

राजेंद्र जोशी
देशात विमानसेवा विस्तारली; पण पायाभूत सुविधा, विमानांच्या तंदुरुस्तीपुढे मात्र प्रश्नचिन्ह उभे आहे. राजकीय नेत्यांना वेळ आणि जीव यांच्यात फैसला करावा लागत आहे.
राजकारणात नेत्यांकडे वेळ मर्यादित असतो. या मर्यादित वेळेत कामे उरकण्यासाठी राजकीय नेते खासगी विमानसेवेचा आधार घेतात आणि घाईगडबडीच्या दिनचर्येमध्ये विमान अपघाताने त्यांच्या जीवावर मृत्यूची टांगती तलवार कायम राहते. महाराष्ट्राचे धुरंदर राजकारणी अजित पवार यांचा बुधवारी सकाळी अशाच कार्यक्रमांनी खचाखच भरलेल्या दिनचर्येत बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यथावकाश यातून फारसे काही सिद्ध होईल, असे यापूर्वीच्या विमान अपघातातील चौकशीच्या अनुभवावरून वाटत नाही; परंतु महाराष्ट्रावर मात्र एका तरुण, तडफदार नेत्याला गमावण्याची वेळ आली आहे. यामुळे आता संपूर्ण भारतीय राजकारणापुढेच वेळ आणि जीव यांचे गणित घालण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर बिनबुडाच्या आणि सत्य गुलदस्त्यात ठेवणार्या चौकशी समित्या नियुक्त करण्याऐवजी खासगी विमानसेवेच्या अपघातांचे प्रमाण का वाढते आहे, याचे मूळ शोधण्याची गरज आहे.
भारतामध्ये विमान अपघातातील मृत्यूचे गूढ न उकलणे ही गेल्या 75 वर्षांची परंपरा आहे. दि. 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमधील तैपेयी विमान तळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच टोकियोकडे जाणार्या जपानी बॉम्बर विमानाच्या अपघातात ब्रिटिश सत्तेला आझाद हिंद सेना स्थापन करून आव्हान देणार्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताची कारणे शोधण्याचे काम आजही सुरू आहे. तीन चौकशी समित्या न्यायमूर्ती एम. के. मुखर्जी आयोग नेमूनही सुभाषबाबूंच्या मृत्यूचे खरे कारण समजले नाही. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी यांचा 1980 मध्ये दिल्ली विमान अपघातात मृत्यू झाला. 2001 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे, 2002 मध्ये लोकसभा अध्यक्ष आणि तेलगू देसम पार्टीचे नेते जी.एम.सी. बालयोगी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.
2005 मध्ये हरियाणाचे मंत्री ओ. पी. जिंदाल आणि सुरेंद्रसिंह हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडले. 2009 मध्ये आंध्र प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री वाय.एस.आर. रेड्डी यांचाही हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. पुढे 2011 मध्ये अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे अशाच अपघातात निधन झाले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राने विमान अपघातात आपला धुरंदर नेता गमावला. यातील विजय रूपाणी यांचा एअर इंडियाच्या विमानातील मृत्यूचा अपघात वगळता उर्वरित मृत्यू हे खासगी विमानसेवेत झाले आहेत. यामुळे खासगी विमान सेवेच्या सुरक्षिततेभोवती संशयाचे काहूर उठले आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालयाला (डीजीसीए) नव्याने काही कठोर निर्णय घेणे आवश्यक ठरले आहे.
जगभरात विमान प्रवासाचे लोण दिवसेंदिवस वाढते आहे. 2025 मध्ये 980 कोटी प्रवाशांनी विमान प्रवासाचा आधार घेतला. आता 2026 मध्ये प्रवाशांची संख्या एक हजार कोटींचा टप्पा सहज ओलांडेल, असे चित्र आहे. भारत ही जगातील विमान प्रवासाची तिसर्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. भारतात 2025 मध्ये 2 कोटी 41 लाख प्रवाशांनी विमान प्रवासाला पसंती दिली. यामध्ये देशांतर्गत विमान वाहतूक प्रवाशांची संख्या 1 कोटी 61 लाख इतकी होती. या विमान प्रवासासाठी भारतामध्ये विमानतळांची निर्मिती आणि पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नांना गती आली आहे. केंद्र सरकारने छोट्या शहरांना विमानसेवेद्वारे जोडण्यासाठी उडान योजना अंमलात आणली आणि या योजनेच्या नवव्या वर्षी एकूण 88 नव्या विमानतळांची उभारणी झाली. ही संख्या 120 पर्यंत वाढविण्याचे नियोजन सुरू आहे. याद्वारे 619 मार्गांवरून विमानसेवेची भर पडली. परंतु, या विमानसेवेला काटेकोर सुरक्षिततेची जोड मात्र मिळाली नाही. बारामती हे देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे केंद्र समजले जाते. तेथे विमानतळ आहे; परंतु लँडिंगसाठी ज्या अत्याधुनिक सुविधांची जोड आवश्यक होती, ती मात्र उपलब्ध नव्हती. किंबहुना, त्याचाच फटका अजित पवारांसारख्या बारामतीचे नंदनवन करणार्या, अनेक राजकीय लाटांमध्ये स्वतःचे मताधिक्य ढळू न देणार्या नेत्याला बसला.
विमानसेवेमध्ये अपघातांची नोंद, चिकित्सा आणि त्यामागील कारणे शोधण्याचे काम अमेरिकेतील राष्ट्रीय हवाई सुरक्षा मंडळामार्फत केले जाते. हे मंडळ (एनटीएसबी) विमान अपघाताच्या आकडेवारीचा मागोवा घेते आणि अपघातांची चौकशी करते. त्यांच्या अहवालानुसार, जगभरात अलीकडच्या काही वर्षांत विमान अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. याउलट खासगी विमान अपघातांच्या संख्येमध्ये मात्र वाढ होत आहे. या अपघातांची मीमांसा करताना एनटीएसबीने त्याचे वर्गीकरण केले. यामध्ये विमानाच्या एकूण अपघातामध्ये वैमानिकांची चुकी 53 टक्के कारणीभूत ठरली. यांत्रिक बिघाडामुळे 21 टक्के विमान अपघात आणि 11 टक्के अपघातांना खराब हवामान कारणीभूत होते. यामध्ये 57 टक्के विमान अपघात हे विमानाच्या उड्डाण आणि लँडिंगदरम्यान होत आहेत. जागतिक स्तरावरील या गंभीर निरीक्षणाची नोंद घेऊन भारत सरकारने गतवर्षी कायद्यात मोठा बदल केला. वैमानिकांवरील शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्याकरिता त्यांचे कामाचे तास दोन ड्युटींमधील अंतर यावर कठोर निर्बंध आणले. त्याच्या अंमलबजावणीला वर्षभराची मुदत देऊनही त्याकडे भारतीय विमान कंपन्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. यामुळे गेल्या महिन्यातच इंडिगो या कंपनीची हजारो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. ही उपाययोजना वैमानिकांची चूक टाळण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल होते; परंतु विमानाच्या तंदुरुस्तीचे काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
महामार्गावरील वाहनांच्या गर्दीची चर्चा नेहमी होते; पण आकाश व्यापणार्या विमानांच्या गर्दीची चर्चा होत नाही. उडान योजनेअंतर्गत विमानसेवेचे आर्थिक गणित नफ्यात आणण्यासाठी विमान कंपन्यांनी देशातील विमानसेवेला शेअर ए टॅक्सीसारखे रूप दिले आहे. एक विमान पुण्याहून दिल्लीला जाते. दिल्लीहून जम्मूला जाते. जम्मूहून पुन्हा दिल्लीत येते आणि नव्या उड्डाणासाठी सज्ज राहते. या प्रवासात विमानांची देखभाल, दुरुस्ती केव्हा होणार? या देखभाल, दुरुस्तीच्या मुद्द्यावर प्रवासी विमानसेवेबरोबर खासगी विमानसेवेलाही काही कठोर नियमन होणे अगत्याचे ठरते. अन्यथा, अजित पवारांसारखा तगडा नेता हरवला, की ‘दादा गेले’ म्हणून हळहळण्याशिवाय नागरिकांच्या हातात काही राहत नाही.