स्माईल प्लीज..!

नेत्यांसह फोटो काढण्याची कार्यकर्त्यांची हौस
pudhari tadaka article
स्माईल प्लीज..!Pudhari File Photo
Published on
Updated on

कधीकाळी म्हणजे अवघ्या 20 वर्षांपूर्वी फोटो केवळ कॅमेर्‍याने काढले जात असत. कॅमेर्‍यामध्ये एक रोल असे आणि तो नंतर स्टुडिओमध्ये धुऊन घ्यावा लागत असे. त्यातील बरेचसे फोटो खराब निघत आणि टाकून द्यावे लागत असत. आजकाल स्मार्ट फोन आल्यापासून फोटो काढणे म्हणजे उजव्या हाताचा मळ झालेला आहे. ज्यांना अजून बोलताही येत नाही, अशी बालके फोटो काढण्यामध्ये निष्णात झाली आहेत. याचे कारण म्हणजे, प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्ट फोन आलेला आहे. कुणी कुणासोबत फोटो काढावेत, याविषयी काही धरबंद नाही किंवा नियम नाहीत. नुकतेच उपमुख्यमंत्री दादा यांनी फोटो काढताना काळजी घ्या, अशी सूचना कार्यकर्त्यांना केली आहे. नेत्यांसह फोटो काढण्याची कार्यकर्त्यांची हौस असते.

नेतेमंडळी आणि अभिनेते मंडळी यांच्या भोवती खूप गराडा असल्यामुळे कोण आपल्यासोबत फोटो काढून घेत आहे, हे त्यांनाही समजत नाही. भोवताली चाहत्यांचा गराडा असेल, तर चित्रपट तारे-तारका यांना आनंद होत असतो. सभोवताली कार्यकर्त्यांचा गराडा असेल, तर नेते खूश होतात. या कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असलेले असंख्य गुन्हेगारही नेतेमंडळींच्या बरोबर फोटो काढून घेतात. स्टेजवर बसलेल्या नेत्याच्या कानात जाऊन बोलणारा कार्यकर्ता अशा प्रकारचे फोटो महाराष्ट्राच्या लाखो घरांमध्ये लागलेले आहेत. या फोटोवरून कार्यकर्त्याच्या घरी येणार्‍या व्यक्तींना याचा किती वट आहे, हे या फोटोवरून कळत असते. गुन्हेगार मंडळी जी कोणती गोष्ट करतात ती सावध राहून आणि नियोजनबद्ध करत असतात. त्यांनी आपले पंटर गर्दीमध्ये घुसवलेले असतात आणि नेत्याच्या बरोबर जवळ आल्यानंतर त्यांचे पंटर त्यांचे फोटो काढतात. वाल्मिकीचा वाल्या झालेल्या बीड जिल्ह्यातील एका गुन्हेगाराचे सर्व पक्षांतील सर्व मोठ्या राजकीय नेत्यांबरोबर फोटो आहेत. फोटो आहेत याचा अर्थ त्यांचा नजीकचा संबंध आहे, असा होत नाही; परंतु मीडियाला सातत्याने काही ना काहीतरी बातम्या लागत असतात. अशा प्रत्येक फोटोची बातमी दिली जाते. सदरील गुन्हेगाराबद्दल ज्या आमदार महोदयांनी आरोप केले आहेत त्यांच्याबरोबर पण त्या गुन्हेगाराचे फोटो आहेत. याच कारणामुळे उपमुख्यमंत्री महोदय दादा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फोटो निघतेवेळी सावध राहण्याची सूचना केली आहे. या सूचनेचा कितपत उपयोग होईल, याविषयी शंकाच आहे. एखादा आमदार मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो तेव्हा आमदार महोदयांच्या सोबत जवळचे वीस-पंचवीस कार्यकर्ते असतात आणि त्या प्रत्येकाला मुख्यमंत्री महोदयांबरोबर फोटो काढायचा असतो. फोटो निघाल्यानंतर ते कुठे आणि कसे वापरायचे याची अचूक गणित त्या कार्यकर्त्याच्या डोक्यात असते. तो फोटो कालांतराने सोशल मीडियावर येतो. मग, याच्या व्हॉटस्अ‍ॅपच्या डीपीवर येतो आणि अवघ्या महिनाभरात तो आपल्या परिसरात अशी हवा करतो की, तो सदर व्यक्तीच्या अत्यंत जवळचा आहे. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट हे आपल्याला माहीत आहे. फोटोला फिल्टर लावून त्याचे मार्केटिंग करणारे लोक असतातच. आजकाल कोणतीही गोष्ट फार झपाट्याने पसरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news