

मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आनंद मिळवण्यामध्ये आहे. कष्ट करायचे, पैसे कमवायचे, जमिनी घ्यायच्या, घरे बांधायची या सर्वाचा उद्देश अंतिमतः आनंद मिळवणे हाच असतो. कार्यालयीन कामकाज, मग ते सरकारी असोे अथवा खासगी, बरेचदा ते नैराश्य आणणारे असते. सकाळी तयार होऊन उत्साहाने कार्यालयात जाणारे लोक कमीच असतात. खासगी कंपनीतसुद्धा काम करताना तोच तोच पणा आणि कंटाळा येत असतो. आपल्या कर्मचार्यांमध्ये आनंदी वातावरण असावे, यासाठी मोठ्या कंपन्या क्वचितप्रसंगी सहली आयोजित करणे, एकत्रित जेवण आयोजित करणे अशा प्रकारचे उपक्रम घडवून आणत असतात. आपल्या कंपनीतील कर्मचारी आनंदी राहावेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. बरेचदा त्यासाठी हॅपिनेस ऑफिसर्ससुद्धा नेमले जातात.
हैदराबादमधील एका रोबोटिक्ससंबंधी काम करणार्या कंपनीने अत्यंत मनमोहक असे पाऊल उचलले आहे. हॅपिनेस ऑफिसर म्हणून त्यांनी एका गोल्डन रिट्रीवर जातीच्या श्वानाची निवड केली आहे. ‘डेनवर’ नावाचा हा श्वान दिवसभर कंपनीच्या विविध भागांमध्ये फिरून आनंदाची बरसात करत असतो. दिवसभर ‘डेनवर’ काही कोडिंग किंवा डीकोडिंग करत नाही, तर तो केवळ कर्मचार्यांच्या टेबलपाशी जाऊन त्यांच्याशी आनंदाने खेळतो, संवाद साधतो. त्याला नेमून दिलेले कामही तेच आहे. थोडक्यात म्हणजे, कामाच्या जागेवर सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी ‘डेनवर’ची नियुक्ती करण्यात आली आहे. या कुत्र्याच्या उपस्थितीमुळे कर्मचार्यांमधील तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारले आहे, असे कंपनीचे निरीक्षण आहे.
श्वान हा माणसाचा पुरातन काळापासूनचा मित्र आहे. आदिमानवाच्या काळात मानवाशी मैत्री करायला आलेला पहिला प्राणी श्वान असावा, असे म्हटले जाते. सद्गुरू दत्तात्रयांच्या कोणत्याही तसबिरीमध्ये आपल्याला पायाशी बसलेला एक श्वान आणि उभी असलेली गाय दिसेल. श्वान आणि मानव यांच्या मैत्रीचा इतिहास आदीम काळापासूनच आहे. आजही श्वान विविध प्रकारे मानवाची सेवा करत आहे. यामधील एक प्रकार म्हणजे, थेरपी किंवा उपचार करणारे श्वान होत. जुनाट आजारांना कंटाळलेल्या पेशंटला भेटण्यासाठी या कुत्र्यांना नियमित नेले जाते आणि त्या पेशंटच्या आयुष्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम हे श्वान करत असतात. सकारात्मक द़ृष्टिकोन निर्माण झाल्यास पेशंटचे शरीरही उत्तम प्रकारे उपचारांना प्रतिसाद देत असते. आपत्कालीन परिस्थिती, जसे की, भूकंप ढिगार्याखाली माणसे अडकणे अशा स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी श्वान महत्त्वाची भूमिका बजावत असते. अंध किंवा एकाकी व्यक्तींना सोबत करण्यापासून ते आरडीएक्ससारखे स्फोटक शोधण्यासाठी श्वानाची सेवा घेतली जाते. हॅपिनेस ऑफिसर होऊन आनंदाची बरसात करणारे श्वान ही मानव-प्राणीसंबंधातील महत्त्वाची पायरी म्हणावी लागेल.