उभे करणे हे साधे सोपे तंत्र उपलब्ध असताना अत्याधुनिक तंत्राद्वारे आपण नेमके काय करणार आहोत? याविषयी आमच्या मनात संभ—म आहे. आधुनिक रडार यंत्रणा वापरून फरार अपराधी यांना शोधण्याची काही शक्कल काढता येते का याविषयी पण पोलिसांनी विचार केला पाहिजे.