

पाकिस्तानातील एका वरिष्ठ जनरलने सार्वजनिकपणे जाहीर केले की, पाकिस्तान शांत बसणार नाही. पुढील हल्ला भारतावर होईल आणि तो हल्ला पश्चिमेकडून नव्हे, तर पूर्वेकडून घडवला जाईल. पाकिस्तानात यासाठी खरोखरच तयारी सुरू आहे; मात्र ही कारवाई सरळ पारंपरिक युद्ध पद्धतीने न होता जिहादी संघटनांच्या माध्यमातून घडवली जाण्याची शक्यता आहे. यासाठी पाकिस्तानने बांगला देशातील युनूस सरकारशी गुप्त सहकार्य सुरू केले आहे.
व्ही. के. कौर
नव्या समीकरणात सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे रोहिंग्या जिहादी संघटनांचे एकत्रीकरण. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय बांगला देशात स्थायिक असलेल्या रोहिंग्या दहशतवादी गटांशी संपर्क प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरली आहे. त्यातून तिने फोर ब्रदर्स अलायन्स या नव्या आघाडीची रचना केली आहे. या आघाडीत रोहिंग्या सॉलिडेरिटी ऑर्गनायझेशन, अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी, रोहिंग्या इस्लामी महाज, अराकान नॅशनल डिफेन्स फोर्स आणि अराकान रोहिंग्या आर्मी यांचा समावेश आहे. या सर्वांचे घोषित ध्येय म्हणजे म्यानमारमध्ये स्वतंत्र रोहिंग्या राष्ट्र निर्माण करणे.
युनूस सरकारच्या मदतीने बांगला देश सेना या रोहिंग्या मिलिशियाला थेट शस्त्र प्रशिक्षण देत आहे. कॉक्स बाजार येथील रामू छावणीत असलेली 10 वी इन्फंट्री डिव्हिजन तसेच रंगपूर छावणीत असलेली 66 वी इन्फंट्री डिव्हिजन या दोन्ही ठिकाणी रोहिंग्या लढवय्यांना प्रशिक्षित केले जात आहे. अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीचे लष्कर-ए-तैयबाशी संबंध असल्याची संशयास्पद माहिती मिळाली आहे. धार्मिक जिहादाच्या नावाखाली आयएसआय हे युवकांना अतिरेकी विचारांत अडकवत आहे.
या संपूर्ण उपक्रमामध्ये पाकिस्तान आणि बांगला देश दोघांचाही समान स्वार्थ आहे. बांगला देशासाठी रोहिंग्यांना परत ठेवणे हे आर्थिकद़ृष्ट्या अशक्य झाले आहे. लाखो निर्वासितांचा खर्च पेलणे त्यांच्या सरकारसाठी अवघड ठरते आहे. परिणामी, युनूस सरकार या लढवय्यांना प्रशिक्षित करून परत रखाईन प्रांतात पाठवण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना पाकिस्तान थेट शस्त्रसामग्री, प्रशिक्षण आणि रणनीतिक मार्गदर्शन पुरवतो आहे. आयएसआय नाईखोंगछारी व ब्राह्मणबरिया भागातही रोहिंग्यांना प्रशिक्षण देत आहे.
या छावण्यांतून बाहेर पडलेल्या रोहिंग्या दहशतवाद्यांनी अलीकडेच रखाईन प्रांतात अराकान आर्मीवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे तिथले वातावरण पूर्णत: अस्थिर झाले आहे. अस्तित्व धोक्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर युनायटेड लीग ऑफ अराकानने रखाईन प्रांतातील 45 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना राज्य सोडण्यावर बंदी घातली आहे. त्यांना जबरदस्तीने अराकान आर्मीमध्ये भरती करण्यात येत आहे, जेणेकरून रोहिंग्या जिहाद्यांना उत्तर दिले जाऊ शकेल. त्यामुळे भारताच्या पूर्वेकडील सीमेजवळ लवकरच मोठ्या प्रमाणात रक्तपात आणि हिंसाचार उभा राहू शकतो.
या संघर्षात रोहिंग्या आघाडीच्या मागे पाकिस्तान आणि बांगला देश उघडपणे उभे असले, तरी अराकान आर्मी एकटी नाही. म्यानमार सैन्याविरुद्ध लढणारे किमान 20 बंडखोर गट अराकान आर्मीच्या बाजूने उभे आहेत. रखाईन, चीन, मागो, माग्वे आणि अय्यरवाडी प्रांतात हे संघटनांचे जाळे पसरले आहे. त्यामध्ये सर्वात शक्तिशाली अराकान आर्मी मानली जाते. तिचे बुथिदौंग आणि राथेदौंग या दोन महत्त्वाच्या शहरांवर पूर्ण नियंत्रण आहे. चीन अराकान आर्मीला गुप्त पाठिंबा देतो आहे. कारण, त्यांना सितवे बंदरावर पकड मिळवून भारतावर लक्ष ठेवायचे आहे. अराकान आर्मीच्या दाव्यानुसार रखाईन राज्यातील 17 पैकी 14 तालुके त्यांच्या ताब्यात आहेत. हे त्यांच्या प्रभावाचे द्योतक आहे.