

आलो बाबा निवडून एकदाचा! लागला बाबा गुलाल कपाळाला! मुद्दाम पांढरे कपडेच घालून आलो होतो निकालाला. म्हणजे कपड्यांवर गुलाल स्पष्ट दिसावा म्हणून. फुटले एकदा फटाके प्रभागात आपल्या नावाचे! बिनविरोधच करणार होतो. पण म्हटलं, लोकशाहीत ते बरं दिसत नाही. आजचा दिवस नाचायचा. नाचा नाचा रे.. हिकडं तिकडं नाचा रे... वाकडं तिकडं नाचा रे...
कार्यकर्त्यांबरोबर आपल्याला बी नाचाय लागतंय. बायको निवडून आली तर बायकोला उचलून घ्यायला लागतंय! आता मला कोण उचलणार? चांगला एकशेदहा किलोचा गडी हाय मी! झालं एकदा, झेंगाट संपलं. आता मला उद्यापासून आठ-दहा दिवस गायब व्हायला लागेल. केरळला जाऊन मसाज घ्यावा लागेल! गोव्याला जाऊन रिलॅक्स व्हायला लागेल. फार्महाऊसवर जाऊन खाऊन पिऊन रिचार्ज व्हायला लागेल.
पुन्हा मग महापालिकेत महापौरपदाची निवडणूक असेल. स्थायी समिती असेल... आता इन्कम सोर्स सुरू होतील. घातलेले पैसे निघायला तर हवेत. वचननामा आणि जाहीरनामा याचा विचार नका करू. निवडून आल्यावर आम्ही म्हणून तोच नामा! रस्ते काय, आज ना उद्या गुळगुळीत होतील. गटारांचं काय, पाऊस आल्यावर धो-धो वाहून जातील. शहराचा विकास तर आम्हालाच करायचा आहे, तो कुठे जातो? आन सगळाच विकास केला तर लोकं येतील का आमच्याकडं?
रोज कार्यकर्ते आपल्या गॅरेजमध्ये, पार्किंगमध्ये आणि कठड्यावर बसायला पाहिजेत. गरजू नागरिक आपल्याला भेटायला यायला हवे असतील तर प्रभागात काही ना काही अडचणी असल्याच पाहिजेत. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही दर महिन्याला जनता दरबार भरवायचा म्हणतो. अडचणी लिहून घेण्यासाठी एक पी.ए. नेमावा लागेल. गरजू नागरिकांसाठी वेटिंग रूम हवी. तिथे चार-दोन पेपर ठेवले पाहिजेत. प्रत्येकाला एक कप चहा देण्याचीही व्यवस्था करू.
साहेब कुठे आहेत म्हटल्यावर साहेब आंघोळीला गेलेत, साहेब देवपूजा करताहेत, साहेब कुत्र्याला फिरवायला गेलेत... अशी ठरावीक उत्तरे द्यायला आधी पी.ए.ला शिकवायला हवीत. एक ना दोन हजार योजना आमच्या डोक्यात आहेत. आधी सगळा गुलाल धुतला पाहिजे अंगावरचा!