Tadaka Article | आम्ही तर साधे..!

pudhari tadaka article
Tadaka Article | आम्ही तर साधे..!Pudhari File Photo
Published on
Updated on

कधीकाळी मुलगा किंवा मुलगी हे राजकारणी लोकांच्या सर्वोच्च ठिकाणी असत. राजकारणामध्ये मुलाला सेटल करण्यासाठी वाटेल ते करण्याची या लोकांची तयारी असे. एका शाळेमध्ये रंगलेला हा एक सर्वसामान्य आजोबा आणि त्यांचा अतिसामान्य नातू यांचा संवाद.

आजोबा मी पहिलीत असल्यापासून ते आता पाचवीला येईपर्यंत तुम्ही रोज मला शाळेत सोडायला येता. अशात मला तुम्ही शाळेला सोडायला येण्याची खूप लाज वाटत आहे. याचे कारण कळाले का तुम्हाला आजोबा? तुम्ही सायकलवर मला सोडायला येता. माझ्या वर्गात एक मुलगा आहे. त्याचे आजोबा त्याला सोडायला टेस्ला कारमध्ये येतात. कोणती कार? टेस्टला ? कशी टेस्ट असते तिची? आणि मला कार कशी परवडणार बाळा? मी साधा सेवानिवृत्त शिक्षक. माझा मुलगा म्हणजे तुझा बाप तोही माझ्यासारखा साधा. तो तर सिटी बसने जातो त्याच्या ऑफिसला. मग आम्हाला कारमध्ये कसे परवडणार तूच सांग बरे?

ते काही मला माहिती नाही. मला उद्यापासून टेस्ला कारमध्ये सोडायला येणार की नाही तेवढे सांगा. ही टेस्ला कार कितीची असते माहिती आहे का आजोबा तुम्हाला? अहो चक्क 60 लाख रुपयांची कार आहे ती. परवा आमच्या वर्गातील एका मुलाच्या आजोबांनी खास त्याला शाळेत सोडण्यासाठी इतकी भारीची गाडी घेतली आहे. भारतातली पहिली टेस्ला कार त्यांनी बुक केली होती म्हणे आणि ती पण नातवंडासाठी. एक ते पाहा आणि दुसरे तुम्ही पाहा. या तुमच्या जुनाट सायकलवर मला किती दिवस शाळेत यायला लागेल देवच जाणे.

अरे बाबा, साठ लाख रुपयांची कार असते का? मला तर कारच्या किमती माहीत नाहीत. मोटारसायकल परवडत नाही, तिथे कारच्या काय गोष्टी सांगतोस? हे बघ, नातवंडांना शाळेत सोडायसाठी एवढी भारीची कार घेणारा म्हणजे मोठाच माणूस असणार तो. हो, मोठा म्हणजे काय म्हणता? कार घेताना ते म्हणाले की, नातवंडांना शाळेत सोडण्यासाठी मी मुद्दाम कार घेतली आहे. कारण की ही इलेक्ट्रिक कार आहे. त्याच्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत नाही. पुढे जाऊन त्यांनी इतर आजोबांना असे आवाहन केले आहे की, नातवंडांना सोडायसाठी जरूर तुम्ही टेस्ला कार घ्या.

अरे बाळा, 60 लाख रुपयांचा एकूण व्यवहार माझ्या गेल्या दहा पिढ्यांमध्ये पण झालेला नाही आणि तू म्हणतो आहेस, साठ लाख रुपयांची कार घ्या. कसे शक्य आहे ते? पेन्शनच्या पैशातून मी कसेबसे घर बांधले. त्यात मी आणि माझा मुलगा म्हणजे तुझा बाप आणि आपण सगळे राहात आहोत. त्या घराची किंमतसुद्धा 10 लाखाच्या वर नाही आणि मग टेस्ला कार कुठून आणायची ती? ते काही नाही. ते सगळे मोठ्या लोकांचे नखरे आहेत. तू तिकडे लक्ष देत जाऊ नकोस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news