

काय म्हणताय मंडळी, संपली ना एकदाची दिवाळी? एव्हाना घरातील खाद्यपदार्थ फस्त करून झाले असतील. आता एकदाचा दिवाळीचा उतारा केला की, मग आपण आपले नेहमीचे आयुष्य जगायला मोकळे. खूप दिवस गोड आणि मिठाई खाऊन कंटाळा आला की, जे चमचमीत जेवण केले जाते त्याला ‘दिवाळीचा उतारा’ म्हणतात.
दिवाळीला व्यापारी मंडळी नवीन हिशेब सुरू करतात. दिवाळी संपत आली की, तुम्ही-आम्हीपण लगेच हिशेबाला लागतो. ही दिवाळी किती रुपयांना पडली, याचा अंदाज काही केल्या येत नाही. कपडे, किराणा, अन्न पचविण्यासाठी लागलेली औषधी, बहिणींना भाऊबीजेची घातलेली ओवाळणी, फटाक्यांना लागलेले पैसे या सर्वांमध्ये आणखी एक खर्च लावायचा राहून गेलेला असतो, तो म्हणजे ‘दिवाळीनंतरचा उतारा’. तेच गोड जेवण, विना लसणाकांद्याच्या भाज्या, तळलेले पदार्थ यावर उतारा म्हणून सणसणीत शेरव्याची काळ्या मसाल्यातील भाजीच पाहिजे. त्याच्याबरोबर गावरान हिरव्या मिरच्यांचा लसूण घालून पाटा -वरवंट्यावर रगडून केलेला ठेचा किंवा खर्डा असावा.
सोबत फोडणी टाकलेली आणि अलगद पातोडा निघणारी मुगाची भाकरी असावी. अहाहा! काय बहार येते नाही? आम्ही कच्चा कांदा विसरलो असे वाटले ना तुम्हाला? हीच का आमच्या खाद्यप्रेमाची परीक्षा? कांदा, लिबूं, सोलापुरी शेंगदाण्याची लाल चटणी, तिखट जाळ बेसन, लसणाचा तडका हे सर्व पदार्थ एक्सेसरीजमध्ये आहेत. असे बहारदार जेवण जेवताना डोक्याच्या मागील भागातून थेट एक घामाची धार निघते आणि कानाला वळसा घालून गळ्याच्या घाटीजवळ रेंगाळते, तिची पर्वा करू नये. जिभेचा सर्वांगाने जाळ होतो त्याचीही पर्वा करू नये. असले जेवण घरी मिळत नसते. त्याचीही पर्वा करू नये. दिवाळीचा उतारा घडवून आणायचा म्हणजे काय? गोडाची चव घालविण्यासाठी खमंग आणि तिखटच पाहिजे.
मधुमेही मंडळींना मात्र ‘दिवाळीचा उतारा’ करण्यासाठी गोळ्यांचा खुराक वाढवावा लागतो. झुगारून दिलेले बंध पुन्हा सावरावे लागतात. सरकारी कर्मचारी आणि शिक्षक मंडळी दिवाळीनंतर अत्यंत काटकसर करताना दिसतात. बोनस बंद झाल्यापासून दिवाळी आधीच अवघड झाली आहे. खर्चाचा ताळेबंद बिघडवणारी दिवाळी तशी आनंदाचीच असते. यावर्षीची ही दिवाळी तुम्हाला अत्यंत आनंदाची गेली असणार, यात शंका नाही. दिवाळीचा खरा आनंद आपले रक्ताचे नातेवाईक आणि आप्तस्वकीय यांना भेटण्याचा असतो. गावाकडे जाणारी गर्दी पाहता बहुतेकांच्या सर्व अपेक्षित भेटी घडल्या असतीलच, यात शंका नाही. दिवाळी संपली, आता नवीन वर्ष येईल. तोपर्यंत दिवाळीच्या रम्य आठवणींमध्ये दिवस कसे जातील हे समजत पण नाही. आम्ही सांगितल्याप्रमाणे ‘दिवाळीचा उतारा’ मात्र जरूर करा म्हणजे तुमच्या पोटाची बिघडलेली प्रकृती मूळ पदावर येईल, हे नक्की!