Delimitation Bill | 'परिसीमन'वरून राजकीय घमासान

Delimitation Bill  |
Delimitation Bill | 'परिसीमन'वरून राजकीय घमासान
Published on: 
Updated on: 

उमेश कुमार

संसदेत परिसीमन विधेयकावर काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सरकारला आपल्या संख्याबळाचा विश्वास आहे, तर विरोधकांना क्रॉस व्होटिंगमुळे समीकरणे बदलण्याची आशा आहे. या प्रक्रियेत खासदार पक्षाच्या भूमिकेला प्राधान्य देणार, स्वतःच्या विवेकबुद्धीने मतदान करणार की अन्य दबावांना बळी पडणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. परिसीमन विधेयकाच्या निमित्ताने भारतीय राजकारणातील पक्षनिष्ठा, सत्तासमीकरणे आणि राजकीय नैतिकतेची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.

राजधानी दिल्लीत थंडी वाढली आहे, मात्र राजकारणाचा पारा शिगेला पोहोचला आहे. संसदेच्या कॉरिडॉरपासून ते हॉटेलच्या खोल्यांपर्यंत एकच चर्चा आहे, ती म्हणजे 'परिसीमन विधेयक' (मतदारसंघ पुनर्रचना विधेयक). सोमवारी (३० नोव्हेंबर) हे विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून, त्यानंतर भारतीय राजकारण कोणत्या दिशेने वळणार हे स्पष्ट होईल. सत्ताधारी पक्षाला हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर करून घ्यायचे आहे, तर विरोधकांना ते कोणत्याही परिस्‍थितीत रोखायचे आहे. याच हट्टामुळे दिल्लीचे रूपांतर एका मोठ्या राजकीय आखाड्यात झाले आहे.

मोदी-शाह जोडीने या विधेयकासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. साम, दाम, दंड, भेद या राजकारणातील सर्वच अस्त्रांचा वापर केला जात आहे. प्रत्येक खासदाराशी संवाद साधला जात असून, एक-एक मत मोजले जात आहे. दुसरीकडे, 'इंडिया' आघाडीत फूट पडली असली तरी विरोधकही कमजोर पडायला तयार नाहीत. त्यांनीही आपले सर्व डाव टाकले आहेत. काँग्रेसने आपल्या चारही मुख्यमंत्र्यांना संख्याबळ जमवण्याच्या कामाला लावले आहे. तेलंगणा आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर विशेषतः द्रमुकला (डीएमके) आपल्या बाजूने वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, कारण या संपूर्ण खेळात द्रमुकची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. सध्या द्रमुकने या विधेयकाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

दोन्ही बाजूंचे सर्व मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून आहेत. हॉटेल्समध्ये बैठका होत आहेत, घरांमध्ये 'लंच' आणि रात्री 'डिनर'चे आयोजन केले जात आहे; या 'लंच आणि डिनर डिप्लोमसी'द्वारे खासदारांना साद घातली जात आहे. सरकार आश्वस्त दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत आहे, पण धोका अजून टळलेला नाही. सरकारने केलेल्या तडजोडींमुळे बहुमताचा आकडा पूर्ण होताना दिसत असला, तरी तो इतकाही जास्त नाही की त्यांनी निश्चिंत राहावे. या मतदानात मोठ्या प्रमाणावर 'क्रॉस व्होटिंग' होण्याची शक्यता आहे आणि मतदानाचे हे स्वरूप कोणाचाही खेळ बिघडवू शकते, कोणाचेही गणित चुकवू शकते. त्यामुळेच दोन्ही बाजू घाबरलेल्या आहेत आणि दोन्ही बाजू अत्यंत सतर्क आहेत.

या विधेयकावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे दोन प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे; पहिला म्हणजे द्रमुक (डीएमके) आणि दुसरा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी). या दोन्ही पक्षांना सध्या तात्कालिक फायदा होताना दिसत असला, तरी भविष्यात त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, अशी चर्चा दिल्लीपासून चेन्नई आणि मुंबईपर्यंत सुरू आहे. द्रमुकच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित झाला, जिथे अनेक नेत्यांनी अशी चिंता व्यक्त केली की विधेयकाला पाठिंबा दिल्यास तामिळनाडूच्या जनतेत 'राज्यविरोधी' असल्याचा चुकीचा संदेश जाईल. या नकारात्मक संदेशाचे राजकीयदृष्ट्या पक्षाच्या हितात रूपांतर कसे करायचे, यावर दीर्घ चर्चा झाली, पण त्यातून कोणताही ठोस मार्ग निघाला नाही. दुसरीकडे, सीबीआय आणि ईडीच्या फासाची भीती द्रमुक नेत्यांना सतावत आहे; पाठिंबा न दिल्यास तुरुंगात जाण्याची आणि जुनी प्रकरणे पुन्हा उघडण्याची भीती त्यांना आहे, आणि हीच भीती त्यांना झुकवत आहे.

राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, द्रमुक काँग्रेसचा बदला घेण्यासाठी भाजपला पाठिंबा देत नसून, ते केवळ मजबुरीमुळे असे करत आहेत. दिल्लीत सध्या एक यादी फिरत आहे, ज्यामध्ये तामिळनाडूतील कथित घोटाळ्यांचा उल्लेख असून हा एकूण आकडा १,७५,५८० कोटी रुपयांपर्यंत सांगितला जात आहे. यामध्ये 'डीएमके फाईल्स'मध्ये १,३४,००० कोटी, मेट्रो रेल्वेमध्ये २०० कोटी, 'कॅश-फॉर-टेंडर'मध्ये १,०२० कोटी, 'कॅश-फॉर-जॉब्स'मध्ये ८८८ कोटी, वाळू उत्खननात १,४७२ कोटी, स्टॅलिन ट्रस्टमध्ये ८,००० कोटी आणि पीटीआर (PTR) ऑडिओच्या दाव्यात ३०,००० कोटी रुपयांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. हे आकडे दिल्लीच्या राजकीय गल्ल्यांमध्ये आणि सोशल मीडियावर फिरत आहेत. या आकड्यांची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी त्यांची भीती मोठी आहे आणि ही लूट वाचवण्यासाठीच स्टॅलिन यांना भाजपसमोर झुकावे लागत असल्याचे म्हटले जात आहे.

दुसरीकडे, शरद पवारांची कहाणी वेगळी असली तरी भीती सारखीच आहे. प्रमोद महाजन एक किस्सा सांगायचे की, पवारांचे नशीब किती बलवत्तर आहे! २००४ मध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार होते, सर्व काही ठरले होते, पण पवारांनी ऐनवेळी माघार घेतली; त्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि पवार १० वर्षे केंद्र व महाराष्ट्र सरकारमध्ये सत्तेत भागीदार राहिले. पवार नेहमी दोन्ही बाजूंचे रस्ते खुले ठेवतात, कधीही एका बाजूला पूर्णपणे झुकत नाहीत; हेच त्यांचे राजकारण राहिले आहे आणि हीच त्यांची ताकद राहिली आहे. पण यावेळी खेळ वेगळा आहे, डाव मोठा आहे आणि त्यांच्या पक्षाचे अस्तित्वच पणाला लागले आहे. ते भाजपसोबत गेल्यास त्यांची स्वतःची ओळख काय उरेल आणि विरोधकांसोबत राहिल्यास आपल्या मुलीचे भविष्य कसे सावरणार? तपास यंत्रणांची भीती काय घडवून आणेल, हीच खरी द्विधा मनःस्थिती आहे. दिल्लीत अशी चर्चा आहे की, ज्या उद्योगपतीने पवारांच्या पक्षासोबत हा करार (डील) घडवून आणला आहे, तोच उद्योगपती सोशल मीडियावर परिसीमनाच्या बाजूने वातावरण निर्मिती (नॅरेटिव्ह) करत आहे. दरम्यान, आणखी एका बातमीने दिल्लीत खळबळ उडवून दिली आहे. असे सांगितले जात आहे की, बिहारच्या एका खासदाराने समाजवादी पक्षाच्या (सपा) एका खासदाराला लोकसभेत विधेयकाचे समर्थन करण्याच्या बदल्यात आमिष दाखवले होते आणि संभाषणादरम्यान भाजपच्या एका मोठ्या नेत्याचे नावही घेतले होते. सपाच्या खासदाराने हे संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करून अखिलेश यादव यांना सांगितले. अखिलेश यादव यांनी यावर पत्रकार परिषद घेण्याची तयारीही केली होती, पण दिल्लीला याची कुणकुण लागली. दिल्लीतील नेतृत्व सक्रिय झाले, बिहारच्या खासदाराला चांगलेच खडसावण्यात आले आणि तातडीने फोन फिरवले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, सपाकडून नुकतेच राज्यसभेवर गेलेल्या एका धनाढ्य व्यक्तीने मध्यस्थीची भूमिका बजावली आणि सध्या हे प्रकरण दाबण्यात आले आहे.

दिल्लीत सध्या आणखी एक यादी फिरत आहे, ती म्हणजे खासदारांच्या संपर्काची यादी. असे म्हटले जात आहे की, शरद पवारांचे ४ खासदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, द्रमुकचे ९ खासदार 'टीव्हीके'च्या संपर्कात आहेत, आरजेडीचे २ खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, जेएमएमचे ३ खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, वायएसआर काँग्रेसचे २ खासदार टीडीपीच्या संपर्कात आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे ३ खासदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. हे आकडे खरे आहेत की खोटे, याला कोणीही दुजोरा देत नाहीये, परंतु या आकड्यांनी भीती वाढवली आहे. प्रत्येक पक्षाला आपल्याच खासदारांवर संशय येऊ लागला असून प्रत्येक पक्ष आपल्या खासदारांवर नजर ठेवून आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांचा विश्‍वास

संसदेत काय होईल, हे कोणालाच माहीत नाही. सरकार म्हणत आहे की त्यांच्याकडे संख्याबळ आहे, तर विरोधक म्हणत आहेत की त्यांच्याकडे रणनीती आहे. सरकारला विश्वास आहे की त्यांच्या रणनीतीमुळे आकडा पूर्ण होईल, तर विरोधकांना विश्वास आहे की क्रॉस व्होटिंगमुळे खेळ पलटेल; पण सत्य हे आहे की दोन्ही बाजू घाबरलेल्या आहेत. सरकारला भीती आहे की त्यांचे स्वतःचेच खासदार क्रॉस व्होटिंग तर करणार नाहीत ना, तर विरोधकांना भीती आहे की त्यांचे खासदार विकले तर जाणार नाहीत ना! म्हणूनच दिल्लीत तळ ठोकला गेला आहेे.हे विधेयक लोकशाहीचीही परीक्षा आहे की, खासदार आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करणार का? की ते पक्षाच्या दबावाखाली मतदान करणार? ते लालसेपोटी मतदान करणार की भीतीपोटी? असे म्हटले जाते की राजकारणात नैतिकता हीच सर्वात मोठी ताकद असते, आज ती नैतिकता कुठे आहे, हाच खरा प्रश्न आहे. परिसीमन विधेयक मंजूर होणार की नाही, हे तर पुढील दोन दिवसांत कळेलच, पण हे निश्चित आहे की या विधेयकाने भारतीय राजकारणाचा खरा चेहरा समोर आणला आहे. हा चेहरा भीतीचा आहे, लालसेचा आहे, सौदेबाजीचा आहे आणि हा चेहरा जनता पाहत आहे. जनता सर्व काही समजत आहे, जनता सर्व काही लक्षात ठेवेल; शेवटी निर्णय जनतेलाच घ्यायचा आहे. खासदार तर फक्त एक मत आहेत, जनता हीच खरी मालक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.