United States writer murder: लेखिकेच्या हत्येवरून अमेरिकेत जनक्षोभ

आयसीई या फेडरल एजन्सीच्या एका धाडीदरम्यान रॅनी निकोल गुड या 37 वर्षीय निःशस्त्र लेखिकेची हत्या झाली.
United States writer murder
United States writer murder: लेखिकेच्या हत्येवरून अमेरिकेत जनक्षोभPudhari
Published on
Updated on
मुरलीधर कुलकर्णी

11 तारखेचा रविवार अमेरिकेच्या इतिहासातील एक अभूतपूर्व दिवस ठरला. न्यूयॉर्कपासून लॉस एंजेलिसपर्यंत आणि वॉशिंग्टन डी.सी. पासून शिकागोपर्यंत येथील एक हजाराहून अधिक शहरांमध्ये जनक्षोभाचा प्रचंड वणवा पाहायला मिळाला. लाखो अमेरिकन नागरिक ‌‘आयसीई आऊट फॉर गूड‌’ या घोषणेखाली रस्त्यावर उतरले होते, ज्यामुळे अनेक महानगरांचा वेग काही काळासाठी पूर्णपणे थबकला. हा जनक्षोभ 7 जानेवारी रोजी मिनीयापोलिसमध्ये घडलेल्या एका काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अमानुष हत्येच्या विरोधातला परिणाम होता. त्या दिवशी बेकायदेशीररीत्या अमेरिकेत राहणाऱ्या स्थलांतरितांना शोधून काढण्याचे काम करणाऱ्या आयसीई या फेडरल एजन्सीच्या एका धाडीदरम्यान रॅनी निकोल गुड या 37 वर्षीय निःशस्त्र लेखिकेची हत्या झाली.

निव्वळ गैरसमजातून कोणतीही चौकशी न करता आयसीईचा एजंट जोनाथन रॉस याने लेखिकेवर अत्यंत जवळून गोळ्या झाडल्या. वास्तविक रॅनी आपल्या शेजाऱ्यांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी तिथे उपस्थित होत्या. व्हायरल व्हिडीओ पुराव्यांनुसार, रॅनी आपली गाडी वळवून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका लेखिकेची अशी हत्या आणि त्यानंतर प्रशासनाने त्यांचा ‌‘अंतर्गत दहशतवादी‌’ असा केलेला वादग््रास्त उल्लेख यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

या हत्येच्या मुळाशी गेल्यास प्रशासनाचे वाढते दमनकारी धोरण आणि सुरक्षा दलांना दिलेले अमर्याद अधिकार स्पष्टपणे दिसून येतात. रॅनी गुड यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही केवळ त्यांच्या सामाजिक भूमिकेमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले, असा आरोप आंदोलकांकडून आता होत आहे. रविवारच्या निदर्शनांमध्ये केवळ स्थलांतरितच नव्हे, तर सर्वसामान्य अमेरिकन नागरिक, विद्यार्थी आणि मानवी हक्क कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी हे आंदोलन हिंसक वळण घेताना दिसले; मिनीयापोलिसमध्ये आंदोलक आणि पोलीस यांच्यात जोरदार चकमकी झाल्या, तर काही ठिकाणी सरकारी इमारतींना घेराव घालण्यात आला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, काही राज्यांमध्ये लष्करी तुकड्या तैनात कराव्या लागल्या. हे आंदोलन आता केवळ एका हत्येपुरते मर्यादित राहिलेले नसून, ते आयसीई या संस्थेच्या कार्यपद्धतीवर आणि अमेरिकेतील लोकशाही मूल्यांच्या ऱ्हासावर बोट ठेवणारे ठरले आहे.

या घटनेचे भविष्यातील परिणाम अत्यंत गंभीर आणि दूरगामी असू शकतात. सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे फेडरल यंत्रणांवरील जनतेचा उरलासुरला विश्वास आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दोषी एजंटवर त्वरित आणि कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर हे आंदोलन अधिक उग््रा होऊ शकते. राजकीयदृष्ट्या आगामी काळात आयसीई रद्द करा, ही मागणी केवळ घोषणा न राहता एक मुख्य राजकीय अजेंडा बनण्याची शक्यता आहे. प्रशासनाने आपल्या सुरक्षा धोरणात आणि वांशिक दृष्टिकोनात बदल केला नाही, तर रॅनी गुड यांची हत्या ही अमेरिकन समाजातील मोठ्या विभाजनाची आणि संभाव्य नागरी संघर्षाची ठिणगी ठरू शकते, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news