

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात तसेच कमी वेळेत भरपूर उत्पादन होत असल्याची सध्या सर्वदूर चर्चा आहे; पण त्याचे परिणाम काय असतील, अशा उत्पादनातून रोजगारनिर्मिती कमीत कमी होईल. म्हणजे हे जे ज्यादा आणि वेगाने झालेले उत्पादन आहे, त्याला ग्राहकच मिळणार नाही. कारण, रोजगारनिर्मिती नाही म्हणजे चांगली क्रयशक्ती असलेला ग्राहकवर्ग तयारच होणार नाही. ही उत्पादने विकत कोण घेणार? एक नवा पेच प्रसंग त्यातून उभा राहणार आहे.
अमेरिकेचा आजचा प्रश्न हाच आहे. उत्पादन प्रचंड झाले आहे; पण बाजारपेठ मिळत नाही. सोयाबीन, मका, दूध प्रचंड उत्पादन झाले. सगळे उत्पादन स्वयंचलित यंत्रणांद्वारे आणि कमीत कमी रोजगार निर्माण करून झालेले असल्यामुळे त्या वस्तूंचा ग्राहकवर्ग अमेरिकेत तयार झालेला नाही. तो बाहेर शोधावा लागत आहे. असा ग्राहक चीन किंवा भारतात तर निर्माण होऊ शकत नाही. भारताने अमेरिकेची ही उत्पादने आपल्या मार्केटमध्ये आणण्यास नकार दिला आहे. चीनला तर अमेरिका विचारतच नाही.
आज भारतातसुद्धा थोड्याबहुत फरकाने तीच अवस्था आहे. कृषी उत्पादन भरपूर झालेले आहे. गोदामे भरलेली आहेत; परंतु हे उत्पादन होताना रोजगारनिर्मिती झालेली नाही. कोणत्याच क्षेत्रात परिणामकारक एवढी रोजगार निर्मिती होत नाही. त्यामुळे या कृषी मालाला ग्राहक नाही. म्हणूनच ते फुकट वाटावे लागत आहे. आज आफ्रिकेमध्ये आणि आशिया खंडातल्या काही मागासलेल्या देशांमध्ये भारताची कृषी उत्पादने निर्यात होतात म्हणून ठीक आहे; पण हे देश सुधारले आणि धान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाले, तर भारतासमोरसुद्धा अशीच समस्या निर्माण होणार आहे, जी सध्या अमेरिकेला भेडसावत आहे. तेव्हा रोजगार निर्माण न करणारे उत्पादन मग ते किती का असेना, हे समाजाला घातक ठरते.
1960 च्या दशकाच्या आधी कामगारांचे शोषण मोठ्या प्रमाणावर होत असे. कमीत कमी पगार देऊन त्यांच्याकडून जास्तीत जास्त उत्पादन करून घेतले जात असे; परंतु मुंबईतल्या कारखानदारांनी एकत्र येऊन असा विचार केला की, आपण उत्पादन तर करत आहोत; परंतु आपली उत्पादने आपलेच कामगार विकत घेऊ शकत नाहीत. तेव्हा त्यांचे पगार वाढवून त्यांना चांगले ग्राहक बनवले, तर ते आपला माल खरेदी करतील आणि आपली कारखानदारी चालेल. त्यातून कामगारांना वेतनवाढ देण्यात आली आणि विविध कारखान्यांतून तयार होणार्या उत्पादनांना ग्राहक मिळाले. म्हणजे केवळ उत्पादन करून चालत नाही, तर त्या उत्पादनाला ग्राहक निर्माण होईल अशी व्यवस्था विकसित करावी लागते. आपल्या देशात हरित क्रांती झाली आणि शेतीमाल प्रचंड प्रमाणावर तयार झाला; परंतु त्या मालाला चांगला भाव देऊन खरेदी करण्याची क्षमता असणारा ग्राहकवर्ग विकसित झालेला नाही आणि जो विकसित झाला आहे, त्याची प्रवृत्ती कृषी माल स्वस्तात खरेदी करण्याकडे आहे. शेतीमालाच्या भावाचे खरे दुखणे हे आहे. आपण शहरांमध्ये जे उत्पादन करत आहोत, त्याचा ग्राहक ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकरी हा आहे. तेव्हा आपली कारखानदारी चालायची असेल, तर हा जो आपला ग्राहक आहे त्याच्या खिशात चार पैसे आले पाहिजेत. ते यायचे असतील तर शेतीमालाला चांगला भाव देण्याची प्रवृत्ती शहरातल्या लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. चांगली आणि भरपूर उत्पादने तयार करणे म्हणजे चांगली अर्थव्यवस्था नव्हे, तर या उत्पादनांना चांगले ग्राहक मिळतील, याची व्यवस्था करणे म्हणजे चांगली अर्थव्यवस्था!