

चेहरा एकदम खुलून आलाय तुझा, काय विशेष?
बेटा : मम्मा, मला बिट्टू भेटला होता... अगदी संसदेच्या दारात.
मम्मा : म्हणून एवढं खूश काय व्हायचं त्यात?
बेटा : अगं, मी त्याला डायरेक्ट ‘ये माझ्या गद्दार मित्रा, तुझे स्वागत आहे’ म्हणालो.
मम्मा : अरे थेट असे कुणाला गद्दार म्हणतात काय? पूर्वीचा तो तुझा मित्र होता ना?
बेटा : हो मम्मा. आम्ही शांतपणे आमच्या निलंबित खासदारांसमवेत निदर्शने करत होतो. तिकडून बिट्टू आला आणि आमच्याकडे पाहून हातवारे करू लागला आणि आम्हाला काय तरी म्हणाला...
मम्मा : म्हणून काय आपण आपला संयम सोडायचा?
बेटा : अगं मम्मा, आमच्या पक्षात असताना आम्ही त्याला काय कमी केले होते? लगेच असे वागायचे का?
मम्मा : बरोबर आहे; पण एकाने चिमणी मारली म्हणून दुसर्याने कावळा मारायचा का?
बेटा : मम्मा, ती म्हण अशी आहे की, एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारायचे का?
मम्मा : जे काही असेल ते असेल. दोस्त होता ना तो तुझा एकेकाळी?
बेटा : पण, दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम—भर का गम है उधार दिया है...
मम्मा : म्हणून काय त्याला गद्दार म्हणायचे?
बेटा : मम्मा, मी एकदाच त्याला गद्दार म्हणालो. तिकडे उद्धोजीराव त्यांच्या पक्षातून बाहेर पडलेल्यांना सकाळ, दुपार, संध्याकाळ गद्दार, गद्दार म्हणून उद्धार करत असतात.
मम्मा : तो त्यांचा स्वभाव आहे. ते एखाद्याला गद्दार म्हणू देत नाही, तर खोका म्हणू देत. ‘बुरा मत बोलो, बुरा मत सुनो’वाली आपली संस्कृती आहे.
बेटा : मम्मा, जो आपला विश्वासघात करतो, त्याला गद्दार म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?
मम्मा : बेटा, आता आपला वाईट समय आला आहे.
बेटा : चांगला समय यायला मम्मा आम्ही काय केले पाहिजे?
मम्मा : बेटा, चांगला समय आपल्याला लवकर येईल असे दिसत नाही. निदान आपल्यातले जे लोक त्यांच्यात गेले आहेत, त्यांना तरी चांगले दिवस येत आहेत, हेही नसे थोडके!