

थकवा आल्यानंतर काय होत असेल, तर झोप लागते. काहीच नाही झाले, तर एखादी डुलकी मारली, तरी शरीराला आराम पडतो आणि मन पण ताजेतावाने होत असते. आपल्याकडील अनेक कार्यालयांमध्ये कर्मचार्यांचे डुलक्या घेणे फारसे नवीन नाही. घडले असे की, कर्नाटकमधील ट्रान्स्पोर्ट कॉन्स्टेबल हे डुलकी घेत आहेत, असे सीसीटीव्ही वरून त्यांच्या वरिष्ठांच्या लक्षात आले. त्यामुळे त्या कॉन्स्टेबलला तत्काळ निलंबित करण्यात आले.
आपण पाठोपाठ शिफ्ट केल्यामुळे आपल्याला डुलकी लागली होती, हे मान्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आणि उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यांचा एकंदरीत युक्तिवाद ऐकून अतिशारीरिक ताण झाल्यास कार्यालयामध्ये डुलकी घेण्याचा कर्मचार्यांना अधिकार आहे, असे सांगून चंद्रशेखर नावाच्या कॉन्स्टेबलचे निलंबन हटविण्यास सांगितले. चंद्रशेखर पुन्हा ड्युटीवर रुजू झाले आणि या निमित्ताने डुलकी घेणार्या कर्मचार्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे, असे लक्षात येईल.
अनेक कार्यालयांतील कर्मचारी बर्याचदा, तर जागेवरच सापडत नाहीत आणि सापडले, तरी समजा डुलकी घेत असतील, तर तुम्हाला आता तक्रार करण्याची जागा नाही. कारण, त्यांना कार्यालयामध्ये डुलकी घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. राजरोस डुलकी घेण्याचे प्रकार वाढले, तर तुमचे आमचे म्हणजेच सामान्य नागरिकांचे काही खरे नाही. चंद्रशेखर यांच्या केसमध्ये कार्यालयात डुलकी घेणे हा गुन्हा नाही, असे मत कोर्टाने नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील कर्मचार्यांमध्ये खुशीची लाट आल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. या निर्णयाचा आधार घेऊन समजा एखाद्या कर्मचार्याला साहेबांनी बोलावले आणि तो तत्काळ गेला नाही, तर साहेब त्याला रागवू शकणार नाहीत. कारण, तो साहेबांना सांगू शकेल की, साहेब मला थोडी डुलकी लागली होती. डुलकी ही बसल्या बसल्या लागत असते; पण काही कर्मचार्यांनी आडवे पडल्याशिवाय मला डुलकी लागत नाही, असा युक्तिवाद केला, तर उद्या कार्यालयांमध्ये खाटा टाकण्याची वेळही येण्याची शक्यता आहे. जे काय असेल ते असो; परंतु मरण मात्र आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचेच असते. कारण, आपण आपले काम करून घेण्यासाठी आटापिटा करत असतो. आपल्या कामाच्या वेळेला कर्मचारी डुलकी घेत असेल, तर कृपया त्याला डिस्टर्ब करू नका, अन्यथा तुमचे काम लांबण्याची शक्यता आहे.