फुले, आंबेडकर विचारांचे अभ्यासक

फुले, आंबेडकर विचारांचे अभ्यासक
Published on
Updated on

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे अकाली जाणे चटका लावणारे आहे. विचारांचा अंत झाला आहे. विचारसरणी कालबाह्य झाल्या, असा पुकारा सतत सुरू आहे. तो खराच वाटावा अशा कोलांटउड्या आजूबाजूला रोज अनुभवायला मिळत असतानाच्या काळात विचार महत्त्वाचे असतातच आणि विचारांच्या पुरस्कारासाठी अभ्यास करून, संदर्भ देत रोखठोक भूमिका घेणेही महत्त्वाचे असते, असे स्वतःच्या लिखाणातून, बोलण्यातून दाखवून देणारे हरी नरके यांचे मोल फार मोठे होते.

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांसाठी अभ्यासक, संशोधक आणि प्रचारक म्हणून तिहेरी भूमिका आक्रमकपणे मांडणार्‍या हरिभाऊंची उणीव आता फार तीव—तेने जाणवणार आहे. हरी नरके यांच बालपण खडतर गेले. घरात शिक्षणाची परंपरा नव्हती. बहुजन कष्टकर्‍यांच्या घरात आजही दारिद्य्राचीच चलती असते, तर हरीभाऊंच्या लहानपणी ती दारिद्य्राची छाया अधिक गडद होती. त्यांच्या घराजवळ राहणार्‍या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या शिकवणीने प्रेरित झालेल्या शांता मावशींनी हरिभाऊंच्या शिक्षणाचा आग्रह त्यांच्या आईकडे धरला आणि हरिभाऊ शिकले.

अंगभूत हुशारीने आणि धडपड्या स्वभावाने सर्व प्रतिकूलतेवर मात करत हरीभाऊ शिकत राहिले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा गाजवल्या; पण अशा स्पर्धांमधे चमकणार्‍या अनेकांना वैचारिक बांधिलकी ही काय चीज आहे, हे माहितीही नसते. हरीभाऊ मात्र वक्तृत्व स्पर्धांकडेही फुले-आंबेडकरी विचारांच्या प्रसाराचे साधन म्हणून पाहत होते. वादविवाद स्पर्धांमधील प्रतिवादाचे कौशल्य सत्यशोधकी विचारांच्या प्रसारासाठी वापरत होते. तर्कशुद्ध पद्धतीने आणि अभ्यासाच्या आधारे विरोधकांचा आक्रमक प्रतिवाद करण्याकडे त्यांचा कल असायचा. वैचारिक भूमिका घेताना वादांची वादळे अंगावर घ्यायला ते कधी बिचकले नाहीत.

जे पटत नाही ते ठामपणे सांगताना कुणालाही शिंगावर घ्यायला घाबरले नाहीत. कौटुंबिक गरिबीच्या पार्श्वभूमीचा आत्मविश्वासावर त्यांनी कधी परिणाम होऊ दिला नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांचे विचार आणि कार्याचा चालताबोलता शब्दकोष म्हणून हरिभाऊंकडे पाहिले जायचे. त्यासाठी त्यांनी अफाट वाचन केले, अनेक संदर्भ तपासले आणि जगासमोर आणले. महात्मा फुले समग्र वाङ्मय प्रकाशित व्हावे, यासाठी संशोधन व्हावे, सत्यशोधक चळवळीचा इतिहास शब्दबद्ध व्हावा, यासाठी सत्यशोधक डॉ. बाबा आढाव सतत प्रयत्न करत राहिले आणि आजही करत आहेत. बाबांच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी म्हणता येईल अशा हरीभाऊंनी हे काम आणखी ताकदीने पुढे नेले. .

एखाद्या विचारासाठी चळवळींनी भूमिका घेणे महत्त्वाचेच आणि त्या विचारांना राजसत्तेची मान्यता मिळणे हे त्याहून महत्त्वाचे हे हरीभाऊंनी जाणले होते. म्हणून सत्यशोधक विचारांच्या अभ्यास व प्रसारासाठी शासनामार्फतच अनेक गोष्टी व्हाव्यात यासाठी ते न थकता पाठपुरावा करत आणि त्यातील कितीतरी गोष्टी घडवून आणत. हे करताना स्वतः अखंडपणे लिहीत राहिले.

विचारांच्या प्रसारासाठी लेख, पुस्तके, भाषणे, शिबिरे, परिषदांचे आपले एक महत्त्व आहे; पण विचार प्रसाराचा परीघ अमर्याद विस्तारायचा असेल, तर नाटक, चित्रपट, दैनंदिन मालिका या माध्यमांचे महत्त्व कितीतरी पट जास्त आहे आणि पुरोगामी चळवळ त्याकडे दुर्लक्ष करते, अशी त्यांची सतत तक्रार असायची; पण ते नुसती तक्रार करून थांबले नाहीत, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या विचारांना जगासमोर आणणार्‍या दूरदर्शन मालिकांसाठी संशोधक म्हणून सहकार्य केले.अशा मालिका आशयाच्या द़ृष्टीने निर्दोष आणि नेमक्या असतील हे त्यांनी पाहिले; पण आपल्यासहित अशा मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक एवढी मेहनत घेत असताना, धाडस करत असताना प्रेक्षकवर्गाच्या प्रतिसादाअभावी अशा मालिका पुढे जात नाहीत, याबद्दल ते जाहीरपणे त्रागा करायचे. बहुजन समाज, पुरोगामी चळवळ यांनी या बाबी गांभीर्याने घ्याव्यात, यासाठी प्रसंगी कडवटपणे व्यक्त व्हायचे. त्यांची मुलगी प्रमिती हिचा त्यांना खूप अभिमान होता.

विचार प्रसार करणार्‍या मालिकांमधील तिचा अभिनय, तिची भूमिका याबद्दल ते सतत लिहायचे, बोलायचे. त्यांना स्वतःबद्दल बोलायला, लिहायलाही आवडायचे. बहुजन कष्टकरी वर्गातून आलेल्यांना आपली ओळख निर्माण करण्यासाठी केवळ अभ्यास, संशोधन, लिखाण आणि भाषण एवढ्यापुरते नाही, तर स्वतःबद्दल सतत बोलत राहावे लागते, हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही, असे ते म्हणायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news