

सत्याऐंशी वर्षांची प्रदीर्घ समाजाभिमुख वाटचाल उत्तरोत्तर यशस्वीपणे पूर्ण करून नववर्षदिनी दै. ‘पुढारी’ आज अठ्ठ्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहे. साडेआठ दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात दैनंदिन निर्भीड, नि:स्पृह आणि सडेतोड पत्रकारितेबरोबरच अनेक जनसंघर्षांत ‘पुढारी’ने नेतृत्व केले. गेल्या पाच तपांच्या काळात आम्ही परखड पत्रकारितेबरोबर अनेक जनआंदोलनात आघाडीवर नेतृत्व केले. प्रश्नांना चालना दिली. चार भिंतींआडची आमची पत्रकारिता नसल्यानेच तमाम जनसमूहाने आमच्याविषयी असीम जिव्हाळ्याची भावना जपली. या स्नेहातूनच नागरी गौरव समितीने आमचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा जाहीररीतीने आणि जल्लोषी थाटात साजरा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बहुतांश मंत्री, ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्यासह जनसागराच्या उपस्थितीत हा शानदार लोकोत्सव पार पडला. जनतेच्या प्रेमाची प्रचिती आली. ‘पुढारी’ हे सर्वनाम झाले, लोकव्यासपीठ बनले, म्हणूनच असा हा देवदुर्लभ गौरव सोहळा साकार झाला. या ऋणातून आम्ही उतराई होणे शक्य नाही. जनतेचे हे अथांग प्रेम आमची मर्मबंधातील ठेव आहे. ‘पुढारी’चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी ‘पुढारी’चे इवलेसे रोपटे लावले. त्याचा आता महावृक्ष बनला आहे. बड्या साखळी वृत्तपत्रांच्या लाटेत बहुतांश जिल्हा पत्रे बंद झाली. ‘पुढारी’ने महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यात सर्वदूर विस्तार केला.
‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचा निकट सहवास लाभला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत काळाराम मंदिर सत्याग््राहासह अनेक लढ्यांत ते आघाडीवर होते. मुंबईत भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे, मामा वरेरकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर अशा मातब्बरांच्या सहवासात त्यांच्या पत्रकारितेची जडणघडण झाली. ग. गो. जाधव यांनी कोल्हापुरात ‘पुढारी’त आधुनिक पत्रकारितेची सुरुवात केली. सहकार, कूळ कायद्याचे प्रश्न, कोयना धरण, शिवाजी विद्यापीठ अशा अनेक प्रश्नांना चालना देत त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या पत्रकारितेचा आविष्कार घडवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा ‘पुढारी’ने हिरिरीने पाठपुरावा केला.
गोवामुक्ती संग््राामाची कोल्हापुरातील पहिली तुकडी ‘पुढारी’तूनच रवाना झाली होती. कोयना, लातूर, कच्छचा भूकंप, कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील महापुरांची आपत्ती अशा अनेक नैसर्गिक आपत्तीवेळी ‘पुढारी’ आपद्ग््रास्तांच्या मदतीला धावून गेला. सियाचीन या जगातील उत्तुंग रणभूमीवर जवानांना हिमदंशासारख्या आजारांना तोंड द्यावे लागे. उपचारांची काहीच सोय नव्हती. हे लक्षात येताच आम्ही सियाचीन हॉस्पिटलची योजना तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यापुढे मांडली आणि अडीच कोटींचा भरीव निधी उभारून सियाचीन हॉस्पिटलची उभारणी केली. गेल्या पंचवीस वर्षांत हॉस्पिटलला लागणारी उपकरणे आणि वस्तूही आम्ही पुरवीत आहोत.
अशाप्रकारचे हॉस्पिटल उभारणीचे कार्य हे वृत्तपत्रीय इतिहासातील एकमेव असे देशकार्य आहे. 1974 मध्ये छ. शिवाजी महाराज राज्याभिषेक त्रिशताब्दी आणि राजर्षी शाहू महाराज जन्मशताब्दीसाठी आम्ही पुढाकार घेतला. सीमाप्रश्नात आघाडीवर राहून मेळावे, परिषदांचे आयोजन केले. श्रीजोतिबा परिसराच्या विकासाची जबाबदारी पार पाडून परिसराचा कायापालट घडवला. मराठा आरक्षण लढा, कोल्हापूर खंडपीठ आंदोलन, टोलविरोधातील आंदोलन, ऊस दर आंदोलन अशा अनेक प्रश्नांत आम्ही नेतृत्व करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रसंगी रस्त्यावर उतरलो. आता कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन झाले आहे आणि राज्य सरकारने खंडपीठाचा प्रस्तावही सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आहे.
‘पुढारी’च्या सुवर्ण महोत्सवाला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि अमृत महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन पंतप्रधान आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी ‘पुढारी’च्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. रौप्य, सुवर्ण, हीरक आणि अमृत महोत्सव हे ‘पुढारी’चे चारही महोत्सव पाहणारे आम्ही एकमेव संपादक आहोत. जिल्हा वृत्तपत्र ते महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक अशा 24 आवृत्त्या असलेले राज्य वृत्तपत्र म्हणजे प्रिंट मीडिया, जाधव घराण्याची तिसरी पिढी डॉ. योगेश जाधव यांनी गतवर्षी स्थापन केलेले ‘पुढारी’ न्यूज टीव्ही चॅनल, टोमॅटो एफएम रेडिओ, ऑनलाईन मीडिया, डिजिटल होर्डिंग आणि इव्हेंट अशा माध्यमांच्या सर्व क्षेत्रांवर ‘पुढारी’ने कर्तृत्वाची खोलवर मोहर उमटवली. ‘थी सिक्स्टी डिग््राी मीडिया हाऊस’ ही बिरुदावली मराठी माध्यम क्षेत्रात ‘पुढारी’ माध्यम समूहाने सर्वप्रथम प्राप्त करण्याचा बहुमान मिळवला. डॉ. ग. गो. जाधव हे ऐतिहासिक काळाराम मंदिर सत्याग््राहात अग््राभागी होते आणि आम्ही 1978 मध्ये श्रीअंबाबाई मंदिरात पाच दलित दाम्पत्यांच्या हस्ते गाभाऱ्यात पूजाविधी घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. तिसऱ्या पिढीत हाच वारसा ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी शिरोधार्य मानून आगळा उपक्रम राबवला. मूळ समाज समूहापासून शेकडो वर्षे दूर-दूर रानावनात राहिलेल्या पिढ्यान् पिढ्या वंचित राहिलेल्या आदिवासी मुलांसाठी त्यांनी ‘पुढारी टॅलेंट सर्च’ परीक्षा आयोजित केली.
नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांतील 24 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला. या मुलांमधून सर्वोच्च गुण मिळवलेल्या 25 आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विमानाने आग््राा-मथुरा-नवी दिल्ली अशी स्टडी टूर आयोजित करण्यात आली. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमवेत त्यांचा संवादही घडवण्यात आला. राष्ट्रपती मुर्मू यांच्या मार्गदर्शनाने त्यांना नवी प्रेरणा मिळाली. या उपक्रमाबद्दल अनुसूचित जनजातीचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनी ‘पुढारी’ची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आदिवासी मुलांचा असा उपक्रम करणारे ‘पुढारी’ हा देशातील एकमेव वृत्तपत्र समूह आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती मुर्मू आणि आर्य यांनी काढले. या उपक्रमातून ‘पुढारी’ने वंचित समाजाशी आपली नाळ दृढ राखली आहे. सडेतोड, नि:स्पृह आणि निर्भीड लिखाण ही ‘पुढारी’ची कवचकुंडले. ती आम्ही जीवामोलाने जपली आणि त्यामुळेच असंख्य वाचक आणि ‘पुढारी’चे अभेद्य अद्वैत निर्माण झाले. हे वाचकांचे भावबळ पुढील मार्गक्रमणात अखंड राहो, हीच मनोमन भावना याप्रसंगी आम्ही व्यक्त करतो!