

मैं तो रस्ते से
जा रहा था,
मैं तो भेलपुरी
खा रहा था,
मैं तो लडकी
घुमा रहा था,
तुमको मिर्ची लगी,
तो मैं क्या करूँ?
वा रं मर्दा, तू आपला बेस मजेत भेलपुरी खा, पोरी फिरीव आणि आमास्नी टुक टुक कर. आमी काई न बोलता रस्त्यानं चाललोय. तरी तू म्हणतोस, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ? तिखाट लागल्याव काय करायचं ते आमचं आमी बघून घेतो की. चिमूटभर साखर खाईन. न्हाईतर गुळाचा खडा खाईन. तुला काय करायचं? तू आपला दिसभर भेलपुरी खाईत बस, नाहीतर पोरी फिरवीत बस.
आमास्नी समदं म्हाईत हाय. आमास्नी तू आता भेलपुरी खायाच्या लायकीचं बी ठेवल्यालं न्हाईस. आमी कशाला जातोय लोणावळा - खंडाळ्याला? गावातल्या गावात फिरणार आमी. आमास्नी एकांदी सखू गावली तर गावली. तिच्यासंगं बोलायची बी आमास्नी भ्या वाटतीया.
काय गं सखू ऽ बोलू का नकू ऽ घडीभर जरा थांबशील का... म्हणू आमी.
तिला इचारलं तर तिकंडं आमचा चुलता आलाच लगी. लगीच त्यो आमच्यावर आरडणार, काय रं नाम्याऽ हितं काय करतोस? कुनासंगं बोलायलास?
आता काय बोंबलायचं? चुलत्याला दिसत आसून त्यो इच्यारतोय तू कुणासंगं बोलायलास?
आन तुमचं आपलं बरं हाय राव! तुमचं समदं ओपन आसतंय. समदीकडं तुमचं उमेद्वार निवडून येत्याती. त्यातनं साठ-सत्तर बिनविरोध आलं तरी आमी वर त्वाँड करून तुमास्नी इच्यारायचं न्हाई. आमी इच्यारायच्या आधीच तुमी म्हंतासा तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ?
मिरचीवाले बाप्पा, आमाला ठावं हाय का, आवंदा तुमच्या रानात मिर्चीचं पीक बक्कळ आलंय. तुमी सार्या राज्यात मिरच्या उन्हात घातलायसा. पर बारदान वाईच दमानं आपटा. तुमच्या मिरच्यांचा धुस्कारा उडतोय. खोकून खोकून आमचा जीव जातुय. तरी बी तुमी म्हंतासा, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ ?