स्थळ : रस्त्यावरील आचारसंहिता पथकाचा तंबू
आधी गाडी बाजूला घ्या. गाडी तपासायची आहे. आचारसंहिता लागू आहे कळत नाही का तुम्हाला? अजिबात वाद घालू नका. गाडी बाजूला घ्या. चला. कागदपत्रांची फाईल काढून दाखवा.
अहो साहेब, ही गाडी लोनवर घेतलेली आहे. दर महिन्याला 12 हजार रुपये ईएमआय भरत असतो या गाडीचा. काय सांगू साहेब, नाकात दम येतो पैसे फेडताना.
तुमचे रडगाणे आम्हाला सांगत बसू नका. आम्ही निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहोत. दिसली गाडी की तपास, एवढेच आम्हाला आदेश आहेत. अहो, आमचे रडगाणे तुम्हाला सांगत बसलो तर तुम्ही पण रडायला लागाल. रस्त्यावरच्या गाड्याच नाही, तर आम्हाला आकाशात उडणार्या हेलिकॉप्टरवर पण नजर ठेवावी लागते. दिसले हेलिकॉप्टर की तपास. दिसली बॅग की तपास. राजकीय लोकांच्या बॅगमध्ये काय-काय सापडते म्हणून सांगू तुम्हाला! चला, आधी तुमची ती सुटकेस उघडून दाखवा.
साहेब, ती सुटकेस उघडायला गेलो तर तुटून पडेल इतकी जुनी आहे ती. तिच्यात काय असणार आहे? तरी पण तुम्ही म्हणता आहात म्हणून उघडून दाखवतो. बायकोचे, लेकराबाळांचे आणि माझे कपडे आहेत. आम्ही घर शिफ्ट केले आहे. भाड्याच्या नवीन घरात जात आहोत. त्याचे भाडेही 22 हजार रुपये महिना द्यावे लागते.
ते काही आम्हाला माहीत नाही. ती दुसरी बॅग उघडा. काय आहे त्या बॅगेत?
काही नाही साहेब, केवळ दागिने आहेत.
दागिने? अरे वा, चांगलाच सापडलास की. कर्मचारी मंडळी या बॅगेची चांगली झडती घ्या. अरे बाप रे, किती हे दागिने? दोन एक कोटी रुपयांचे असतील. आधी सांग, हे सोन्याचे दागिने घेऊन कुठे चालला होतास? चला, कर्मचारी बंधूंनो, जप्त करा हे दागिने.
खुशाल जप्त करा. तुम्हालाच ठेवून घ्या. मी तुम्हाला सांगितले ना, आम्ही घर शिफ्ट करतोय म्हणून! हे महालक्ष्मीचे म्हणजे गौरीचे दागिने आहेत. सगळे नकली दागिने आहेत. जप्त करा आणि तुम्हालाच ठेवून घ्या.
ते काही आम्हाला माहीत नाही. या दागिन्यांचा व्हिडीओ काढा कर्मचारी बंधूंनो आणि तत्काळ व्हायरल करून टाका. आपल्या पथकाने दोन कोटींचे दागिने पकडले म्हणून बातमी येऊ द्या सर्वत्र. चला, आता या गाडीच्या सीटखालील पिशवीत काय आहे, ते दाखवा. बाटल्यांचा आवाज येत आहे. शिपाई, तत्काळ ती पिशवी बाहेर काढा आणि सर्व बाटल्या तपासा.
अहो साहेब, तो बाटल्यांचा आवाज नाही, काचेच्या बरण्यांचा आवाज आहे. तिखट, हळद, मेतकूट आणि लोणच्याच्या बरण्या आहेत त्या. एकमेकांवर आदळल्या की, त्यांचा आवाज बाटल्यांसारखाच येतो.
सोडून द्या रे याला. याची गाडी तपासणे म्हणजे फुकटचा टाईमपास आहे. चला आभाळाकडे पाहूया. एखादे हेलिकॉप्टर दिसले की, लगेच निघावे लागेल बॅगा तपासण्यासाठी. याला सोडून द्या तत्काळ. अतिसामान्य माणूस दिसतोय हा. द्या सोडून त्याला.