

दरवर्षी त्याच त्याच बातम्या त्या त्या सीझनमध्ये वाचायला मिळतात. उदाहरणार्थ, पाऊस पडला की, भुशी डॅममध्ये बुडून चार जणांचा मृत्यू. हे धरण लोणावळ्याच्या जवळ आहे आणि पावसाला सुरुवात झाली की, डॅम ओव्हरफ्लो होतो आणि पाणी वाहायला लागते. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आधीच उत्साह फार, त्यात हे असे अंगावर येणारे पर्यटन म्हणजे मग तर बघायलाच नको. धबधब्यासारख्या ठिकाणी सतत पाणी वाहून शेवाळ साचलेले असते आणि जागोजागी घसरण्याची भीती असते. पडला पाऊस की निघ फिरायला, हे धोरण ठेवून तरुण वर्ग आपआपल्या शहराच्या आसपासच्या धबधब्यावर जाऊन मजा करतात. अरे बाबांनो जरूर जा, मजा करा; पण काही सावधगिरी बाळगणार आहात की नाही?
वर्षांनुवर्षे तशाच प्रकारचे अपघात होऊ नयेत यासाठी त्यावर उपाययोजना का केली जात नसेल, हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना समजत नाही. उदाहरणार्थ, भुशी धरणावर दरवर्षी अपघात होऊन अनेक लोक मरण पावतात. कालच असा काहीसा प्रसंग होऊन दोन युवक येथे बुडून मरण पावले. बुडणार्याला वाचवणारे पण समोर असतात. किमान चार-पाचशे लोकांचा जमाव असतो, तरीही लोक का पडतात, याची वेगळीच कारणे असतात. काल बुडालेले हे दोन तरुण धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या तलावाकडे गेले होते म्हणे. अनेक वर्षांपासून याच ठिकाणी अशाच प्रकारे अपघात होत असतील, तर हे थांबवायची जबाबदारी समाजाची आहे, शासनाची आहे, की नेमकी कोणाची आहे? याचा एकत्रित विचार व्हायला पाहिजे. अरे बाबांनो, धरणाच्या मागच्या बाजूला जाऊन जर लोक पडत असतील, तर धरणाच्या मागे जायचे रस्ते तरी बंद करा, म्हणजे लोक मरायचं कमी होतील.
तशीच गोष्ट काल घडलेल्या अपघाताची. रेल्वेच्या दारामध्ये लोबंकळत पाच-सात जण उभे होते. अशा वेळेला कोणीतरी काहीतरी हुल्लडबाजी केली असेल, कोणाचा कोणाला धक्का लागला असेल किंवा कोणाचा पाय निसटला असेल, तो एक जण पडला, तो पाच जणांना घेऊन पडला. यामध्ये किमान चौघांना प्राण गमावावा लागला, तर अनेक जण जखमी झाले. अरे बाबांनो, हे माहिती असेल तर मग दारात बसून प्रवास कशाला करता? अशा प्रकारचे अपघात ज्या दिवशी थांबतील, तो भारताच्या द़ृष्टीने एक ‘सुदिन’ म्हणावा लागेल. रोजचे वर्तमानपत्र उघडले किंवा टीव्हीचे न्यूज चॅनल लावल्याबरोबर दुसरे काहीच दिसत नाही. इकडे इतके गेले, तिकडे अपघात, भीषण अपघात, साधा अपघात, विचित्र अपघात अशा प्रकारच्या बातम्या असतात. दुसरे काही होणार नसेल, तर मग आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे की, आपण विकास म्हणजे काय करतो आहोत?