

प्रा. डॉ. विजय कुमार
हिंद महासागरातील भारताचा विश्वासू मित्र आणि महत्त्वाचा सामरिक भागीदार म्हणून सेशेल्सचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील दौऱ्यामुळे संरक्षण, सागरी सुरक्षा, व्यापार, हवामान सहकार्य आणि ब्लू इकॉनॉमी या क्षेत्रांतील भारत-सेशेल्स संबंधांना नवी दिशा मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून नुकताच आर्किपेलागो म्हणजेच द्वीपसमूह राष्ट्र असणाऱ्या सेशेल्स प्रजासत्ताकचा तीन दिवसांचा दौरा केला. पंतप्रधानांनी २९ जून रोजी सेशेल्सच्या ५० व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात ‘सन्माननीय अतिथी’ म्हणून हजेरी लावली. याप्रसंगी पंतप्रधान मोदींना ‘गार्जियन ऑफ द ब्लू होरायझन’ या सर्वोच्च मानद किताबाने सन्मानित करण्यात आले. या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून पोर्ट व्हिक्टोरिया येथे भारतीय नौदलाची ‘आयएनएस तर्कश’ आणि ‘आयएनएस इक्षक’ ही जहाजे तैनात केली होती आणि भारतीय सशस्त्र दलाच्या तुकड्यांनी तिथल्या राष्ट्रीय संचलनात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या राष्ट्रीय संसदेच्या विशेष अधिवेशनालाही संबोधित केले. यापूर्वी मार्च २०१५ मध्ये मोदींनी या देशाला भेट दिली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हर्मिनी यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर यंदा फेब्रुवारीत त्यांनी भारताचा पहिला दौरा केला होता. तेव्हा दोन्ही देशांनी डिजिटल तंत्रज्ञान, निर्यात, डेटा देवाणघेवाण आणि सागरी वैज्ञानिक संशोधन या क्षेत्रांत सात महत्त्वाचे करार केले होते. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी शाश्वतता, आर्थिक वृद्धी आणि सुरक्षा यांसाठी ‘सेशेल’ (एसईएसईएल) या संयुक्त संकल्पनेचे अनावरण केले. भारताच्या ‘महासागर’ या विस्तारित सागरी सिद्धांतात सेशेल्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून भारताने व्हिक्टोरियासाठी १७५ दशलक्ष डॉलरच्या विकास मदत पॅकेजची घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदींच्या या दुसऱ्या दौऱ्यामुळे संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्याला मोठी गती मिळणार आहे. भारताने पुन्हा या देशात चार लष्करी सल्लागार नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मागील सरकारने ही प्रथा बंद केली होती. सेशेल्सच्या सागरी आणि हवाई मालमत्तेपैकी ५० टक्क्यांहून अधिक भाग डॉर्नियर विमाने आणि गस्ती जहाजांद्वारे भारताकडून सुसज्ज केला आहे. भारताने सेशेल्सला ‘मेड इन इंडिया’अंतर्गत बनलेली वेगवान गस्ती जहाजे, लेझर रेडियल बोटी, उपयुक्तता वाहने आणि रुग्णवाहिका भेट देऊन आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. भारताची सर्वात मोठी ताकद क्षमता बांधणीत असून सेशेल्समधील ७० टक्क्यांहून अधिक संरक्षण प्रशिक्षण आणि मानवी संसाधन विकास भारताद्वारे केला जातो. पारंपरिक संरक्षणाच्या पलीकडे जाऊन आता कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करत आहेत.
सेशेल्स हा पश्चिम हिंद महासागरात पसरलेला ११५ बेटांचा समूह आहे. १,१०,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेले हे आफ्रिकेतील सर्वात लहान आणि कमी लोकसंख्या असलेले सार्वभौम राष्ट्र आहे. पूर्व आफ्रिका, पश्चिम आशिया आणि इंडो पॅसिफिक क्षेत्राला जोडणाऱ्या प्रमुख सागरी व्यापारी मार्गांवर हे राष्ट्र वसलेले आहे. हे मार्ग आशियाला आफ्रिका, युरोप आणि मध्य पूर्वेशी जोडणारे जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्ग आहेत. या मार्गांवरून दररोज आशियाई माल आणि खाडी देशांतील तेलाची वाहतूक पश्चिमेकडे होते. अब्जावधी रुपयांचा आंतरराष्ट्रीय व्यापार याच क्षेत्रातून होतो. त्यामुळे भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी या सागरी मार्गांची सुरक्षा अत्यंत आवश्यक आहे.
मोझांबिक चॅनल आणि अटलांटिक महासागराला हिंद महासागराशी जोडणाऱ्या केप रूटच्या प्रवेशद्वारावर सेशेल्सचे नियंत्रण आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक व्यापाराचा मोठा हिस्सा या मार्गांकडे वळवला गेला आहे. यामुळे स्थानिक मार्ग असणारे हे जलमार्ग आता जागतिक पुरवठा साखळीचे मुख्य आधार बनले आहेत. सेशेल्सचे अनन्य आर्थिक क्षेत्र (ईईझेड) १.३ दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेले असून ते त्याच्या मूळ भूभागापेक्षा ३००० पट मोठे आहे. यामुळे हे क्षेत्र सोमाली चाच्यांच्या हल्ल्यांना बळी पडू शकते. या अथांग सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी भारत सेशेल्सला जी मदत करत आहे, ती संपूर्ण पश्चिम हिंद महासागर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अत्यंत मोलाची ठरते.
महासागर हेच देशाचा व्यापार, हवामान लवचिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा निर्धारित करतात, हे भारताच्या ‘मॅरिटाईम फर्स्ट’ धोरणाचे मूळ आहे. गेल्या दशकभरात हिंद महासागरात महासत्तांची नौदल तैनाती आणि बंदरांवरील गुंतवणूक कमालीची वाढली आहे. भारताने या क्षेत्रात भू-राजकारणाऐवजी विभागीय सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. या सागरी धोरणाचा मुख्य कणा म्हणजे ‘मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस’ (एमडीए) म्हणजेच सागरी क्षेत्राची अचूक माहिती असणे होय. भारताने सेशेल्सला किनारपट्टीवरील रडार प्रणाली, उपग्रह, कोस्टल सर्व्हिलन्स रडार सिस्टीम आणि डॉर्नियर विमाने पुरवली आहेत, ज्यामुळे संशयास्पद हालचालींवर रिअल टाईम लक्ष ठेवणे शक्य होते. भारतीय नौदल या भागातील बंदरांचे हायड्रोग्राफिक सर्वेक्षण देखील करते. यामुळे सुरक्षित नौकानयन आणि सागरी संसाधनांचे उत्तम व्यवस्थापन करणे सोपे जाते. २०१५ मधील ‘सागर’ धोरणावरून आता भारताने ‘महासागर’ या व्यापक धोरणाकडे झेप घेतली आहेत. यामध्ये केवळ नौदलाचे सहकार्य नसून हवामान बदल, डिजिटल गव्हर्नन्स, आरोग्य सेवा, शाश्वत विकास आणि ब्लू इकॉनॉमी (सागरी अर्थव्यवस्था) यांचा समावेश आहे.
सेशेल्समध्ये अशोक लेलँड, टाटा मोटर्स, भारती एअरटेल आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या अनेक भारतीय कंपन्या कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ७०३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे. यामध्ये भारताची निर्यात ६३१ कोटी रुपये तर सेशेल्सकडून झालेली आयात ७२ कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण ६१७ कोटी रुपयांचा व्यापार झाला असून भारताची पकड व्यापारी स्तरावर मजबूत असल्याचे दिसते.