पहिला चहा | जियो रे बाहुबली..!

पहिला चहा | जियो रे बाहुबली..!
पहिला चहा | जियो रे बाहुबली..!
Published on
Updated on

बाहुबली पक्षांतरानंतर इतक्या वर्षांनी बाहूचे म्हणजेच भुजाचे बळ प्रदर्शन करू शकत नसल्याने सभेमध्ये वक्तव्यात बळ आणण्यासाठी बोलत राहिले. विषय होता 'मी मुख्यमंत्री असतो तर?' इतक्या वर्षांनी अशी स्वप्नं पडू लागल्याने पक्षश्रेष्ठी कोणाकोणाला म्हणून स्वप्नं सांगणार? कसे सांगावे, काय करावे हे श्रेष्ठींना सुचेना. मनात आले, एका खास दिनानिमित्त आपले हे स्वप्न सर्वांना सार्वजनिकरीत्या सांगून टाकू. पोटातले ओठात आणावे, त्याशिवाय आपले अपुरे स्वप्न पूर्ण होणार नाही. या विचारांनी पक्षश्रेष्ठी मोठ्या सभेत बोलते झाले. दिवस होता पक्षाच्या वाढदिवसाचा. भारी योग जुळून आला. आम्ही असे केले असते, तसे केले असते, असे नाही, तर तसेही झाले असते. जियो बाहुबली! आपल्या पक्षाचा आपल्याला पाठिंबा आहेच. १९९० च्या आसपासचा काळ यांच्या भाषणात डोकावून गेला.

'हम ये करेंगे....(शांतता) हम वो भी करेंगे (शांतता)... कुछ नहीं हुआ तो कुछ नहीं करेंगे....' (कायमचीच शांतता! पुढील मंत्रिपदी नियुक्ती होईपर्यंत)

आश्वासन म्हणता येणार नाही; पण स्वप्न म्हणू या ठिकाणी! निष्ठेचे साम्राज्य आणि साम्राज्यावर निष्ठा असं काहीसं बोलत बोलत स्वारी मैदानी खेळावरही बोलू लागली. राजकारणाचा खेळ होतोय. खेळात राजकारण नको. आपल्यासारखे दिग्गज निपुण खेळाडू आपण खेळाला नावं न ठेवता खेळ खेळावा अशी अपेक्षा जनतेचीच आहे. कारण, आपणास खेळांचे समीकरण मांडणे अवघड नाही. राजकारण म्हटले की, पेचप्रसंग आले. संघर्षाशिवाय पद मिळत नाही. मग, तो कसलाही असो. नाण्याला दोन बाजू असतात. झाकली मूठ सव्वालाखाची, हे सर्व सूत्र हाती येतात तेव्हा आपोआप घडत जातं.

'जिंदगी का सफर, है ये कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं.' हे गाणं टाकलं असतं भाषणात तर भाषण अजून उठावदार झालं असतं; पण भावना व्यक्त झाल्या हेही तितकेच महत्त्वाचे! गाणं कोणतंही गायला तरी सूर जनतेला कळला पाहिजे. त्याग, समर्पण म्हणत शेवटी वाट सत्तेची? ही राजकारण आणि निवडणुकांची व्याख्या विखी वूखू काहीच कळलं नाही बुवा. असो. तुम जियो हजारो साल! आपल्या पक्षास वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(एक सुज्ज्ञ नागरिक)

(ता. क. - बाकी भाषण आणि आपण गायिलेले गाणे छान होते; पण आम्हास, 'छगन नमन कर आणि खाऊ आण' एवढीच बाराखडीतली अक्षरं जुळवता येतात.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news