
डॉ. सदानंद मोरे
ज्या प्रदेशातील लोक पंढरीला जातात, त्याला महाराष्ट्र म्हणावे, अशी महाराष्ट्राची सरळ, सोपी आणि सुटसुटीत व्याख्या थोर समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी केली होती आणि ती खरीच आहे. महाराष्ट्रात धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि भाषिक उल्लेख किंवा निजात्मता (ओळख) प्राप्त करून देणार्या घटकांमध्ये पंढरीच्या वारीचा समावेश कोणीही टाळू शकत नाही.
वारी याचा अर्थ एखाद्या ठिकाणी ठरावीक वेळी नियमितपणे जाणे. ज्याला आपण वारकरी संप्रदाय असे ओळखतो, त्याच्या नावातच वारीचा उल्लेख आहे. जो वारी करतो तो वारकरी. हा वारकरी वारंवार नियमितपणे कुठे जातो, तर पंढरीला आणि कोणाला भेटण्यासाठी जातो, तर अर्थातच त्याचे उपास्य दैवत असलेल्या विठ्ठलाला. समरूपात सांगायचे म्हणजे वारी ही विठ्ठल दैवताची उपासनापद्धती आहे. हा मुद्दा निश्चितच महत्त्वाचा आहे. वारकरी संप्रदाय हा एक धर्मसंप्रदाय आहे. कोणत्याही धर्मसंप्रदायात धर्म म्हणून उल्लेख आणि मान्यता मिळण्यासाठी त्याला विशिष्ट दैवताची आणि त्याचबरोबर त्या दैवताच्या विशिष्ट उपासनापद्धतीची आवश्यकता असते. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास श्री क्षेत्र जेजुरी हे खंडेरायाचे क्षेत्र आहे. त्या दैवताची उपासना करणारे लाखो लोक महाराष्ट्रात आहेत. त्याच्या उपासनेची विशिष्ट पद्धती हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. त्यात जागर, गोंधळ, तळी भरणे इ.चा समावेश होतो. पण तरीही खंडोबाच्या उपासकांचा स्वतंत्र असा संप्रदाय झाला आहे काय?
या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देण्यात अडचण येते. त्याचे कारण म्हणजे धर्माची प्रतिष्ठा मिळण्यासाठी आणखी एका घटकाची जरूरी असते. तो म्हणजे प्रमाण व पवित्र मानला जाणारा धर्मग्रंथ. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात ज्ञानेश्वर-नामदेवांच्या अगोदरपासून प्रचलित होताच, तो उपास्य दैवत विठ्ठल आणि त्याची वारी ही उपासना, या दोन महत्त्वाच्या घटकांमुळे. विठ्ठल दैवत हे पुंडलिकाने पंढरीत प्रस्थापित केले, यात शंका नाही. हे दैवत कोण व कुठले, याची जाणीव तेव्हापासूनच होती. विठ्ठल म्हणजे द्वारकेहून पंढरीत आलेला व पुंडलिकाच्या आग्रहाने तेथेच मूर्तिरूपात उभा राहिलेला कृष्णच होय! या विठ्ठलाने त्याला नियमितपणाने वारंवार भेटायला येणार्यांचा उद्धार करावा, असा वर पुंडलिकाने मागितला व त्या दैवताने दिलासुद्धा. तेव्हापासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून भाविक भक्त पंढरीला समूहाने म्हणजे दिंडीतून व विशेष म्हणजे गात-नाचत, खेळत येऊ लागले, तीच वारी. ही परंपरा ज्ञानेश्वरांपर्यंत अक्षुण्णपणे चालू राहिली. या मंडळींना वारकरी असे नावही पडले.
ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथामुळे संप्रदायाला तिसरा घटक प्राप्त झाला व त्यामुळे त्याला परिपूर्ण धर्माची प्रतिष्ठा मिळाली. तात्त्विक अधिष्ठान मिळाले. ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या सर्वतोमुखी असलेल्या उक्तीचे हे मर्म आहे. हे वारकरी आपल्याच उपास्य दैवताला भेटण्यासाठी नियमितपणे समूहाने गात, नाचत व खेळत का जातात, याचे तात्त्विक कारण स्पष्ट करणारा पवित्र व प्रमाण ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’. (आणि अर्थातच ‘अमृतानुभव’) ‘ज्ञानेश्वरी’ हा ‘भगवद्गीता’ या संस्कृतमधील ग्रंथाचा मराठी भाषेतून अर्थ सांगणारा भाष्य ग्रंथ आहे. मुळात गीता हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद आहे. रणभूमीवर झालेल्या या संवादाचे कौरव-पांडवांचे होऊ घातलेले युद्ध आणि त्या युद्धाच्या औचित्याविषयी अर्जुनाला पडलेला प्रश्न, हे असले तर त्या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन कृष्णाने मानवी जीवनाच्या मूलभूत प्रश्नांनाच हात घातला व त्यामुळे त्याच्यातून जीवनाचे एक तत्त्वज्ञान सिद्ध झाले. पंढरीचा विठ्ठल हा कृष्णच असल्याने हे तत्त्वज्ञान आपोआपच विठ्ठलाचे तत्त्वज्ञान ठरले. पण, ते होते संस्कृतमध्ये. ज्ञानेश्वरांनी ते मराठीत उतरविल्यामुळे वारकर्यांना स्वीकारायला काहीच अडचण आली नाही. त्यामुळे आता म्हणजे तेव्हापासून वारकरी संप्रदाय केवळ एक संप्रदाय न राहता त्याला धर्माची प्रतिष्ठा लाभली.
एकदा हा मुद्दा लक्षात घेतला की, वारी म्हणजे रिकामटेकड्या किंवा काम नसलेल्या लोकसमूहाने वेळ घालविण्यासाठी चालविलेला उद्योग, असा काही असमंजस विद्वानांनी करून घेतलेला व करून देण्याचा केलेला प्रयत्न किती चुकीचा होता, हे लक्षात येईल. वारी हा मानवी जीवनाचा उत्सव किंवा सेलिब्रेशन आहे. उत्सव हा गाऊन नाचून साजरा करायचा असतो. पण, ती नुसती धमाल वा गमाडी गंमत नसते. त्यामागे जीवनदृष्टी असते, ती ज्ञानोबारायांनी मांडली. विश्वाचा पसारा माया, मिथ्या, असार आहे. त्याच्यापासून लवकरात लवकर सुटका करून घेणे हे मानवाचे अंतिम प्रयोजन होय. यालाच मोक्ष असे म्हणतात. तो परमपुरुषार्थ होय, असे पूर्वीचे तत्त्ववेत्ते सांगत होते. ज्ञानोबारायांनी विश्व हे अशाप्रकारे भ्रामक, फसवे आणि बंधनात टाकणारे नसून तो ईश्वरी परमसत्तेचा विलास आहे. ते दु:खद नसून आनंदमय आहे, असे वेगळे प्रतिपादन केले. त्यांच्या या विचारांना चिद्विलासवाद असे म्हणण्याचा प्रघात आहे. पंडित पांडुरंग शर्मा यांच्यासारख्या विद्वानांना त्याची मुळे औपनिषदिक विचारांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तर डॉ. भा. प. बहिरटांसारख्यांनी काश्मिरी शैव तत्त्वज्ञानाकडे मोर्चा वळविला. ते काहीही असो, हा विचार पारंपरिक मायावादी अद्वैत वेदांतापेक्षा वेगळा आहे, हे निश्चित.
विश्व ही त्याच्या निर्मात्यालाच आनंदाची प्रतिती देणारी कलाकृतीसारखी वस्तू आहे, असे मानले की त्याचाच भाग असलेल्या माणसांनी त्याला तुच्छ मानून, असार समजून त्याच्यापासून पलायन करण्याची गरजच पडणार नाही. उलट आपणही त्याची आनंदमय अनुभूती घेणे उचित ठरते. जिला आपण कला असे नाव देतो, ती ही अनुभूती घेण्याचाच एक प्रकार आहे. वारी हा मानवी जीवनाचा उत्सव आहे, असे म्हणताना त्याच्यात गीत, संगीत, नृत्य हे कलाप्रकार का समाविष्ट केले गेले, याचा उलगडा हा असा होतो आणि वारीला बाजूला ठेवून वारकरी संप्रदायाच्या एरवीच्या व्यवहाराचा विचार केला तरीही वर्षभर अखंड सुरू असलेल्या भजन-कीर्तनादींमध्येही हा कलाविष्कार अंतर्भूत असतो. संत नामदेव महाराज जेव्हा ‘नाचू कीर्तनाच्या रंगी। ज्ञानदीप लाऊ जगीं॥ असे म्हणतात तेव्हा त्यांना एकूणच ज्ञानव्यवहार कलाव्यवहाराशी जोडायचा असतो. ब्रह्मविद्येचे देणे-घेणे रुक्ष व नीरस न होता आनंददायक रसमय व्हायला हवे, असा येथे कटाक्षच आहे. हा सर्व विशेष व्यवहार चालू असताना वैयक्तिक आणि सामाजिक जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी कर्मे कर्तव्यबुद्धीने करण्यावर वारकरी संप्रदायाचा भर राहिला आहे. त्यात कोणत्याही प्रकारच्या कर्मत्यागाला वाव नाही.