मुलगी झाली हो..!

मुलगी झाली हो..!
Published on
Updated on

पृथ्वीचे प्रातिनिधिक रूप असणार्‍या स्त्रियांच्या संख्येत पुरुषांच्या तुलनेत वाढ झालेली आहे. एक हजार पुरुषांमागे एक हजार वीस स्त्रिया असे हे प्रमाण. देशातील 23 राज्यांमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. राजकीय, सामाजिक, आरोग्य यासारख्या परिणामांच्या मिती  असणारी ही शुभवार्ता. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणीच्या (नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे) अधिकृत अहवालात जननदराची ही तपशीलवार माहिती आहे. 2019-20 चा हा अहवाल केंद्रीय आरोग्य खात्याने जाहीर केला. पाहणीच्या दुसर्‍या अहवालात आरोग्य स्थितीचा पंचनामाही आहे. दोन्हीही अहवाल प्रबोधन करणारे, विचारप्रवण करणारे आहेत.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच असे घडत आहेे, असा या बातमीचा सांगावा. याचे श्रेय व्यवस्थेने केलेल्या जनजागृतीला, प्रबोधनाला द्यावेच लागेल. पिढ्यान्पिढ्यांच्या प्रागतिक विचारांकडे आणि सकारात्मक बदलांकडे सुरू असलेल्या आशादायी प्रवासाचे आणि त्याच्या परिणामांचे ते प्रतीक मानावे लागेल. गेल्या सुमारे पाच दशकांपासून सुरू असलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांची ती फलनिष्पत्ती. कुटुंब नियोजनाचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम सुरू होऊन दीर्घ काळ लोटला. लोकसंख्येचा वाढता वेग रोखण्याला त्याकाळी प्राधान्य दिले गेले. त्यात बरेचसे यश आले असले, तरीही अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

त्यावेळी आजच्या सारखा माध्यमांचा बोलबालाही नव्हता. तेव्हा गावा-गावांतील भिंती कुटुंब नियोजनाच्या प्रचार-प्रसारासाठी रंगवल्या जात. त्या काळात तसेच नंतरही 'मुलीच्या जन्माला कमी लेखू नका, तिला 'नकोशी' ठरवून जन्मण्यापूर्वीच तिच्या गळ्याला नख लावू नका', यांसारखी साद प्रबोधनाद्वारे सतत घालण्यात आली. त्यामुळे स्त्री भू्रणहत्येला काही प्रमाणात का होईना आपण अटकाव करू शकलो, असे या अहवालामुळे म्हणण्यास जागा आहे. इतकेच पुरेसे नक्कीच नाही; परंतु चित्र आशादायी मात्र नक्कीच आहे. लक्षात घेतले पाहिजे की, व्यवस्थेमधील दुरुस्तीसाठी असे प्रबोधनाच्या हत्याराचे घावसतत घालावेच लागतात, हा इतिहास आहे. जाहिरातींमधील 'हम दो-हमारे दो' ही लक्षवेधी शब्दयोजना नक्कीच आठवत असेल. त्यापुढेही आता आपण विशेषतः स्त्रियांची वाटचाल सुरू आहे.

'एकही बस', 'हम दो-हमारा एक' इतकेच नव्हे, तर 'मूल नको, हवे तर दत्तक घेता येईल', अशा विचारांनी स्त्री-पुरुष सहजीवनाचा प्रवासही नवी मुद्रा उमटवतोय. गरज आहे की, त्याकडे विशाल नजरेने, अपार करुणेने पाहण्याची. हा प्रवास केवळ शहरांतच दिसत आहे, असे नव्हे तर शहरांकडे वाटचाल करणार्‍या ग्रामीण भारतातही. जननदराच्या अहवालातील आकडेवारी पाहिल्यास विशिष्ट समुदायाची लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढत आहे, असा राजकीय अपप्रचारही स्वार्थासाठीची गोबेल्स नीती असल्याचे उघडकरते. सत्ताकारणासाठी असे अनेक जीवघेणे फुगे राजकीय अवकाशात सोडले जातात.

जननदराच्या या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला 'स्त्री जन्मा तुझी कहाणी' पाहावी लागेल. तिची पुरुषांशी तुलना तर होणारच. प्राचीन ग्रीक काळापासून ती होत आलेली आहे, होत राहील. तशी ती होऊ नये, यासाठीचा समानतेच्या प्रवासाचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे जगात कोठे ना कोठे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्त्री-पुरुष समानतेची चळवळ आजही सुरू असल्याचे दिसते. बेटा-बेटांनी काम सुरू असेल; पण त्यात सातत्य आहे. माध्यमात त्याचे यथोचित प्रतिबिंब उमटू दिले जात नसले, तरी संघर्ष सुरू आहे.

ही तिची लढाई अगदी जगभरातील चित्रपट पाहिले, तरी जाणवते. ताप्तर्य काय, तर जीवनाच्या नानाविध क्षेत्रांमध्ये स्त्रिया समानतेसाठी निकराने लढा देताहेत. परिणामस्वरूप त्याचे काही आशादायी चित्रही उमटत आहे. आधुनिक काळात स्त्रियांवरील रूढींची बंधने काही प्रमाणात शिथिल, काही प्रमाणात कमीही झाली. याचा अर्थ फार मोठा फरक पडलेला नाही. स्त्रियाही अर्थार्जन करू लागल्यामुळे स्त्री-पुरुष यांच्यातील दरी थोडी-फार कमी झाली, इतकेच! ती आर्थिकद़ृष्ट्या पूर्णतः स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत तिच्या सामाजिक हक्कांना काहीही अर्थ राहत नाही. तिचे पुरुषांवर अवलंबून बांडगुळासारखे जगणे बंद करू देण्यास पुरुषी मानसिकतेची तयारी आहे का? येथे असाही प्रश्न हा पडतो की, लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यांहून जास्त असणारा हा घटक आपण अनुत्पादकच ठेवणार का? महासत्तेची स्वप्ने पाहणार्‍या आपल्यासारख्या विकसनशील देशाला हे खचितच परवडणारे नाही.

फ्रेंच राज्यक्रांतीनंतर स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा होईल, ही अटकळही खोटी ठरली. त्यामुळे प्रगतीच्या वाटचालीत स्त्रियांच्या सर्वंकष सहभाग अनिवार्यच. त्यासाठी तिच्या आरोग्याची जबाबदारीही आपल्याला नाकारता येणार नाही, याचेही भान राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणीचा अहवाल देतो. 'आत्म्याला लिंग नसते' असे एक कविराज म्हणतात, हे समजून स्वीकारलेही, तर स्त्री-पुरुष समान दर्जाच्या विश्वाची कठीण वाटणारी कल्पना अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी 'नकोशी' मानसिकता बदलावी लागेल. 'मुलगी जन्मली हो'चे दणक्यात स्वागत केले पाहिजे. पुरुषांपेक्षा मानवी जीवनाला कचकचून भिडणार्‍या निम्म्यांहून जास्त जगाला समकक्षतेने स्वीकारलेे पाहिजे, तर आपण जननदराच्या आकड्यांच्या पल्याड स्त्री-पुरुष समानतेच्या गावी जाऊ.

ती नजर कमवावीच लागेल. 'ती'ला सोबत घेण्यासाठी सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण धडपडीचा हा परिणाम जीवनाच्या अखंड प्रवासाची ग्वाही तर देतोच शिवाय माणुसकीचे आणि कारुण्याचे गोडवेही गातो. माणूसपण जागवण्याच्या कक्षा अधिक रुंदावल्याची ही साक्ष आहे. संख्येच्या समानतेचा मोठा आणि कठीण टप्पा गाठताना आता माणूस म्हणून जगण्याचे आणि हा संसार नावाचा गाडा ओढताना 'ती'ला भार न मानता तिचा हातभार मान्य करण्याचे, तिच्याकडे अखिल समाजाचे नेतृत्व देण्याचे मोठे आव्हान आजही कायम आहे. ही निरंतर करावयाची प्रक्रिया, ती यापुढेही सुरूच राहील, अशी आशा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news