

आपल्या घरी जर कोणी पाहुणे म्हणून आले आणि ते परत जायला निघाले तर जातो मी, असे म्हणण्याची प्रथा नाही. त्याऐवजी येतो मी, असे म्हणण्याची प्रथा आहे. बराय, येतो मी, असे म्हणून आपण एकमेकांचा निरोप घेत असतो. पृथ्वीतलावरून एक्झिट घेतलेला माणूस काही पुन्हा परत येत नसतो, हे मात्र शाश्वत सत्य आहे. एखादा माणूस मी पुन्हा येईन असे म्हटला तर आपल्या संस्कृतीमध्ये या हो, कधी पण या, नक्की या, असे आग्रही निमंत्रण देण्याची प्रथा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी पुन्हा येईन या विधानाचे पडसाद गेली पाच वर्षे उमटत राहिले.
युतीची सत्ता निश्चित येणार, हे आत्मविश्वासाने सांगणारे देवाभाऊ मी पुन्हा येईन, असे तीन वेळेला म्हणाले आणि खरे पाहता, ज्या पक्षाबरोबर युती होती त्या पक्षाबरोबर निवडून पण आले. एकदा का निवडून आले की, सोबतीने निवडणूक लढविणार्या पक्षाने भलत्याच पक्षांसोबत असंगाचा संग करून घेतला आणि मी पुन्हा येईन असे म्हणणार्याला त्या मुख्य खुर्चीवर बसता आले नाही. मी पुन्हा येईन या वाक्याची प्रचंड अशी खिल्ली विरोधी पक्षांनी जवळपास पाच वर्षे उडवली. काही बोलभांड प्रवक्त्यांनी ते पुन्हा कधीच येणार नाहीत, अशीही भविष्यवाणी वर्तवली होती. मुख्य खुर्चीवर येण्याऐवजी ते मुख्य विरोधी खुर्चीवर गेल्यामुळे काही लोकांनी ते अर्धेच आले, पूर्ण आले नाहीत, असे म्हटले. शिवाय, गेली अडीच वर्षे भरपूर प्रयत्न केल्यानंतर देवाभाऊंना मुख्य खुर्चीच्या बाजूच्या उपखुर्चीवर बसायला लागले याची पण भरपूर खिल्ली उडविण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये ‘न भूतो ना भविष्यती’ असा जनादेश देवाभाऊंना मिळाला आणि आपल्या सोबतीच्या पक्षांच्या मदतीने ते मुख्य खुर्चीवर स्थानापन्न झाले.
सत्तेचा आणि राजकारणाचा खेळ फार मजेदार असतो. आपण केलेली कर्मे पुन्हा परत येत असतात, पुन्हा पुन्हा परत येत असतात. या जन्मीचे याच जन्मी फेडावे लागते, हे विरोधकांना आता नीट समजले असावे. मी पुन्हा येईन, असे म्हणणार्या नेत्याचे पुनरागमन विरोधकांना दीर्घकाळ डाचत राहील. दुसरे कोणी आल्यापेक्षा हाच नेता पुन्हा आलेला बरे राहील, असा स्पष्ट जनादेश राज्यातील जनतेने दिलेला आहे, हे निर्विवाद सत्य आहे. पुन्हा येईन या विधानाची खिल्ली उडविलेल्या लोकांची मात्र मोठीच पंचाईत होऊन बसली आहे. आपणास करावयाची कामे त्यांच्याकडेच घेऊन जाणे भाग पडणार आहे. सदर नेता मनामध्ये कोणतीही खुन्नस किंवा राग न ठेवता सर्वांना न्याय देईल, अशी अपेक्षा आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राचा हा आश्वासक चेहरा राजकीय संस्कृती अधिक समृद्ध करून राज्याला देशपातळीवर क्रमांक एकवर नेईल, ही अपेक्षा बाळगायला हरकत नसावी. मी पुन्हा येईन हे प्रचलित झाले आहे की, प्रत्येकाच्या तोंडी हे शब्द आपणास पाहायला मिळत आहेत. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही हे वाक्य रुजले आहे; पण कोणीही या पण आपल्या भागाच्या विकासाचा ध्यास घेऊन या, असे लोक आता म्हणत आहेत. प्रत्येक राजकारण्याने विकासाला प्राधान्य द्यावे हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते आणि तसेच ते भविष्यातही घडो, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी, हे नक्कीच!