

ठाकूरजी : गुड मॉर्निंग पप्पूजी. आपण नागालँडचे दौरे करून आलात यामागे धोरण नेमके काय?
पप्पूजी : लोकांची विचारपूस... पण आपली धोरणात्मक चौकशी समजली नाही?
ठाकूरजी : देशभरात भोंदूगिरीविरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत. एपस्टिनचा मुद्दा छेडून आपण सर्व भोंदू बाबागिरीवर जाळं टाकलंय. एक मोठा मासा गळाला लागला. बाकी खेकड्याच्या नांग्या बरोबर अडकल्या. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार तर नागा! असे म्हणत आहेत सगळे.
पप्पूजी : ते ठीक आहे. पण आज आपण आमची जातीने चौकशी केलीत याबद्दल धन्यवाद. युती आणि युक्ती आम्हाला मंजूर नाही. महाआघाडीच्या धोरणाशी आम्ही संलग्न नाही. आम्ही लोकांच्या भावना जपतो.
ठाकूरजी : आम्हाला युतीमध्ये इंटरेस्ट नाही. आमचं कोणाशीच पटत नाही आणि फाटलेलं कोणी शिवायला पण येत नाही. आम्ही आमचं बघू. आम्ही युती मनसे करतो.
पप्पूजी : आम्ही हात दाखवून अवलक्षण ओढवून घेत नाही. त्यामुळे फुकटची चौकशी तर नाहीच करत.
ठाकूरजी : ही घंटा तुम्ही का बांधलीत याची चौकशी समिती बसवू. अंधश्रद्धेपोटी, सत्तेसाठी काहीही कराल?
पप्पूजी : जनतेवर श्रद्धेचे प्रतीक म्हणून गळ्यात धारण केलंय. तुमच्यासारखे नाही जमत! मान ना मान, मैं तेरा मेहमान.
ठाकूरजी : मान ना मान!
पप्पूजी : मतलब, आप राजनीती में मेहमान है. ये कबूल है आपको? आपका पक्ष महान है, लेकीन हम पहले से यहाँ है राजनीती में. समझ गये?
ठाकूरजी : मुद्दा भरकटवत आहात. माझा प्रश्न भोंदूगिरीवर होता. आपण सगळे वातावरण बिघडवलात. ना तो एपस्टिनचा ठोस पुरावा, ना भोंदूबाबांचा ठोस पुरावा. उगीच मधमाश्यांच्या पोळ्याला हात घालायचा. आम्हाला गोत्यात आणाल कधीतरी भगवाधारी पक्ष म्हणून.
पप्पूजी : जो या सर्व दुष्कर्मात सामील तो भोंदूच. तुम्ही का घाबरता? शेवटी सत्तेसाठीच चालू आहे अंधश्रद्धा भोंदूगिरी.
ठाकूरजी : तुम्ही बैलाची घंटा गळ्यात बांधून फिरत आहात नागा लोकांच्यात राहून आल्यापासून. याला काय म्हणावे. लोकांचे प्रेम की भोंदूगिरी?
पप्पूजी : सत्ता बैलाची घंटा बांधल्यामुळे मिळत नाही.
ठाकूरजी : मग कशाला बांधायची ती गळ्यात? आ बैल मुझे मार असं आहे तुमचं. चालू द्या...