

उमेश कुमार
बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत क्षणाक्षणाला राजकारण बदलताना दिसून येत आहे. नुकतेच येथे एका फोन कॉलमुळे सर्व गठबंधनांच्या राजकारणावर परिणाम झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोस कोस पर बदले पानी, चार कोस पर बानी’, असे म्हटले जाते. म्हणजे दर काही कोसावर पाणी आणि वाणी बदलते. ही कहावत बिहारच्या राजकारणाला सध्या परफेक्ट लागू पडते. येथील राजकारण क्षणाक्षणाला बदलत चालले आहे. कागदावर आघाडी-युतीची नावे जितकी स्पष्ट दिसतात तितकीच गुंतागूंत प्रत्यक्षात दिसते. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये औपचारिक जागावाटप झाले आहे; पण खरा खेळ पडद्यामागे सुरू आहे. एका फोन कॉलमुळे सध्या पाटणा आणि दिल्लीचे राजकीय तापमान वाढले आहे.
‘एनडीए’च्या जागांची घोषणा झाली तेव्हा संयुक्त जनता दल (संजद) हा पक्ष मोठा भाऊ राहिलेला नाही, हे स्पष्ट झाले. ही घोषणा नितीशकुमार यांना खट्टू करून गेली. ते मौन राहिले. त्यामुळे दिल्लीपासून पाटण्यापर्यंत फोनाफोनी झाली. भाजपातील चाणक्य समजल्या जाणार्या नेत्यांनी पाटण्याकडे धाव घेतली. आघाडीमध्ये आपल्याला बाजूला केल्याची भावना संजदच्या नेत्यांमध्ये होऊ लागली आहे. याच अस्वस्थतेतून त्यांना जुन्या रिलेशनशिपची आठवण येऊ लागली आहे. त्यानंतर फोनाफोनी होणे साहजिकच होते.
रात्री दहाच्या सुमारास एक अणे मार्ग (बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान) येथून एक कॉल आला आणि बिहारच्या राजकारणात जणू ठिणगीच पडली. त्या फोननंतर काही वेळातच तेजस्वी यादव यांचे अत्यंत जवळचे सल्लागार संजय यादव मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. हे वृत्त तत्काळ पसरले आणि पाटण्यातील गल्ल्या असोत की, दिल्लीतली कार्यालये... सगळीकडेच खळबळ उडली. नेत्यांचे फोन खणाणू लागले. सगळीकडे प्रश्न एकच, त्या फोनकॉलवर नेमकी काय चर्चा झाली?
संजदमधील नाराजीचे कारण स्पष्ट आहे. लोजपा (आर)ला दिल्या गेलेल्या जागा आणि इतर जागावाटप. संजदने चिराग पासवान यांना दिल्या गेलेल्या 29 पैकी 14 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. 7 जागांवर अधिकृत उमेदवार घोषितही केले. वरवर या फ्रेंडली फाईट वाटत असल्या, तरी तशा त्या नाहीत. संजदमध्येही शस्त्रक्रिया सुरू झाली आहे. नितीशकुमार यांनी स्वपक्षाच्याच ललन सिंह, अशोक चौधरी आणि संजय झा यांचा चांगलाच ‘क्लास’ घेतला. निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली. नितीश कुमारांची ही अस्वस्थता आणि वेदना जुन्या राजकीय रिलेशनशिपच्या आठवणीतून मार्ग दाखवून गेली.
लालुप्रसाद यादव यांनाही हे कळून चुकले आहे की, पक्ष वाचवायचा असेल, तर सत्तेत वाटा गरजेचा आहे, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची नाही. त्यामुळे राजदची प्राथमिकता सत्तेत सहभागी होण्याची आहे. हेच समीकरण फोन कॉलवर सोडविण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच प्रयत्नांतून नितीशकुमार-भाजप या नात्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपसाठी गुंतागुंतीची स्थिती झाली आहे. सत्तेसाठी नितीश कुमार सोबत हवेत. जर नितीश कुमार सोबत नसतील, तर केंद्रातील सत्ताही संकटात येऊ शकते आणि म्हणूनच बिहारचे राजकारण राष्ट्रीय पातळीवर अधिक संवेदनशील ठरते.
चिराग पासवान यांना भाजप दलित चेहरा म्हणून प्रोजेक्ट करत आहे; पण ग्रामीण मतदार अजूनही लोजपाला स्वीकारत नाही. त्यामुळेच नितीश कुमार यांना दिलासा वाटतो आहे. कुटुंबातील गोष्टी समोर आणून चिराग पासवान हे दलित आहेत की नाही, याबाबतही संशय वाढवला जात आहे. जीतनराम मांझी यांचा पक्ष ‘हम’देखील राजकीय तडजोडींमध्ये गुंतलेला आहे. त्यांचा पक्ष केवळ 6 जागा लढवतो आहे; पण निवडणुकीनंतर सरकार स्थापनेवेळी ते निर्णायक ठरू शकतात. उपेंद्र कुशवाहा ‘एनडीए’मध्ये सामील झाल्यानंतरही स्वतःला उपेक्षित मानतात. जागावाटपावरून ते नाराज आहेत. त्यामुळे ते भाजप आणि संजदशी अंतर ठेऊन आहेत. जेणेकरून निवडणुकीनंतर मोलभाव करता येईल. भाजपला संघटनशक्तीवर विश्वास आहे; पण नितीश कुमार यांच्या नाराजीवर त्यांच्याकडे काही इलाज नाही.
या सगळ्यात जी व्यक्ती सर्वात शांत आहे, ती व्यक्ती सर्वाधिक रणनीती बनवत आहे. ती व्यक्ती म्हणजे, नितीश कुमार. त्यामुळेच बिहारच्या राजकीय लग्नात सध्या वर पण तेच आहेत, वर्हाडीपण तेच आहेत. फरक इतकाच?आहे की, वरातीत प्रत्येकजण निमंत्रण घेऊन येत आहेत; पण वरमाला कोण घालणार हा निर्णय जनता घेणार आहे.