

मंडळी, आजकाल आपण दादागिरी हा शब्द नेहमी ऐकत असतो. चार- सहा किंवा दहा-बारा लोकांनी एकत्र येऊन एक टोळी करायची आणि परिसरामध्ये वर्चस्व गाजवायचे म्हणजे दादागिरी होय. पुण्यामध्ये कोयता गँगसुद्धा अशीच कुप्रसिद्ध झालेली आहे. दादागिरी पाठोपाठ दुसरा शब्द आला तो म्हणजे गांधीगिरी. अहिंसक मार्गाने आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करून घेणे म्हणजे गांधीगिरी. यात मारामारी नसते, तर फुले देऊन स्वागत केले जाते. नुकताच आणखी एक शब्द काही दिवसांपूर्वी कानावर पडला, तो म्हणजे दारूगिरी. दारूगिरी म्हणजे आपण स्वतः दारू प्यायची आणि ज्याची इच्छा नाही त्यालापण ती पिण्याची बळजबरी करायची. अशीच एक घटना चक्क एका मुलींच्या वसतिगृहात घडलेली आहे. फार पूर्वी एखादी मुलगी सिगारेट पिताना दिसली, तर आश्चर्य वाटत असे. आजकाल शहरातील लोकांना अशा गोष्टींचे आश्चर्य अजिबात वाटत नाही.
या मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्यांचा खच आणि सिगारेटची रिकामी पाकिटे मोठ्या संख्येने आढळल्याचा प्रकार नुकताच दिसून आला आहे. याची तक्रार एका मुलीने केली आणि तिही थेट प्रमुखांकडे. तक्रारीत असे म्हटले आहे की, विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागांत शिकणार्या मुली जुलै-ऑगस्ट महिन्यापासून मद्य पितात आणि सिगारेट ओढतात. त्याच्या धुराचा त्रास झाल्यामुळे मला मायग्रेनचा त्रास सुरू झाला आणि मी आरोग्य केंद्रात उपचार घेत आहे. संबंधित मुलींना मी जेव्हा तुम्ही हे करू नका, असे सांगितले तेव्हा त्यांनी मला शिवीगाळ केली आणि एक दिवस माझ्या हातात मद्याचा ग्लास देऊन माझा व्हिडीओ बनवला. यानंतर त्यांनी मला धमकी दिली की, मी कुठे तक्रार केली, तर तूदेखील मद्य पिते असे सांगून तुझा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येईल.
तक्रार करणार्या मुलीने मद्याच्या बाटल्यांचा खच आणि सिगारेटच्या पाकिटांचे असंख्य फोटो प्रशासनाला पाठवले आहेत. असे काही मुलांच्या वसतिगृहात घडले असते, तर आपल्याला अजिबात आश्चर्य वाटले नसते. हे घडले आहे मुलींच्या वसितगृहात!
सदरील तक्रारीवरून आणि उघडकीस आलेला प्रकार पाहतात या क्षेत्रातही मुलींनी मुलांना मागे टाकले आहे की काय, अशी शंका येते. होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेणार्या मुली या सहसा बाहेरगावच्या असतात आणि त्यांचे गरीब बिचारे पालक गावी कष्ट करून आपल्या मुलींना शिक्षण देत असतात. जेवढा स्वातंत्र्याचा अधिकार मुलांना आहे तेवढाच मुलींनाही असला पाहिजे, यात शंका नाही; परंतु होस्टेलसारख्या ठिकाणी असे प्रकार घडले, याला कोणीच मान्यता देणार नाही, हे निश्चित!
स्वातंत्र्य कितपत असावे, याला काही मर्यादा असते आणि ती मर्यादा ओलांडली की, ती बाब सार्वजनिक होत असते. मुलांच्या बरोबरीने मुलींनी सर्व काही करावे; परंतु ते वसतिगृहात करायला नको. लपून-छपून वसतिगृहात तसे होत असेल, तर त्यांनी इतर मुलींना त्रास द्यायला नकोे!