Prophet Muhammad | युगप्रवर्तक ह. मुहम्मद पैगंबर

Prophet Muhammad |
Prophet Muhammad | युगप्रवर्तक ह. मुहम्मद पैगंबरPudhari
Published on
Updated on

शफीक देसाई

केवळ धार्मिक, आध्यात्मिक अंगानेच नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक असे समग्र परिवर्तन व क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण व युगप्रवर्तक कार्य पैगंबरांनी घडवून आणले. आज ईद-ए-मिलाद. त्यानिमित्त...

हज़ारों साल नर्गिस अपनी बे-नूरी पे रोती है,

बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा-वर पैदा।

हजारो वर्षे अज्ञान, अंधकार व अराजकात खितपत पडलेल्या समाजाला सत्य, ज्ञान आणि मानव कल्याणाच्या मार्गावर नेणारा तारणहार, मार्गदर्शक व दूरदृष्टीचा नेता लाभणे फारच दुर्लभ गोष्ट होय. हजारो वर्षांत असा एखादा नेता जन्माला येतो. असाच एक तेजस्वी नेता हजरत मुहम्मद (स.) पैगंबराच्या रूपाने केवळ अरबस्तानालाच नव्हे, तर साऱ्या जगालाच लाभला. जसा इस्लामचा परमेश्वर विश्वात्मक आहे. तुम्ही त्याला ‘अल्लाह’ म्हणा, ‘गाॅड’ म्हणा किंवा ‘परमेश्वर’ म्हणा. तद्वतच प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर सर्व दुनियेसाठी दया आणि कृपा (रहमतुल लिल आलमीन) म्हणून आले. लोकांच्या अखंड दुःख आणि वेदनेच्या आक्रोश व रुदनाला पैगंबरांच्या रूपाने प्रेम, दया आणि करुणेचा पाझर फुटला. हजारो वर्षे माणुसकीसाठी व्याकुळ आणि आसुसलेली सर्वसामान्य जनता सुखावली.

पैगंबरांचे व्यक्तिमत्त्‍व व चारित्र्य अतिशय तेजस्वी, निर्मळ व निष्कलंक होते. दिसताक्षणीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव व भुरळ लोकांवर पडे. ‘आपके अख़लाक (आचार, विचार व नीतिमत्ता) बुलंद हैं आणि नि:संदेह आपण परमेश्वराचे पैगंबर आहात,’ असा त्यांचा सन्मान पवित्र कुराणातच केलेला आहे. अधःपतीत समाज आणि लोकांप्रति अपार प्रेम, दया, करुणा त्यांच्या हृदयात होती. अतिशय नम्र, उदार, क्षमाशील, दातृत्व वृत्ती होती. माणसाचे दुःख आणि वेदना जाणण्याची क्षमता व संवेदनशीलता होती. लोकांना बरोबरीचा दर्जा देऊन त्यांच्यासोबत बसून त्यांचे प्रश्न व अडचणी जाणून त्यांची सोडवणूक ते करायचे. कधीही न रागावता बोलायचे. लौकिक अर्थाने निरक्षर असले तरी त्यांच्याजवळ प्रखर बुद्धिमत्ता, ज्ञान, विवेक, शहाणपण होते. अभ्यासू, चौकस, दिव्य दृष्टी होती. नैसर्गिक व विज्ञानवादी दृष्टिकोन होता. अध्यात्म आणि आचरण, दीन आणि दुनिया, तत्त्‍व व व्यवहार यांची यथायोग्य सांगड घालण्याचे तार्किक कौशल्य, चिकित्सक व बुद्धिप्रामाण्यवादी विचार होते. हा सर्व त्यांच्या सखोल सामाजिक चिंतनाचा परिपाक होता.

अरबस्तानातील तत्कालीन अज्ञान, अंधकार आणि अराजकाच्या खोल गर्तेत बुडालेले, अधःपतीत व ढासळलेले समाजजीवन सावरणे हे पैगंबरांचे जीवनकार्य होते. दीन, दुबळे, शोषित, वंचित, पीडित, अन्याय, अत्याचारित समाजाला त्यांच्या हक्क आणि अधिकारांसह उभारी व नवसंजीवनी देण्याचे काम कठीण होते. अर्थात, त्यांचे कार्य केवळ अरबस्तानापुरते नव्हते तर ते सर्व जगासाठी होते. निसर्ग आणि प्राकृतिक तत्त्वांशी इमान राखणार्‍या, सत्य, न्याय, नीती आणि मानवतावादी मूल्यांवर आधारित इस्लामची स्थापना करणे हे त्यांचे ध्येय होते. अधःपतीत समाजाला सर्वार्थाने उच्‍च, उन्‍नत व उदात्त अवस्थेस नेणे हे त्यांचे व्रत होते. केवळ धार्मिक, आध्यात्मिक अंगानेच नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात अर्थात समग्र सामाजिक परिवर्तन व क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण व युगप्रवर्तक कार्य त्यांनी घडवून आणले. त्यांनी निर्माण केलेले ‘परमेश्वराचे राज्य’ हे सत्य, न्याय व नीतीचे राज्य होते. मानवतेचे राज्य होते. इस्लामच्या एकमेवाद्वितीय निराकार परमेश्वराची ओळख त्याच्या विशेष गुण व नीतिमूल्यांनी होते. त्याची प्रतिष्ठापना मानवकल्याण व लोककल्याणकारी राज्यात होते. यात सर्वसामान्य लोकांचा सन्मान, हित व कल्याण आहे. प्रत्यक्ष जनसामान्यांचे हक्क अधिकार, आशा, आकांक्षा, स्वप्नांचा विचारविनिमय प्रत्यक्ष लोकांच्या सहभागातून (मजलिसे आम) होतो. समाजातील अभ्यासू, तज्ज्ञ, धुरीण मजलिस शुरामार्फत दिशादर्शन करतात. सर्वप्रकारच्या ऐहिक जीवन व्यवस्था निर्माण करण्याचे आणि जीवन सुंदर घडवण्याचे काम माणसाचेच आहे.

तत्कालीन समाजजीवन अतिशय दयनीय अवस्थेस पोहोचले होते. पैगंबरांनी ढासळलेल्या समाजव्यवस्थेचा आपल्या दिव्य दृष्टी व कार्याने उद्धार केला. तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जीवनामध्ये क्रांतिकारक बदल व परिवर्तन घडवून आणले. पैगंबरांच्या कार्याची प्रस्तुतता आजही तितकीच महत्त्‍वपूर्ण आहे. आज लोकांचे स्वातंत्र्य, सन्मान, समता, न्याय व बंधुभाव, व्यक्तीची प्रतिष्ठा व सामाजिक ऐक्य अशा लोकशाही आणि संविधानिक मूल्ये यांचे महत्त्‍व अबाधित राखणे गरजचे आहे. युगप्रवर्तक पैगंबरांनी दाखवलेल्या मार्गावर दृढनिश्चय व निर्धारपूर्वक चालणे संपूर्ण समाजाच्या हिताचे व कल्याणाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news