

समजा एखाद्या कुख्यात गुंडाला कारागृहात टाकण्यात आले आहे आणि त्याला तो तुरुंग आवडत नाही, तर मग काय करायचे, असा प्रश्न उभा राहतो. त्या संबंधित गुंडाने काही खटपट करून समजा पुण्यावरून सांगली कारागृहात स्वतःची रवानगी करण्याची सोय केली, तर पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्याला पुणे येथून घेऊन सांगली येथे पोहोचवणे ही असते. पुणे ते सांगली साधारणतः सहा तासांचा रस्ता आहे. बरेच दिवस झाले सदरील गुंड महोदय कारागृहातील तेच ते जेवण खाऊन कंटाळले होते आणि रस्त्यात त्यांना मटण खाण्याचा मोह झाला, तर त्यांचा पण नाईलाज असतो. शेवटी आवड म्हणून काही असते की नाही? गुंड असेल, कैदी असला, तरी त्याच्या पण आवडीनिवडी असतात.
घडले असे की, एका टोळीला काही गुन्ह्यांसाठी मकोका लावण्यात आला होता. पुणे पोलिसांनी सदरील टोळीच्या मुख्य व्यक्तीला सांगली येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार गुन्हे शाखेचे एक पथक त्याला बंदोबस्तामध्ये सांगलीला घेऊन चालले होते. पोलिसांची वाहने पुण्यातून बाहेर पडताच या वाहनांचा पाठलाग दोन फॉर्च्यूनर आणि एक थार गाडीने सुरू केला. पोलीस सातार्यात आल्यानंतर महामार्गावरील एका प्रसिद्ध धाब्यावर थांबले. तिथे सर्व कर्मचार्यांनी जेवण केले. यावेळी पोलिसांच्या मागून तीन वाहनांतून आलेल्या व्यक्ती तिथे दाखल झाल्या. या सर्व व्यक्ती मुख्य गुंडाचे समर्थक, कार्यकर्ते, मित्र, स्नेही सर्व काही होते.
यामध्ये पोलीस रेकॉर्डवरील काही सराईत गुन्हेगारांचा समावेश होता. आता गुंडाला घेऊन पोलीस धाब्यावर थांबले आणि नेमके त्याच वेळी त्या गुंडाचे मित्र तिथे आले, तर याला पोलीस तरी काय करणार? इकडे एकीकडे पोलिसांचे जेवण सुरू असताना गुंड आणि त्याचे स्नेही छानपैकी गप्पा मारत होते. या जेवणाचे बिल अर्थातच गुंडाच्या आलेल्या मित्रांनी दिले. पोलिसांनाही मटण खाण्याचा मोह झाला असेल आणि त्यात इतर कोणी बिल देणारे असेल, तर कुणाला आनंद होत नाही? पोलिसांनी त्याच प्रकारे मटण पार्टीचा आनंद घेतला आणि गुंड असला, तरी पोलिसांनी आपली मानवता जागृत आहे, हे दाखवून दिले.
शेवटी माणसाने माणसाला समजून घ्यायचे नाही, तर कोण समजून घेणार? खूप वर्षांनी प्रमुख गुंड महोदय यांना मटण मिळाले. त्यांच्यासोबतच पोलिसांनाही काही पीस मिळाले असतीलच आणि त्यांनी ते खाल्ले असतील, तर खरं तर आपण त्यांचे कौतुकच केले पाहिजे. गुंड असेल, अट्टल गुन्हेगार असेल, तरी त्याला माणूस म्हणून वागवा, हाच मूलमंत्र पोलिसांनी जपला आहे. या पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, ही झाली प्रोसिजर; पण प्रोसिजरच्या बाहेर राहून माणुसकीच्या द़ृष्टिकोनातून अट्टल गुंडाला मित्रांशी भेटू देणे आणि त्याच्यासोबत मटण पार्टी करणे हा झाला मानवतेचा द़ृष्टिकोन. पोलिस आणि गुन्हेगार यांचे संबंध ‘अर्थ’पूर्ण आणि संवादपूर्ण राहिले की, आपोआपच गुन्हेगारी कमी होईल, असा पोलीस खात्याचा विश्वास असावा.