

आपल्या भारत देशामध्ये सोन्याचे दागिने घालण्याची हौस जगात सर्वात जास्त आहे हे आपल्याला माहिती आहे. भारतीय स्त्रीला सर्वात जास्त आकांक्षा असते ती म्हणजे सोन्याचे दागिने घालण्याची. स्त्री, मग ती मजुरी करणारी असो वा महालात राहणारी, विविध प्रकारच्या दागिन्यांची हौस तिला असणे यात काही चुकीचे नाही. तसेही सोने खरेदी करणे किंवा दागिने अंगावर घालणे ही एक प्रकारची गुंतवणूकच आहे. सोन्याचा भाव वाढत जातो. त्यामुळे काही एक रक्कम बँकेत ठेवण्यापेक्षा सोन्यात गुंतवलेली जास्त चांगली असते, हे प्रत्येकाला माहीत झाले आहे.
सोन्याचे दागिने घालण्याची हौस फक्त महिलांनाच आहे असे नाही. आजकाल अनेक पुरुषही, विशेषत: तरुण पुरुषही गळ्यामध्ये साखळ्या, हातात कडे आणि विविध प्रकारचे दागिने घालत असतात. शहराजवळील ग्रामीण भागातील ज्यांच्या जमिनींना करोडोंचा भाव मिळाला आणि ज्यांच्याकडे अचानक पैसे आले, असे लोक यामध्ये अग्रेसर असतात. असे भरगच्च सोन्याचे दागिने घालणार्यांना आणि विशेषतः तरुणांना गुंठामंत्री असे म्हटले जाते. याचे कारण एक गुंठा शेत विकले तर त्यांना 25 ते 30 लाख रुपये मिळत असतात. पाच एकरचा मालक हा करोडपती असतो. त्यामुळे अशा जमिनी विकल्यानंतर नवीन पिढीला अंगावर सोने लेवून मिरवणे आनंद देत असावे असे वाटते. असे सोनेरी दागिने अंगावर खेळविणार्या तरुणांची देहबोली ही वेगळीच असते.
राज्याच्या एका दिग्गज नेत्याने नुकतेच आपल्या कार्यकर्त्यांना यासंदर्भात झापले आहे. ते म्हणाले की, गळ्यात जाडजूड सोने घालणारे पुरुष बैलांसारखे दिसतात. दादांना बहुधा असे कार्यकर्ते पाहून पोळ्याला सजलेल्या बैलांची आठवण झाली असावी. अतिशय सडतोड आणि समर्पक अशी सूचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केली आहे. दादा पुढे असे म्हणाले की, दागिने हे तुमच्या आईच्या, पत्नीच्या, मुलीच्या, बहिणीच्या अंगावर शोभतात. कुणाही पुरुषाच्या नाही...
सोन्याचे दागिने अंगावर मिरवणार्या पुरुषांमध्ये दुसरा क्रमांक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा असतो. नेते मंडळींच्या गळ्यात गोफ नसेल; परंतु हातामध्ये पाच, सात आणि क्वचित प्रसंगी दहाही बोटांमध्ये अंगठ्या असतात. अंगठ्यांमध्ये असणारे खडे तितकेच महत्त्वाचे असतात. काही खडे यश मिळवण्यासाठी, काही आरोग्यासाठी, तर काही खडे शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी वापरले जातात. अंगाला चिकटून सोने असणे हे आरोग्याला चांगले असते, असेही काही लोकांचे प्रतिपादन आहे.
जो तो आपलेच पैसे खर्च करून सोन्याचे दागिने करत असतो. त्यामुळे त्यावर आक्षेप घेणे आवश्यक नाही. परंतु गळ्यात सोनेरी साखळ्या घालणारे पुरुष बैलासारखे दिसतात या मताशी आम्ही सहमत आहोत. सार्वजनिक जीवनामध्ये वावरणार्या व्यक्तीने तरी किमान सोन्याचा हा मोह टाळला पाहिजे असे वाटते.