Goa Political Hoardings | गोव्यात राजकीय होर्डिंग युद्ध

Goa Political Hoardings | गोव्यात राजकीय होर्डिंग युद्ध
Goa Political Hoardings | गोव्यात राजकीय होर्डिंग युद्ध
Published on
Updated on

मयुरेश वाटवे

गोव्यात विधानसभा निवड‍णुकीला अजून पाच महिने असले, तरी आताच रंगलेल्या पोस्टर युद्धाने मतदारांची करमणूक होत आहे. महागाई, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था या मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचे काम विरोधकांनीच हाती घेतलेले दिसते.

गणेश चतुर्थीच्या उत्सवी वातावरणात गोव्यातील राजकीय तापमानही वाढू लागले आहे. विधानसभा निवडणुकीला अजून पाच महिने असले, तरी राजकीय पक्षांनी प्रचाराची दिशा आणि एकमेकांवरील हल्ल्यांची भाषा निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. त्याची पहिली मोठी झलक रस्त्यांवर झळकलेल्या होर्डिंगच्या माध्यमातून दिसून आली. आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टीने एकत्र येत ‘डोण्ट लेट देम चीट यू द थर्ड टाईम’ असा संदेश देणारी होर्डिंग्ज लावली आणि गोव्याच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला अधिकृत स्वरूप आले. १४ सप्टेंबर रोजी या दोन्ही पक्षांनी ‘गोवा फर्स्ट’ या नावाने आघाडीची घोषणा केली.

या घोषणेपूर्वीच विजय सरदेसाई यांच्याकडून काँग्रेसवर सातत्याने टीका सुरू होती. आता काँग्रेसपासून अंतर राखत आम आदमी पक्षाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय झाल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. गेल्या दोन निवडणुकांनंतरच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत ‘काँग्रेस फुटते’ हे मतदारांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या होर्डिंग्जचा उद्देश केवळ भाजपवर टीका करणे नाही, तर काँग्रेसलाही त्याच राजकीय चौकटीत ठेवून मतदारांसमोर वेगळा पर्याय मांडणे हा असल्याचे दिसते. लोकांची उत्सुकता वाढवणारे हे होर्डिंग्ज आता राजकीय अस्त्र बनणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोवा फॉरवर्डच्या या आक्रमक प्रचाराला काँग्रेसकडूनही प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेसने सरदेसाई यांच्या राजकीय भूतकाळाची आठवण करून दिली आहे. २०१७ मध्ये काँग्रेस १७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता; मात्र भाजपने १३ जागा जिंकून गोवा फॉरवर्डच्या तीन आमदारांसह इतरांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. विजय सरदेसाई यांनी त्या वेळी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. आज काँग्रेसकडून याच इतिहासाचा राजकीय प्रतिवाद म्हणून वापर केला जात आहे.

या सगळ्यात विजय सरदेसाई यांची राजकीय प्रतिमा हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. २०१७ मध्ये भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचे त्यांनी त्यावेळी समर्थन केले होते. स्थिर सरकार आणि गोव्याचे हित ही कारणे त्यासाठी त्यांनी दिली होती. आज मात्र त्याच राजकीय इतिहासाकडे विरोधक वेगळ्या नजरेने पाहत आहेत. त्यामुळे आगामी प्रचारात केवळ पक्षांची भूमिका नव्हे, तर नेत्यांच्या पूर्वीच्या निर्णयांचीही वारंवार चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘गोवा फर्स्ट’च्या घोषणेमुळे निवडणुकीची संभाव्य लढत अधिक बहुकोनी झाली आहे. आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्डने भाजप आणि काँग्रेसपासून स्वतंत्र आघाडी उभी केली आहे. काँग्रेस आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स यांच्यातील समीकरणे, भाजप आणि मगो यांच्यातील संभाव्य राजकीय जुळवाजुळव आणि आता गोवा फॉरवर्ड-आपची आघाडी यामुळे मतदारांसमोर अनेक राजकीय पर्याय उभे राहत आहेत.

मात्र, यापैकी कोणती आघाडी प्रत्यक्ष निवडणुकीत किती प्रभाव निर्माण करेल, हे आज निश्चितपणे सांगता येणार नाही. २०१७ साली जो समूह विजय सरदेसाईंनी भाजपला पाठिंबा दिला म्हणून नाराज झाला होता, तोच आज काँग्रेसपासून फारकत घेऊन आम आदमी पक्षाशी युतीच्या त्यांच्या निर्णयावरही टीका करत आहे.या नव्या राजकीय परिस्थितीत आगामी प्रचाराचा केंद्रबिंदू विकास, रोजगार, पर्यटन, पर्यावरण, गोव्याची अस्मिता हा न राहता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांकडे झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम आदमी पक्षावरही आरोप होत आहे की, त्यांनी पंजाबच्या बदल्यात गोवा देण्याची डील भाजपकडे केली आहे. रस्त्यांवरील होर्डिंग्जनंतर आता सोशल मीडियावर प्रत्युत्तरांची मालिका सुरू झाली आहे. यात भाजप बाजूलाच राहिला असून, विरोधकच एकमेकांवर टीका करत असल्याने हे पोस्टर युद्ध भाजपच्याच पथ्यावर पडणार आहे. मूळ मुद्द्यांपासून मतदारांना भरकटवण्याचे काम आता केवळ भाजपला करायची गरज राहिलेली नाही. विरोधकही त्यांना चांगला हातभार लावताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news