पाकिस्तानमध्ये कोणताही पंतप्रधान पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करू शकलेला नाही. नव्याने पंतप्रधान बनलेले शाहबाज शरीफ हे पाकिस्तानातील पंजाबचे मुख्यमंत्री राहिले असून, लष्कराच्या मर्जीतले आहेत. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी काश्मीरचा राग आळवल्यामुळे येत्या काळात पाकिस्तानच्या आगळिकींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानात अखेर अपेक्षेप्रमाणे इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले. लष्कराच्या समर्थनाने चार वर्षांपूर्वी इम्रान खान पंतप्रधान बनले होते. त्यांच्या पक्षाला मिळालेले बहुमत, त्यांची निवड या सर्व गोष्टी पाकिस्तानी लष्कराने विशिष्ट पद्धतीने घडवून आणल्या होत्या. अत्यंत नाट्यमय पद्धतीने त्यांची पंतप्रधानपदावर निवड झाली होती. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे त्यांचे स्पर्धक होते आणि त्यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग हा पक्ष सत्तेचा अत्यंत प्रबळ दावेदार होता. परंतु, निवडणुकांच्या काही महिने आधी नवाझ शरिफांवर भ्रष्टाचाराच्या जुन्या आरोपांवरून खटले चालवले गेले आणि त्वरित त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली. परिणामी, ते निवडणूक लढवू शकले नाहीत. इम्रान खान यांचा सत्तेचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या होत्या.
इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी क्रिकेट संघाने 1992 मध्ये विश्वचषक जिंकला होता. राजकारणात आले तेव्हा इम्रान खान यांच्याकडे दोन जमेच्या बाजू होत्या. एक म्हणजे घराणेशाहीची पार्श्वभूमी नसणे आणि दुसरे म्हणजे भ्रष्टाचाराचा डाग नसलेले चारित्र्य. त्यामुळे त्यांना जनसमर्थनही भरपूर मिळाले. लष्करानेही त्यांना पूर्ण समर्थन दिले. पंतप्रधान बनल्यानंतर इम्रान खान आणि लष्कराचा संसार उत्तम पद्धतीने चालला; मात्र वर्षभरापासून दोघांत विसंवाद निर्माण होऊन या संबंधांना तडे जाण्यास सुरुवात झाली.
याची सुरुवात झाली ती इम्रान खान यांनी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाची निवड परस्पर केल्यामुळे. लष्करप्रमुख बाजवा आणि इम्रान यांच्यात पडलेली ती पहिली ठिणगी. दुसरी गोष्ट म्हणजे, इम्रान खान यांनी निवडून येताना अमेरिकाद्वेषी टिप्पण्या सातत्याने केल्या. अमेरिका पाकिस्तानला कशी वापरून घेत आहे, अमेरिकेने इराक-अफगाणिस्तानात केलेली कारवाई, लादेनचा खात्मा, इस्लामिक देशांमध्ये अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप या सर्वांवर इम्रान खान यांनी बोट ठेवले होते. पाकिस्तानी जनतेला इम्रान यांची ही भूमिका भावली. पंतप्रधान बनल्यानंतरही इम्रान खान यांनी अमेरिकेशी संबंध निवडणुकांतील भाषणांनुरूपच ठेवले. खरे तर, अमेरिकेने गेल्या 20 वर्षांत 30 अब्ज डॉलर्सहून अधिक अशी सर्वाधिक मदत पकिस्तानला दिली. यातून पाकिस्तानचे लष्करी आधुनिकीकरण होत होते. पाकिस्तानी लष्कराचे आणि अमेरिकेचे संबंध घनिष्ट राहिले असताना इम्रान यांनी मात्र अमेरिकाविरोधी धोरण ठेवले. लष्कराला ही बाब पचनी पडत नव्हती. बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून इम्रान खान यांनी किमान 10 वेळा त्यांना फोन केला; पण बायडेन यांनी त्यांचा एकही फोन उचलला नाही. यावरून इम्रान आणि अमेरिकेतील वितुष्टाची कल्पना येते.
अमेरिकेची साथ सोडल्यानंतर इम्रान यांनी चीनची साथ धरली. चीनच्या प्रचंड मोठ्या गुंतवणुकी इम्रान यांच्या कार्यकाळात पाकिस्तानात झाल्या. इम्रान यांचे चीनप्रेम इतके कमालीचे वाढले की, पाकिस्तान ही चीनची वसाहत म्हणून ओळखली जाऊ लागली. पाकिस्तान हा चीनला गहाण ठेवला आहे, अशी टीका होऊ लागली. चिनी लष्करी अधिकार्यांच्या रक्षणासाठी पाकिस्तानचे 10 टक्के लष्कर सध्या वापरले जाते. चीन आणि पाकिस्तानातील ही जवळीक अमेरिकेला खुपणारी होती.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा भडका उडाल्यानंतर पुन्हा एकदा लष्कर आणि इम्रान यांच्यातील संघर्ष उफाळून आला. कारण, इम्रान खान यांनी या युद्धामध्ये रशियाची बाजू उचलून धरली. रशियाच्या समर्थनार्थ काही वक्तव्येही केली. दुसरीकडे बाजवा यांना इम्रान खान यांनी युक्रेनची बाजू घ्यावी, असे वाटत होते. कारण, युक्रेनने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर संरक्षण साधनसामग्री दिली आहे. ज्या-ज्यावेळी काश्मीरचा प्रश्न आला त्या-त्यावेळी युक्रेन पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला. भारताने जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला तेव्हा युक्रेनने भारतावर टीका केली होती. दहशतवादाच्या मुद्द्यावरही युक्रेनने पाकिस्तानची पाठराखण केली. तथापि, इम्रान यांनी रशियाची बाजू उचलून धरल्याने बाजवा आणि त्यांच्यातील संघर्ष वाढला. सौदी अरेबियाबरोबर पाकिस्तानचे संबंध दुरावले. त्यामुळे सौदीकडून मिळणारी मदतही बंद झाली. एकंदरीत, परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर चुकलेले निर्णय हे इम्रान आणि लष्करामधील संबंध खालावण्यास कारणीभूत ठरले. दुसरीकडे देशांतर्गत धोरणे राबवण्यामध्ये इम्रान यांना पूर्ण अपयश आले. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने ग्रे लिस्टमध्ये अडकल्यामुळे पाकिस्तानात येणारी विदेशी गुंतवणूक पूर्णतः थांबली. तिसरीकडे सामान्यांना महागाईचे चटके जाणवू लागले. टोमॅटोच्या भावाने शंभरी पार केली. सोने 1 लाख रुपये तोळा झाले. अशा अनेक गोष्टींमुळे जनतेत इम्रान यांच्या विरोधात असंतोष पसरला. या सर्वांचा स्फोट मागच्या महिन्यात झाला. इम्रान यांचे साथीदार त्यांच्या सरकारमधून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. याचा फायदा विरोधी पक्षांनी घेतला. पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग यांनी एकत्र येत इम्रानविरोधात जनआंदोलन पुकारले आणि त्याला एमक्युएमची साथ मिळाली.
इम्रान खान यांच्या जागी पंतप्रधानपदी निवड झालेले शाहबाज शरीफ हे नवाझ शरीफ यांचे थोरले भाऊ आहेत. ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना लष्कराचे पूर्ण समर्थन आहे. किंबहुना ते लष्कराच्या मर्जीतले नेते आहेत. पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. पाकिस्तानातील महागाई नियंत्रणात आणावी लागेल, तरच त्यांना जनतेचे समर्थन मिळेल. याबाबत ते इम्रान यांच्यापेक्षा वेगळ्या भूमिका कोणत्या घेतात, हे पाहावे लागेल. भारताबाबत विचार करता पदभार स्वीकारण्यापूर्वीच शाहबाज यांनी काश्मीर राग आळवला आहे. काश्मीरचा प्रश्न सुटल्याशिवाय भारतासोबत शांततापूर्ण संबंध शक्य नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. अर्थातच, त्यांचा बोलावता धनी लष्कर असल्यामुळे हे अपेक्षितच होते. त्यामुळे येत्या काळात भारताविरुद्ध आगळिकी करून, प्रक्षोभक विधाने करून त्यांचे सरकार लष्कराची मर्जी सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसेल. या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत सावध राहण्याची आवश्यकता आहे.