

पीओके किंवा पाकव्याप्त काश्मिरातील जनतेने शाहबाझ शरीफ सरकारविरोधात उठाव सुरू केला आहे. अवामी अॅक्शन कमिटी (एएसी) या तेथील लोकप्रिय नागरी संघटनेने 38 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, संरचनात्मक सुधारणांची मागणी केली. पीओकेच्या विधानसभेतील पाकिस्तानात राहणार्या काश्मिरी स्थलांतरितांसाठी राखीव असलेल्या 12 जागा रद्द करण्याची कमिटीची प्रमुख मागणी आहे. शिवाय अनुदानित दरात पीठ मिळावे, मंगल जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणार्या विजेचे दर कमी करावेत याही मागण्या आहेत. गेल्या 70 वर्षांपासून तेथील लोकांना मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जातेय. आता हे बस्स झाले. एक तर हक्क द्या, नाही तर जनतेच्या रोषाला सामोरे जा, असा इशारा एएसीचे नेते शौकत नवाझ मीर यांनी दिला. हजारो लोक रस्त्यावर आल्यामुळे पाकिस्तान सरकार हादरले आहे.
मीरपूर, कोटली, मुझफ्फराबाद येथे पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला तसेच कित्येकजण जखमीही झाले. गेल्या काही वर्षांतील पीओकेमधील हे सर्वात मोठे आंदोलन म्हणावे लागेल. तेथील प्रशासन आणि केंद्रीय मंत्री यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या. पण त्या फिसकटल्यानंतर नागरिक संतापले. उच्चभ्रूंचे विशेषाधिकार रद्द करावेत आणि निर्वासितांच्या विधानसभेतील जागाही बाद कराव्यात, या मुद्द्यांवर एएसी तडजोडीस तयार नाही.
संयुक्त राष्ट्रांत जाऊन शांततावादी आहोत, असा आव आणणार्या पाकिस्तानने पीओकेवर दडपशाही चालवली असून, निदर्शकांवर गोळ्या चालवण्यासही त्यास लाज वाटत नाही. जम्मू-काश्मिरात मानवी हक्कांची गळचेपी होत आहे, असे निराधार आरोप करणार्या पाकिस्तानला 370वे कलम रद्द झाल्यापासून गेल्या 6 वर्षांत तेथे झालेली प्रगती बघवत नाही. खरे तर पीओकेमध्येच लोकशाही तसेच मानवी हक्क चिरडले जाताहेत. सध्या तेथील मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केली. शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत.
पीओकेत पाकिस्तानी स्थलांतरितांचे वर्चस्व निर्माण केले जात असल्यामुळे साहजिकच तेथील जनता अस्वस्थ आहे. जनता दारिद्य्रात पिचलेली असली तरी तेथील प्रशासनातील प्रमुख व्यक्तींचे गलेलठ्ठ पगार व भत्ते फुगतच आहेत. आलिशान बंगले, मोटारी, पार्ट्या आणि एकूणच व्हीआयपी संस्कृती याविरुद्ध लोक प्रचंड खवळले आहेत. पाक सरकार पीओकेचे शोषण करत असून प्रशासनात तुफान भ्रष्टाचार आहे. याखेरीज हजारो लोक बेकार आहेत. तेथील लोक प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत आणि पशुपालन हाही तेथील महत्त्वाचा व्यवसाय आहे.
पश्तो, उर्दू, काश्मिरी आणि पंजाबी या तेथील प्रमुख भाषा आहेत. वास्तविक पीओके हा खनिजसमृद्ध प्रदेश आहे. तेथे कोळसा, बॉक्साईट व खडूचे प्रचंड साठे आहेत. लाकडी वस्तू, कापड, गालिचे यासारखी उत्पादने तेथे केली जातात. मका, गहू, मशरूम, मध, अक्रोड, सफरचंद, चेरी यांसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. त्यामुळे पीओके भारताच्या ताब्यात आल्यास ते खूपच फायद्याचे ठरेल. तेथे पाकिस्तानची दडपशाही सुरू असून त्याविरोधात उत्स्फूर्त निदर्शने सुरूच असतात. पाकिस्तानी आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना पीओकेचा प्रश्न ही तेथील राज्यकर्त्यांसाठी डोकेदुखीच बनलीय.
गेल्यावर्षीही संयुक्त अवामी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मुझफ्फराबादेत ‘बंद’ पुकारला होता. रास्ता रोकोही झाला. तेथील शेतकर्यांचे गव्हाच्या पिकावरील अनुदान सरकारने बंद केले. विजेचे दर वाट्टेल तसे वाढवले. उच्चभ्रू वर्गाला काही विशेषाधिकार दिले. यामुळे स्थानिक जनता खवळली होती. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये चकमक होऊन त्यात तेव्हा शंभरावर पोलिस जखमी झाले होते. खरे तर जम्मू-काश्मीर हा आपलाच आहे आणि पीओके आमचाच अधिकार आहे, ही भारताची ठाम भूमिका आहे.
गेल्यावर्षीही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या झालेल्या एका बैठकीत जम्मू-काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केल्याबद्दल भारताने पाकिस्तानला जोरदार फटकारले होते. हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, असे भारताने रास्तपणे सुनावले होते. तसेच पाकिस्तानने पीओकेवर बेकायदेशीरपणे कब्जा मिळवला. हा प्रदेश एक ना एक दिवस सोडावाच लागेल, असा सक्त इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता. मुळात पाकिस्तानमधील बलुचिस्तान व सिंध प्रांतांतही जनतेत असंतोष आहे. अफगाणिस्तानलगतच्या पाकिस्तानमधील भागात तर सातत्याने दहशतवादी नंगानाच सुरू असतो.
पेशावरपासून ते रावळपिंडीपर्यंत ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत असतात. तरीही पाकिस्तानला अक्कल येत नाही. पाकिस्तान हा स्वतंत्र देश म्हणून राहण्याच्याच लायकीचा उरलेला नाही. संयुक्त राष्ट्रांच्या 80 व्या आमसभेत केलेल्या भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत भारताची 7 विमाने पाडली, असा बोगस दावाही त्यांनी केला. शिवाय संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने निष्पक्ष जनमत चाचणी घेतल्यास काश्मीरच्या नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार मिळेल, असे भाकीतही त्यांनी केले! मात्र संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर खोटे दावे करणारे शरीफ हे अमेरिकेचे लांगूलचालन करत असून, वॉशिंग्टनमध्ये ते भिकेचा कटोरा घेऊनच गेले होते. कोणताही पुरावा न देता शरीफ हे फेकाफेकी करत असून प्रत्यक्षात भारताने केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले एअरबेस, जळालेले हँगर आणि तुटलेल्या धावपट्ट्यांचे फोटो उपलब्ध आहेत. जर पाकिस्तानला हा विजय वाटत असेल, तर तसा तो त्यांना वाटू द्या, अशा शब्दांत भारताच्या संयुक्त राष्ट्रांतील कायम सचिव श्रीमती पेटल गहलोत यांनी पाकिस्तानची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. हा तोच पाकिस्तान आहे, ज्याने वर्षानुवर्षे ओसामा बिन लादेनला आश्रय दिला; तर दुसर्या बाजूला दहशतवादाविरोधात लढत असल्याचे ढोंग सुरू केले. आम्ही अनेक दशकांपासून दहशतवादी तळ चालवतोय, याची कबुली पाकच्या मंत्र्यांनीच जाहीरपणे दिली.
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्येस जबाबदार असलेल्या ‘रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेचे पाकने संयुक्त रष्ट्र सुरक्षा परिषदेत उघडपणे समर्थन केले. या सर्वांची गहलोत यांनी आठवण करून दिली. आता पीओकेतील उघड बंड केल्याने पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे म्हणावे लागेल.