प्री-वटपौर्णिमा

Vat Purnima
प्री-वटपौर्णिमाpudhari photo
Published on
Updated on
कलंदर

पूर्वीच्या काळी सण म्हणजे सण असत. त्या विशिष्ट दिवशी ठरलेले विधी करणे किंवा घरी विशिष्ट स्वयंपाक करणे हे निश्चित असे. नंतर आले प्री-वेडिंग. म्हणजे लग्न करण्यापूर्वी वधू-वरांनी परस्परांसोबत विशिष्ट ठिकाणी जाऊन व्हिडीओ काढणे याला प्री-वेडिंग शूट असे म्हणतात. प्री-वेडिंग याचा अर्थ लग्न पूर्वीचे. हळूहळू आपण यालाही सरावलो.

यानंतर आले गर्भवती असण्याच्या काळातले शूट, म्हणजेच मॅटरनिटी शूट. गर्भवती असलेल्या स्त्रिया साधारणत: सातव्या-आठव्या महिन्यामध्ये आपले फोटो काढून त्या रम्य आठवणी साठवून ठेवू लागल्या. आता इथून पुढे प्रत्येक गोष्टीचे ‘प्री’ येते की काय, अशी शंका वाटत आहे. कारण, यावर्षी महिलांमध्ये वटपौर्णिमेचे फोटो आणि व्हिडीओ शूटची क्रेझ आलेली आहे. वटपौर्णिमेचा सण साजरा होईल तिथे कदाचित गर्दी असेल, त्यामुळे फोटो काढायला मिळणार नाहीत. यासाठी आता प्री-वटपौर्णिमा फोटोशूटची क्रेझ यावर्षी पाहायला मिळाली आहे.

तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे सर्व उपलब्ध असण्याच्या काळात छायाचित्रकार मंडळींनी वेगवेगळे पॅकेज बनवले असून, त्यासाठी कितीही पैसे मोजण्यास या महिला तयार आहेत. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते. महिला मंडळी या सणासाठी मुद्दाम नटतात, तयार होतात, मेकअप करतात आणि हे सगळे केल्यानंतर जर त्याचे शूटिंग होणार नसेल तर मग ते फारसे उपयोगाचे नाही, असे त्यांच्या लक्षात आले. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, त्याचबरोबर प्री-वटपौर्णिमा शूट व्हावे, यासाठी हा प्रकार सुरू झाला आहे.

वटपौर्णिमा हा पारंपरिक सण असल्यामुळे यासाठी जिथे वडाची महाकाय भव्य अशी झाडे आहेत, तिथे जाऊन नवर्‍याबरोबर ते शूट केले जाते. शहरांमध्ये जुन्या काळाचा एखादा वाडा असेल, जुने येथे मंदिर असेल अशा परिसरामध्ये वटपौर्णिमेच्या प्रत्यक्ष दहा दिवस आधी हे फोटोशूट होत आहे. कुणीही काही केले तरी कुणाला तरी रोजगार मिळतो, हे तितकेच महत्त्वाचे आहे. हे फोटोशूट किंवा व्हिडीओ शूट करण्यासाठी फोटोग्राफर आणि तत्सम व्यवसायातील मंडळींना पैसे कमावण्याची आणखी एक नामी संधी मिळाली आहे.

निवांतपणे पारंपरिक पद्धतीने सर्व तयारी करून दहा दिवस आधीच वडाला फेर्‍या मारून वटपौर्णिमेची पूजा संपन्न होत आहे. अर्थात, फोटो किंवा व्हिडीओ शूट आधी केले असले, तरी ते सर्व सोशल माध्यमातून वटपौर्णिमेच्या दिवशी टाकले जाते. सर्वांना असे वाटत असेल की, या बायका इतक्या नटूनथटून मुरडत मुरडत एवढ्या गर्दीमध्ये कसे काय येत असतील. हे फोटो किंवा व्हिडीओ शूट आधीच केलेले असते, ते केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी मोबाईलवर भिरभिरत कुठून ना कुठून तरी येत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news