

काय हे बंड्या, परीक्षेत किती कमी मार्क मिळाले आहेत? मी रात्रंदिवस कष्ट करतो, तुम्हाला काही कमी पडू नये म्हणून ओव्हरटाईम काम करतो आणि मी तुम्हाला दिलेल्या पैशाचा असा दुरुपयोग करता? अभ्यास करणे आणि मार्क मिळवणे एवढेच तुझं काम आहे, एवढे लक्षात घे. 100 पैकी जेमतेम 36 मार्क घेऊन काठावर पास झाला आहेस. काय भवितव्य असणार आहे तुझे?
अहो बाबा, ती ऑनलाईन परीक्षा होती. ऑनलाईन परीक्षेमध्ये पहिली गोष्ट म्हणजे कॉपी करता येत नाही. आपण लिहिलेली उत्तरे बरोबर आहेत की नाही, हे पण तपासता येत नाही. परीक्षा संपली, शेवटचे बटन दाबले की, रिझल्ट समोर येतो. यावर्षी गणिताच्या गुरुजींनी फार अवघड पेपर काढला. त्यामुळे मी जेमतेम काठावर पास झालो. मला हा निकाल मान्य नाही. तुम्ही माझ्याबरोबर चला आपण मुख्याध्यापकांना भेटू आणि त्यांना म्हणू की, ही परीक्षा रद्द करा, पुन्हा परीक्षा घ्या आणि ती पण उत्तरपत्रिकेवर घ्या.
गाढवा आडात नाही तर घागरीत कुठून येईल? उत्तरपत्रिकेवर परीक्षा घेतली, तरी तुझा अभ्यास तरी झालेला आहे का? किमान ऑनलाईनमध्ये अंदाजपंचे बटन दाबून काही ना काही तरी मार्क मिळाले तेवढ्यावर बचावलास. उत्तरपत्रिकेवर उत्तर देण्यासाठी आधी अभ्यास करावा लागतो, ज्ञान प्राप्त करावे लागते. यापूर्वी उत्तरपत्रिकेवर जेव्हा तुझी परीक्षा झाली होती तेव्हा तरी काय दिवे लावले होतेस? तुला मार्क कमी मिळाले म्हणून मी शाळेत गुरुजींना भेटायला आलो होतो. त्यांनी तुझी उत्तरपत्रिका मला दाखवली. जवळपास निरंक होती उत्तरपत्रिका. तू दोन पुरवण्या घेतल्या होत्यास; पण त्यावर परीक्षा क्रमांकाशिवाय दुसरे काही लिहिलेले नव्हते. भविष्यात कसे शिक्षण घेणार आहेस तू? बाबा, ते मला काही माहीत नाही. तुम्ही माझ्याबरोबर चला. इतर नापास मुलांचे बाबा पण येत आहेत. सगळ्यांचे म्हणणे एकच आहे की, ऑनलाईन परीक्षा बंद करा आणि उत्तरपत्रिकेवर परीक्षा घ्या. या लेखी परीक्षेमध्ये हुशार मुले उत्तरे लिहितात आणि ती प्रश्नपत्रिका वर्गात सगळीकडे फिरून किमान पास होण्याइतके मार्क मिळत असतात. या ऑनलाईन परीक्षेमध्ये असा काही पर्याय नाही. मी निषेध करतो या अशा ऑनलाईन परीक्षेचा. मला हा निकाल मान्य नाही.
तुला मान्य नसेल रे; पण जे अभ्यास करून चांगल्या मार्काने पास झाले आहेत त्यांना तो मान्य आहे ना? त्यापेक्षा एक काम करूयात. मीच एक प्रश्नपत्रिका काढतो. त्याची उत्तरे तू घरी बसून लिही. मीच ती तपासतो आणि मग तुला किती मार्क मिळतात ते पाहूयात. आपण ती उत्तरपत्रिका घेऊन शाळेत जाऊ आणि शाळेला विचारू की, घरी घेतलेल्या परीक्षेमध्ये इतके मार्क मिळाले, मग तुमच्या परीक्षेत मार्क कमी का? ताबडतोब ऑनलाईन परीक्षा रद्द करा आणि प्रत्येकाला आपापल्या घरी प्रश्न काढून त्याची उत्तरे लिहिण्याची परवानगी द्या. चला बाबा माझ्याबरोबर. नापास झालेल्या पोरांचे बाप पण तावातावात भांडायला आले आहेत. आज शाळेचा निकालच लावून टाकू. ‘रद्द करा, रद्द करा, ऑनलाईन परीक्षा रद्द करा. बघता काय? सामील व्हा.’