

अक्षय निर्मळे
अवघ्या आठ डॉलरची शिदोरी घेऊन कॅनडात जाणारा मूळचा भारतीय तरुण कालांतराने भारतातील आयडीबीआय बँक खरेदी करण्यासाठी ५२,८७८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस सज्ज होतो, ही थक्क करणारी गोष्ट आहे. कॅनडास्थित गुंतवणूकदार प्रेम वत्स सध्या यामुळेच चर्चेत आहेत. वत्सा यांच्या फेअरपॅक्स फायनान्शियल या कंपनीची आयडीबीआय बँकेतील ६०.७२ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची योजना आहे. या व्यवहाराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. आवश्यक नियामक परवानग्या आणि इतर अटींच्या पूर्ततेनंतरच प्रत्यक्ष मालकी हस्तांतरणाचा मार्ग मोकळा होईल.
१९५० साली हैदराबादमध्ये जन्मलेले वत्स यांनी आयआयटी मद्रासमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. शिक्षक वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी उच्च शिक्षणासाठी कॅनडाची वाट धरली. तिथे त्यांचे मोठे बंधू होते. तिथे वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घरोघरी जाऊन एअर कंडिशनर आणि फर्नेस विकण्याचे काम केले. पुढे विमा कंपनीत संशोधन विश्लेषक म्हणून काम करताना कंपन्यांचे मूलभूत मूल्य, त्यांची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील क्षमता यांचा अभ्यास केला. बेंजामिन ग्रॅहम यांच्या मूल्याधारित गुंतवणुकीच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यातून बाजारात एखाद्या कंपनीची किंमत किती आहे, यापेक्षा तिचे वास्तविक मूल्य किती असू शकते, हा प्रश्न विचारण्याची सवय त्यांच्या गुंतवणूक पद्धतीचा महत्त्वाचा भाग बनली. १९८५ मध्ये त्यांनी फेअरफॅक्स फायनान्शियलच्या उभारणीला सुरुवात केली. विमा व्यवसायाच्या आधारावर या समूहाने पुढे विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीचा विस्तार केला. वत्स यांना कॅनडाचे वॉरेन बफेट म्हटले जाते. १९८७, १९९०, २००८ या सालात शेअरबाजारातील घसरण आणि आर्थिक मंदीचा फायदा घेत काही कंपन्यांचे शेअर्स अत्यंत कमी किमतीत त्यांनी खरेदी केले होते.
भारताशी वत्स यांचे संबंध आयडीबीआयच्या एका व्यवहारापुरते मर्यादित नाहीत. फेअरफॅक्स इंडिया होल्डिंग्जच्या माध्यमातून त्यांनी २०१४ मध्येच भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. त्यांचा मुलगा बेन यांची मार्वल कॅपिटल ही कंपनी भारतीय कंपन्यांत गुंतवणूक करते. भारतात विमा, वित्तीय सेवा, पर्यटन आणि पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांत फेअरफॅक्सची गुंतवणूक आहे. भारताच्या आर्थिक क्षमतेवर त्यांचा दीर्घकालीन विश्वास असल्याचे या गुंतवणुकीतून दिसते. फेअरफॅक्सची सीएसबी बँकेतही गुंतवणूक आहे. वत्स यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
वत्स यांचे ‘द फेअरफॅक्स वे’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे; पण त्यांच्या यशाचे खरे मोजमाप केवळ त्यांच्या संपत्तीच्या आकारात किंवा अधिग्रहणाच्या रकमेत शोधता येणार नाही. आर्थिक अडचणीतून बाहेर पडलेल्या बँकेला अधिक सक्षम, स्पर्धात्मक, विश्वासार्ह बनवता आले, तरच आयडीबीआयमधील गुंतवणुकीचे व्यापक महत्त्व सिद्ध होईल. अन्यथा, मोठ्या व्यवहाराची प्रसिद्धी काही काळ टिकेल; परंतु बँकेच्या आर्थिक कामगिरीत मूलभूत बदल झाला नाही, तर त्याचे महत्त्व मर्यादित राहील. आठ डॉलरपासून सुरू झालेली कहाणी तेव्हाच अर्थपूर्ण ठरेल, जेव्हा तिचा शेवट केवळ एका अब्जाधीशाच्या यशात नव्हे, तर एका बँकेच्या पुनरुत्थानात आणि भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेल्या बळात होईल.