

काय रे माझ्या बिबट राजा, असा उदास का बरे बसला आहेस? पायात कुठे काटा वगैरे टोचला की काय? संध्याकाळच्या वेळी तुझी नेहमी शिकारीसाठी लगबग असते. काहीच नाही, तर तू शहरात जाऊन एखादा फेरफटका मारून येतोस. आज शांत का बसला आहेस?
विशेष काही नाही गं माझ्या लाडक्या बिबट राणी! आता आपल्याला आयुष्यात फक्त आराम मिळणार आहे. तुला किंवा मलाच नाही, तर आपल्या संपूर्ण बिबट प्रजातीला आता इथून पुढे शिकारीसाठी धावपळ करण्याची गरजच भासणार नाही. सगळ्यांची काळजी घेणारे महाराष्ट्र सरकार लवकरच सरकारी शेळ्या जंगलात सोडणार आहे. त्यामुळे आता केवळ आपली चंगळच होणार आहे बघ! आपण केवळ आता कोणाताही आटापिटा न करता आरामात आपले भक्ष्य पकडायचे आणि मस्त विश्रांती घ्यायची बघ! ना कसली धगधग आणि ना कसली धावपळ!
अरे, काय सांगतोस काय? सरकारी शेळ्या म्हणजे काय? शेळीसारखी शेळी असेल ना? शेळ्या खायला मिळाल्या, तर धावपळ करण्याची गरज नाही. शेळी बिचारी फार वेगाने धावू पण शकत नाही. ती आपली झुडपाचा चारा पाला खाण्यामध्ये मग्न असते. आपण हळूच जायचे आणि तिच्यावर झडप घालायची. शिकार झाली, काम फत्ते! हो, पण आपल्याला एक काळजी घ्यावी लागेल बरं का! आजूबाजूच्या गावांच्या शेळ्या पण जंगलात येत असतात. त्यांना आपण अजिबात दात लावायचा नाही. नाही तर मग आपल्या सरकारला लोकांना भरपाई द्यावी लागते. आपण फक्त ज्यांच्या कानामध्ये जिओ टॅग अशाच शेळ्या हेरायच्या आणि त्यांची शिकार करायची. आले का लक्षात? हो समजले मला.
नाहीतरी शेळीचा जीव कुणासाठी ना कुणासाठी तरी जातच असतो. शनिवार-रविवार मटण विकणार्या दुकानांसमोर माणसांच्या रांगा लागलेल्या असतात. काहीतरी आठशे की हजार रुपये किलोने मटण विकले जाते म्हणे! आपली चंगळ होणार आहे. आपल्याला एकही रुपया खर्च न करता डायरेक्ट शेळीच समोर येणार आहे. फक्त चांगल्या तरुण, निरोगी शेळ्या हेरायच्या नाही, तर त्यांचे मटण वातड लागते. ‘शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड’ असे आपल्या बिबट प्रजातीबद्दल व्हायला नको. बरोबर आहे. थोडेसे पेपर वाचत जा. ज्या दिवशी शासन शेळ्या जंगलात सोडेल त्या दिवशीपासून मी तर फक्त रिटायर लोकांसारखा आराम करणार आहे. धकाधकीचे आयुष्य बंद आणि सेवानिवृत्तीचे आयुष्य सुरू अशी आपली सगळ्यांची सुखद स्थिती होणार आहे बघ! एकदाची शेळ्यांची जंगलामध्ये एन्ट्री झाली की, मी आपल्या व्हॉटस्अॅप ग्रुपला ब—ेकिंग न्यूज टाकणार आहे. ‘आल्या शेळ्या, आता आराम करा’ अशी पोस्ट टाकणार आहे. चल, बाय!