

पंढरपूरचा विठ्ठल हे महाराष्ट्राचे लोकदैवत. विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अनेक नावांनी भक्तांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या विठ्ठलाच्या भेटीचा दिवस म्हणून आषाढी-कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ’मुखदर्शन व्हावे आता, तू सकल जनांचा दाता’ असे म्हणत दिंड्या, पताका घेऊन पंढरपुरात आलेले लाखो वारकरी आपल्या आराध्य दैवताला कडकडून भेटतात आणि त्याच्या चरणांवर माथा टेकवून कृतकृत्य होतात. परततानाही ’हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’ अशी आर्त प्रार्थना पांडुरंगाला करतात. शेकडो वर्षांपासून ही भागवत धर्माची अखंडितपणे चाललेली लोकपरंपरा विलक्षण आहे. ठरलेल्या तिथीला वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक निघतात आणि शेकडो किलोमीटरचा संपूर्ण प्रवास पायी करत तिथे पोहोचतात, तरी त्यांच्यामध्ये कसल्याही थकव्याचा लवलेश न दिसता उलट चैतन्य, उत्कटता, समाधान आणि साफल्याचे अनुभूतिभाव दिसतात.
जगभरातील अभ्यासक, संशोधक, इतिहासकार, धार्मिक गुरू यांनाही यामागचे तर्कशास्त्र उकलले नव्हते. यासाठी वारीवर अनेक संशोधने झाली. त्यातून असे लक्षात आले की, हा तादात्म्य भाव अभूतपूर्व आहे. या अभ्यासांनुसार, सुमारे ८०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारीची सुरुवात केली. पूर्वी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे पायी चालत जाण्याची परंपरा होती. तीच पुढेही कायम आहे. पायी चालताना विठ्ठलाची भक्तिगीते गायन, नृत्य आणि टाळ नाद करत करत वारीचा आनंदसोहळा पार पडतो. इ. स. १६८५ मध्ये जगद्गुरू तुकोबारायांचे धाकटे सुपुत्र नारायणबाबा यांनी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वरांच्या पालखीला ओळख दिली. त्यांनी ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका एकत्रितपणे पंढरपूरला नेल्या. ही परंपरा १९३० पर्यंत सुरू होती. नंतर पुन्हा पालख्या वेगवेगळ्या करण्यात आल्या. वारीचे आज जे ’पालखी-सोहळा’ म्हणून नेटके रूप दिसते ते वै. ह. भ. प. हैबतबाबा आरफळकर यांच्यामुळे. माऊलींच्या समोर ते ज्या क्रमाने अभंग म्हणत त्यातून आजची भजनी मालिका तयार झाली. वारकरी भजनात प्रथम ’रूप पाहता लोचनी’ आणि शेवटी ज्ञानेश्वर-तुकारामांच्या आरत्या म्हणाव्यात असा नियमही त्यांनीच घालून दिला.
पंढरपुरी जशी नामदेवांची पायरी तशी आळंदीच्या मंदिरासमोर हैबतबाबांची पायरी आहे. अनेक संप्रदाय उदय पावले, नांदले आणि कालौघात क्षीण झाले; पण विठ्ठलभक्तीची धारा निरंतन राहिली. आषाढी वारीनिमित्त ज्ञानोबा-तुकोबांच्या दिंड्यांप्रमाणेच हजारो दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. चंद्रभागेमध्ये स्नान करून वारकरी प्रदक्षिणा पूर्ण करतात. ‘पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ नामाचा जयघोष करतात. ’पावलो पंढरी वैकुंठ भुवन, धन्य आजी दिन सोनियाचा॥’ अशी भावना त्यांच्या मनात असते. यामध्ये कुठेही लौकिक हेतू साध्य करावयाचे नसतात. पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे सावळे रूप डोळ्यांत साठवले आणि त्याच्या चरणावर माथा टेकवला की, तनामनाला धन्यतेचा अनुभव येतो. समता आणि एकमेकांविषयीचा प्रेमभाव ही वारीची महत्त्वाची वैशिष्ट्ये.
वारीमध्ये जात, पात, धर्म, पंथ यांचा लय होऊन समानता, एकरूपता नांदते. लहान असो किंवा थोर, वारीत सर्वजण एकमेकांना ‘माऊली’ नावाने संबोधतात. हे सामाजिक, अध्यात्मिक अभिसरण अनुपमेय आहे. चराचरात ब्रह्म आहे असे समजणारा वारकरी प्रत्येक वारकऱ्यांमध्ये पांडुरंगालाच पाहत असतो आणि त्याच्याच ठायी तो नम्रही होत असतो. वारी हा मोठेपण विसरायला लावणारा सोहळा आहे. एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची मिरवणूक निघते. हा संपूर्ण उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपतो त्याला ’गोपालकाला’ असेदेखील म्हटले जाते. इतरांना न कळणारा म्हणजे कानडा असणारा विठ्ठल संतांना कळला. विठ्ठलाची महती संतांनी अभंग, पदे, भारुडे, गवळणी लिहून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. सर्व भेदाभेदांच्या चौकटी बाजूला सारून अद्वैताच्या भूमिकेतून त्यांनी विठ्ठलाला स्वीकारले आणि वात्सल्यमूर्ती म्हणून विठ्ठलाचे विठ्ठलपण माऊलीच्या रूपात अनुभवले. ज्ञानदेवांनी त्याला विश्वसौंदर्यातून अनुभवले, तर संत नामदेवांनी त्याला प्रेमस्वरूप मानले. तुकोबारायांनी त्याला रंजल्या-गांजल्या जीवांचा सखा-सोयरा म्हणून स्वीकारले. संत संप्रदायाने विठ्ठलाची सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही रूपे मान्य केली. योगीजनांचा विठ्ठल निर्गुण आणि भक्तांचा विठ्ठल सगुण अशी रचना त्यातून पुढे आली.
भक्तीचे तत्त्व उलगडतानाच काही संशोधक साहित्यिकांनी विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेतला. ज्ञानदेवांपासून निळोबांपर्यंत अनेक संतांनी त्याच्या चरणचिंतनात जीवनाची कृतार्थता अनुभवली. ज्ञानदेवांनी विठ्ठलाला ’कानडा’ आणि ’कर्नाटकू’ अशी विशेषणे उपयोजिली. एकनाथांनी ’तीर्थ कानडे देव कानडे| क्षेत्र कानडे पंढरीये|’असे म्हटले, तर नामदेवांनी ’कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असे लिहिले. ’कानडा म्हणजे अगम्य’ अशा अर्थानेही संतांनी विठ्ठलाचे उल्लेख केलेत. ’कर्नाटकू’चा कर्नाटक प्रदेशाशी संबंध नसून ’करनाटकू’ वा ’लीला दाखविणारा’, असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. बहुतांश अभ्यासकांच्या मते, पंढरपूर क्षेत्राचे मूळ कन्नड नाव पंडरगे होते. विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपातल्या तुळईवर होयसळ नृपती सोमेश्वराच्या लेखात या नावाचा उल्लेख आढळतो. या पंडरगेपासूनच पांडुरंग हे देवनाम रूढ झाले, असे मानले जाते. वारकरी परंपरेने विठ्ठल आणि कृष्ण यांचे अद्वैत मानले आहे. म्हणून कृष्णाप्रमाणे विठ्ठलही निळासावळा आहे. पुंडलिकाच्या शब्दाखातर कटीवर हात ठेवून अठ्ठावीस युगे पांडुरंग विटेवर उभा आहे.
विठ्ठल हा पुरुषरूपातील देव असला, तरी तो भक्तवेल्हाळ, कनवाळू आहे. त्यामुळेच भक्तांची मांदियाळी आली की, विठुमाऊलीही आनंदित होते. यावेळीही चंद्रभागेच्या काठावर वैष्णवांचा मेळा भरला असून वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. आषाढी एकादशीला महाएकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्याची परंपरा आहे. विश्वबंधुत्वाचे तत्त्वज्ञान मांडणारी वारी आणि वारकऱ्यांवर निस्सीम प्रेम करणारे लोकदैवत विठ्ठल यांच्यातील अद्वैतभाव हा युद्ध, संघर्ष, हिंसाचार, द्वेष आणि दहशतवादाचे साम्राज्य पसरलेल्या जगासाठी आरसा आहे. विठ्ठलाच्या रूपात जी विश्वशक्ती आहे, तिच्याजवळ सकल दुःखे सांगावीत आणि सुखरूप व्हावे, यात असणारी प्रासंगिक भावना लोकविलक्षण आहे. संतांनी मांडलेले विश्वबंधुत्व हेच विश्वाचे भविष्य उज्ज्वल करणार आहे. त्यासाठी सर्वांना सद्बुद्धी लाभो, हीच पांडुरंगचरणी प्रार्थना!